विरोधकांची विश्वासार्हता पणाला

जिल्हा पंचायत निवडणुकीत दक्षिण गोव्यात चांगल्या जागा देऊनही विरोधी उमेदवारांनी आपली एकी न ठेवल्यामुळे एक मत भाजपला गेले. पण हीच स्थिती विधानसभेच्या निवडणुकीनंतर उद्भवणार नाही, याची हमी कोण देईल?

Story: संपादकीय |
2 hours ago
विरोधकांची विश्वासार्हता पणाला

दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीवेळी भाजपकडे १५ जणांचे संख्याबळ असताना त्यांना १६ मते मिळाली. त्यामुळे विरोधी पक्ष सध्या एकमेकांवर संशय घेऊन टीका करत आहेत. दक्षिण गोव्यात जिल्हा पंचायतीवर भाजपचे अकरा, मगोचे दोन आणि दोन अपक्ष असे १५ जणांचे संख्याबळ होते. विरोधकांकडे दहा जणांचे संख्याबळ आहे. ज्यात आठ काँग्रेस, एक गोवा फॉरवर्ड आणि एक आम आदमी पक्षाचा उमेदवार. मुळात बहुमत नसल्यामुळे विरोधकांनी अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी आपला उमेदवार देण्याची आवश्यकताच नव्हती. असे असतानाही दोन्ही पदांसाठी विरोधकांनी उमेदवारी अर्ज भरले. काँग्रेसच्या लुईझा रॉड्रिग्ज आणि गोवा फॉरवर्डच्या इनासिना पिंटो यांना प्रत्येकी ९ मते मिळाली. त्यांना १० मते मिळणे अपेक्षित होते. काँग्रेस आणि गोवा फॉरवर्डने निवडीसाठी आपले उमेदवार उभे केले म्हणून राहिलेल्या आपच्या एका उमेदवारावर संशय घेतला गेला. आपचे उमेदवार आंतोनियो फर्नांडिस यांनी आपण भाजपचा कायम विरोध केला त्यामुळे त्यांना मत देऊच शकत नाही, असे स्पष्ट केले. काँग्रेसमध्ये मात्र भाजपमधून आलेले लोक आहेत. शिवाय काँग्रेसच्या जिल्हा प्रमुखांवर पूर्वीही विधानसभेच्या निवडणुकीवेळीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यामुळे काँग्रेसचे उमेदवारच बेभरवंशाचे निघाले की आपच्या उमेदवाराने भाजपला मतदान केले, हे कळण्यास मार्ग नाही. या निवडणुकीत गुप्त मतदान झाले त्यामुळे कोणाचे मत फुटले हे कळण्यास मार्ग नसला तरी विरोधकांमध्ये एकी नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. भाजपच्या गळाला कोणीही लागू शकतो. फक्त आमदारच नाही तर जिल्हा पंचायतीचे सदस्यही भाजपच्या गळाला लागू शकतात, हे जिल्हा पंचायतीच्या प्रकरणातून दिसून आले. २०२७ मध्ये विरोधकांना लोकांनी कौल दिला तर ते भाजपच्या गळाला लागणार नाहीत, याची हमी कोण देईल.

जिल्हा पंचायत निवडणुकीत दक्षिण गोव्यातील पंचायत क्षेत्रातील मतदारांनी विशेषतः काँग्रेसला स्वीकारले. सासष्टीत सात तर काणकोणात काँग्रेसला एक जागा मिळाली. आम आदमी पक्षाला एक आणि गोवा फॉरवर्डला एक जागा मिळाली. काही ठिकाणी चुरशीच्या लढती झाल्या, तर काही ठिकाणी विरोधकांचेच जास्त उमेदवार असल्यामुळे विजय हुकला. अन्यथा दक्षिण गोवा जिल्हा पंचायत विरोधकांनाच मिळाली असती; परंतु तसे झाले नाही, आणि एका अर्थी ते योग्यच झाले. कारण, अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीच्या घोळावेळी जे चित्र आता दिसले तेच चित्र विरोधकांना बहुमत मिळाले असते तर त्यावेळीही दिसले असते. ही शक्यता नाकारता येत नाही. जर एक उमेदवार फुटू शकतो, तर विरोधकांना बहुमत मिळाले असते तरही कदाचित अध्यक्षपदाच्या निवडीत भाजपनेच बाजी मारली असती.

दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीच्या निवडणुकीत विरोधकांच्या एका मताने जो घोळ घातला आहे, ते पाहता विरोधकांची विश्वासार्हता पुन्हा एकदा संशयाखाली आली आहे. आता विरोधक एकमेकांवर आरोप करत आहेत. आपने काँग्रेसवर निशाणा साधला आहे, तर काँग्रेसने आपवर पलटवार करून आपच भाजपची ‘बी टीम’ असल्याचे म्हटले आहे. पण, मत कोणाचे फुटले ते फक्त मत देणाऱ्यालाच माहीत आहे. विरोधकांनी झाकली मूठ सव्वा लाखाची म्हणत गप्प राहणे आवश्यक होते. किमान २०२७ पर्यंत विरोधकांना आपले १० उमेदवार जिल्हा पंचायतीवर आहेत असे म्हणण्याऐवजी, आता ते नऊच आहेत असे म्हणावे लागेल. दहातील एकाने आपले मत भाजपच्या उमेदवाराला दिले आहे. विरोधकांना लोकांमध्ये विश्वास संपादन करायचा असेल तर आपले जिंकून आलेले उमेदवार एकसंध ठेवावे लागतील. अशा पद्धतीने अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले, तर विरोधकांना २०२७ मध्येही भाजपला पराभूत करता येणार नाही. निवडून दिलेले लोक त्याच पक्षात राहतील याची हमी कोणी देऊ शकत नाही, अशी विरोधकांची स्थिती झाली आहे. काँग्रेसच्या आमदारांनी वारंवार ते सिद्ध केले आहे. जिल्हा पंचायत निवडणुकीत दक्षिण गोव्यात चांगल्या जागा देऊनही विरोधी उमेदवारांनी आपली एकी न ठेवल्यामुळे एक मत भाजपला गेले. पण हीच स्थिती विधानसभेच्या निवडणुकीनंतर उद्भवणार नाही, याची हमी कोण देईल? यापूर्वीही गोवा फॉरवर्डने भाजपला पाठिंबा दिला होता. आपच्या आमदारांनी मुख्यमंत्र्यांची स्तुती केली होती. काँग्रेस वारंवार फुटत राहिली. हे चित्र बदलायचे असेल तर विरोधकांनी लोकांचा विश्वास संपादन करावा लागेल.