राज्याच्या जीएसटी संकलनात २.३६ टक्क्यांनी वाढ

गतवर्षीच्या तुलनेत ११३ कोटींची वाढ : एप्रिल ते डिसेंबर दरम्यान ४,९१८ कोटी संकलन

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
19 mins ago
राज्याच्या जीएसटी संकलनात २.३६ टक्क्यांनी वाढ

पणजी : गत आर्थिक वर्षाच्या तुलनेत यंदा राज्याच्या जीएसटी संकलनात (GST collection)  २.३५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. केंद्रीय अर्थखात्याकडून (Central Finance Department) ही माहिती मिळाली आहे. यानुसार २०२४-२५ या आर्थिक वर्षात एप्रिल ते डिसेंबर दरम्यान राज्यात ४,८०५ कोटी रुपयांचे जीएसटी संकलन झाले होते. २०२५-२६ मध्ये एप्रिल ते डिसेंबर दरम्यान हे संकलन ४,९१८ कोटी रुपये झाले आहे. यंदा जीएसटी संकलनात ११३ कोटींची वाढ झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात २०२०-२१ मध्ये ३,२७० कोटी रुपये जीएसटी संकलन करण्यात आले होते. तर २०२१-२२ मध्ये ४,३६४ कोटी जीएसटी जमा झाला होता. २०२२-२३ मध्ये ५,५२० कोटी रुपये तर २०२३-२४ मध्ये ६,४७५ कोटी रुपये जीएसटी संकलन झाले होते. गेल्या काही वर्षांत राज्यात पर्यटन व अन्य व्यवसाय वाढले आहेत. यामुळे जीएसटी संकलनातही वाढ होत आहे. असे असले तरी केंद्र सरकारने जीएसटी कपात केल्यानंतर यंदा राज्याच्या एकूण संकलनात काहीशी घट झाली आहे.
आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये सर्वाधिक ८०६ कोटी रुपये मासिक जीएसटी संकलन एप्रिल महिन्यात झाले. चालू आर्थिक वर्षात राज्यात डिसेंबर २०२५ मध्ये सर्वात कमी म्हणजेच ३६५ कोटी रुपये जीएसटी संकलन झाले, तर नोव्हेंबरमध्ये ३९७ कोटी, सप्टेंबरमध्ये ५३५ कोटी, ऑगस्ट आणि ऑक्टोबरमध्ये प्रत्येकी ५४५ कोटी, जूनमध्ये ५५१ कोटी, जुलैमध्ये ५८६ कोटी तर मे महिन्यात ५८७ कोटी रुपये जीएसटी संकलन झाले होते.

               

हेही वाचा