
पणजी: गोवा पोलीस दलात शिस्त आणि प्रशासकीय कामात सुसूत्रता आणण्यासाठी पोलीस स्थापना मंडळाच्या शिफारशीनुसार नोव्हेंबर महिन्यात तब्बल ३४ पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले होते. हे आदेश 'तात्काळ प्रभावाने' लागू करण्याचे निर्देश असतानाही, दीड महिना उलटून गेल्यानंतरही ३४ पैकी चार पोलीस निरीक्षकांनी अद्याप आपल्या जुन्या पदाचा ताबा सोडलेला नाही किंवा नवीन नियुक्तीच्या ठिकाणी ते रुजू झालेले नाहीत. या प्रशासकीय विलंबामुळे पोलीस दलातील दैनंदिन कामकाजावर परिणाम होत असून वरिष्ठ स्तरावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, कोलवा वाहतूक विभाग, वाळपई, पणजी (वाहतूक शिक्षण विभाग) आणि काणकोण येथील पोलीस निरीक्षकांचा यामध्ये समावेश आहे. बदली होऊन बराच काळ लोटला तरी हे अधिकारी अद्याप जुन्याच ठिकाणी कार्यरत असल्याने प्रशासकीय कामात अडथळे येत आहेत. विशेषतः कोलवा वाहतूक कक्षाचा कारभार सध्या एका पोलीस उपनिरीक्षकाद्वारे चालवला जात आहे, कारण तिथे बदली होऊन येणाऱ्या निरीक्षकांनी अद्याप पदभार स्वीकारलेला नाही. महत्त्वाच्या पदांवर पूर्णवेळ अधिकारी नसल्याने कायदा आणि सुव्यवस्थेच्या अनुषंगाने काही तांत्रिक अडचणी निर्माण झाले आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या स्पष्ट निर्देशानंतरही झालेला हा उशीर प्रशासकीय अनास्थेचे दर्शन घडवत आहे. हा गंभीर प्रकार आता वरिष्ठ पोलीस अधिकार्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आला आहे. प्रशासकीय आदेशांचे पालन न होणे हे पोलीस दलातील शिस्तीला बाधा आणणारे असून, पोलीस मुख्यालय आता या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची शक्यता आहे. प्रलंबित असलेल्या या बदल्यांची तातडीने अंमलबजावणी व्हावी आणि संबंधित निरीक्षकांनी आपापल्या नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराव्यात, यासाठी मुख्यालय कडक पावले उचलण्याच्या तयारीत आहे.