२०२६ मध्ये टीम इंडियाचा भरगच्च कार्यक्रम

टी-२० वर्ल्डकप ते आशियाई क्रीडा स्पर्धा : संघाचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
39 mins ago
२०२६ मध्ये टीम इंडियाचा भरगच्च कार्यक्रम

मुंबई : २०२५ हे वर्ष भारतीय क्रिकेटसाठी संस्मरणीय ठरल्यानंतर, २०२६ मध्येही क्रिकेटप्रेमींना थरारक सामने पाहायला मिळणार आहेत. २०२६ हे वर्ष भारतीय संघासाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहे, कारण २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या तयारीला या वर्षापासून वेग येणार आहे. हा विश्वचषक दक्षिण आफ्रिकेत होणार असून, रोहित शर्मा आणि विराट कोहली यांची ही अखेरची आयसीसी स्पर्धा ठरू शकते, अशीही चर्चा आहे. २०२६ मध्ये भारत तब्बल १८ एकदिवसीय सामने खेळणार असून, त्यात रोहित शर्मा आणि विराट कोहली सहभागी होणार आहेत.
भारत विरुद्ध न्यूझीलंड (३ वनडे, ५ टी-२०) : जानेवारी २०२६
भारतीय संघाचे २०२६ मधील क्रिकेट हंगामाची सुरुवात न्यूझीलंडविरुद्धच्या घरच्या मालिकेने होणार आहे. वनडे मालिका: ११ जानेवारीपासून (३ सामने), टी-२० मालिका: २१
जानेवारीपासून (५ सामने)
आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ : फेब्रुवारी-मार्च २०२६ : भारत व श्रीलंका
२०२६ मधील भारताची सर्वात मोठी परीक्षा म्हणजे टी-२० विश्वचषक. ही स्पर्धा भारत आणि श्रीलंकेत होणार आहे. भारत हा विद्यमान विजेता असून २०२४ मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने विजेतेपद पटकावले होते. सूर्यकुमार यादव संघाचे नेतृत्व करणार आहे. भारत ग्रुप ‘ए’ मध्ये असून पाकिस्तान, अमेरिका, नेदरलँड्स आणि नामिबिया हे संघ सोबत आहेत.
आयपीएल २०२६ : मार्च-मे २०२६
टी-२० विश्वचषकानंतर लगेचच इंडियन प्रीमियर लीग (IPL) रंगणार आहे. स्पर्धा मार्च अखेरीस सुरू होण्याची शक्यता आहे. अंतिम सामना ३१ मे रोजी होणार असून वेळापत्रक अद्याप जाहीर झालेले नाही.
भारत विरुद्ध अफगाणिस्तान (३ वनडे, १ कसोटी)
जून २०२६ मध्ये भारत अफगाणिस्तानला घरच्या मैदानावर आमंत्रित करणार आहे. भारत–अफगाणिस्तान यांच्यातील ही दुसरीच कसोटी मालिका ठरणार आहे. याआधी २०१८ मध्ये भारताने अफगाणिस्तानविरुद्ध कसोटी जिंकली होती
भारत दौरा इंग्लंड (५ टी-२०, ३ वनडे)
जुलै २०२६ मध्ये भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. त्या ठिकाणी ५ टी-२० आणि ३ वनडे सामने खेळणार आहे. इंग्लंडमध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचे अखेरचे वनडे सामने असू शकतात, अशी शक्यता आहे.
भारत दौरा श्रीलंका (२ कसोटी)
ऑगस्ट २०२६ मध्ये भारतीय संघ श्रीलंकेत दोन कसोटी सामने खेळणार आहे. फिरकीपटूंना अनुकूल खेळपट्ट्यांवर भारताची कामगिरी कशी असेल, याकडे सर्वांचे लक्ष.
भारत विरुद्ध अफगाणिस्तान (३ टी-२०)
सप्टेंबर २०२६ मध्ये कसोटी मालिकेनंतर भारत अफगाणिस्तानविरुद्ध ३ टी-२० सामने खेळणार आहे. अफगाणिस्तानचा टी-२० मधील वाढता प्रभाव लक्षात घेता ही मालिका महत्त्वाची मानली जात आहे.
आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६
सप्टेंबर २०२६ : जपान : भारत आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकाचे रक्षण करणार आहे. २०२३ मध्ये भारताने अफगाणिस्तानविरुद्ध अंतिम सामना न खेळता सुवर्ण जिंकले होते. यंदा स्पर्धा अधिक चुरशीची होण्याची अपेक्षा आहे.
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (३ वनडे, ५ टी-२०)
सप्टेंबर २०२६ मध्ये वेस्ट इंडिजचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. घरच्या मैदानावर भारतासाठी ही मालिका आत्मविश्वास वाढवणारी ठरू शकते.
भारत दौरा न्यूझीलंड (२ कसोटी, ३ वनडे)
ऑक्टोबर २०२६ मध्ये भारत न्यूझीलंडमध्ये २ कसोटी आणि ३ वनडे सामने खेळणार आहे. न्यूझीलंडमध्ये खेळणे नेहमीच आव्हानात्मक ठरते.
भारत विरुद्ध श्रीलंका (३ वनडे, ३ टी-२०)
डिसेंबर २०२६ मध्ये २०२६ चा शेवट भारत श्रीलंकेविरुद्ध घरच्या मैदानावर करणार आहे. मर्यादित षटकांतील भारत–श्रीलंका सामने नेहमीच रंगतदार ठरले आहेत