कळंगुटमध्ये किरकोळ वादातून वृद्धाची हत्या; संशयिताला अटक

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
35 mins ago
कळंगुटमध्ये किरकोळ वादातून वृद्धाची हत्या; संशयिताला अटक

म्हापसा: पोरबावाडो-कळंगुट येथे एका घराची देखभाल करणाऱ्या (केअरटेकर) ६३ वर्षीय वृद्धाचा, त्याच्याच गावातील एका संशयित व्यक्तीने खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. याप्रकरणी कळंगुट पोलिसांनी संशयिताला खुनाच्या आरोपाखाली अटक केली आहे. नववर्षाचे स्वागत करत असताना मयत आणि संशयितामध्ये झालेल्या भांडणाचे पर्यवसान अखेर शिपाद यांच्या हत्येत झाले.

शिपाद देबनाथ (वय ६३, रा. पोरबावाडो-कळंगुट आणि मूळ दक्षिण दिनाजपूर, पश्चिम बंगाल) असे मृताचे नाव आहे. तर संशयित आरोपी ५० वर्षे वयोगटातील आहे. मृत शिपाद हे कळंगुट येथील 'सिल्वेस्टर व्हिला' या जुन्या घरात गेल्या १५ वर्षांपासून काळजीवाहू म्हणून काम पाहत होते. या घराचे मालक मुंबईत वास्तव्यास असून, त्यांनी शिपाद यांच्या राहण्याची व्यवस्था घराच्या मागील बाजूच्या खोलीत केली होती.

ही घटना गुरुवारी पहाटे २:३० च्या सुमारास घडली. संशयिताने शिपाद यांच्यावर फावड्याने प्राणघातक वार केले. हल्ल्यादरम्यान शिपाद यांनी संशयिताच्या तावडीतून सुटून खोलीबाहेर पळ काढण्याचा प्रयत्न केला; मात्र संशयिताने त्यांना बाहेर गाठून पुन्हा हल्ला केला. यात गंभीर जखमी होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच कळंगुटचे पोलीस निरीक्षक परेश नाईक व त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत संशयिताला ताब्यात घेतले. पोलीस अधीक्षक हरीश मडकईकर व उपअधीक्षक विश्वेश कर्पे यांनीही घटनास्थळाची पाहणी केली. गुरुवारी सकाळी श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञांना पाचारण करून आवश्यक पुरावे गोळा करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक परेश नाईक करत आहेत.

हेही वाचा