बोडगेश्वर जत्रेतील जायंट व्हील्ससह इतर राईड्स सील

मामलेदार कार्यालयाकडून कारवाई : एनओसी, सुरक्षा परवाने नसल्याने बडगा

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
12 mins ago

म्हापसा येथील बोडगेश्वर जत्रेस्थळी उभारलेली जायंट व्हीलची संरचना सील करताना मामलेदार कार्यालयाचे पथक. (उमेश झर्मेकर)

म्हापसा : येथील श्री देव बोडगेश्वर जत्रोत्सवस्थळी उभारलेल्या जायंट व्हील्स व इतर मनोरंजन राईड्सची संरचना बार्देश देवालये प्रशासक कार्यालयाकडून सीलबंद करण्यात आली. जत्रेस्थळी उभारलेल्या या संरचनांना सरकारी यंत्रणांची आवश्यक एनओसी आणि सुरक्षा परवाने नसल्याने ही कारवाई करण्यात आली.
अतिरिक्त जिल्हाधिकारी पुंडलिक खोर्जुवेकर यांनी बुधवारी या संदर्भात कडक आदेश जारी केले होते. जत्रेत उभारलेल्या जायंट व्हील्सनी सुरक्षिततेचे निकष पूर्ण केले नसल्याने आणि आवश्यक एनओसी सादर केली नसल्याने त्या तत्काळ सीलबंद करून हटवण्याचे निर्देश उपजिल्हाधिकारी वर्षा परब आणि मामलेदार अनंत मळीक यांना दिले होते. यापूर्वी २६ डिसेंबर रोजीही अग्निसुरक्षा परवाना नसल्याने राईड्स बंद ठेवण्याचे आदेश दिले होते, मात्र तरीही काम सुरूच राहिल्याने ही कारवाई करण्यात आली.
हिंदू संघटनांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार
या जत्रेत मनोरंजनाचा व्यवसाय हिंदू धर्मीय व्यावसायिकालाच देण्यात यावा, अशी मागणी काही हिंदू संघटनांनी देवस्थान समितीकडे केली होती. मात्र, समितीकडे केवळ बिगर हिंदू व्यावसायिकाचा अर्ज आल्याने त्यांनी त्यास परवानगी दिली होती. म्हापसा पालिकेने याला संमती दिली असली तरी अग्निशमन दलाचा दाखला मिळाला नव्हता. परवाने नसतानाही व्यवसाय सुरू असल्याबद्दल हिंदू संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेत तक्रार केली होती.
जत्रोत्सवाच्या आनंदावर विरजण
बोडगेश्वर जत्रेत यंदा प्रथमच दोन मोठी जायंट व्हील्स आणि इतर आधुनिक राईड्सची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, प्रशासकीय कारवाईमुळे १८ ही संरचना सीलबंद करण्यात आल्या आहेत. यामुळे जत्रेला येणाऱ्या लहान मुलांच्या आणि युवा वर्गाच्या मनोरंजनावर विरजण पडले आहे. सुरक्षेच्या कारणास्तव घेतलेल्या या निर्णयामुळे यंदा जत्रेत राईड्सचा आनंद लुटता येणार नाही, हे स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा