‘दृष्टी मरीन’चा उपक्रम : मात्र मच्छीमारांचा आक्षेप

म्हापसा : राज्य सरकारने (Goa government) नियुक्त केलेल्या दृष्टी मरीन या समुद्रकिनारा सुरक्षा संस्थेने गोव्यातील चार लोकप्रिय समुद्रकिनार्यांवर टेळहाणी ठेवण्यासाठी सीहॉर्स (seahorse) नावाचे तरंगती जेटी स्थानक हे एक नवीन उपकरण तैनात केले आहे. या उपक्रमामुळे मच्छीमार व्यhवसायिक संतप्त झाले असून हे बांधकाम विनापरवानगी केले जात असल्याचा आरोप कांदोळी मच्छीमार संघटनेने केला आहे.
कांदोळी मच्छीमार संघटनेचे अध्यक्ष व्हिन्सेंट फर्नांडिस म्हणाले की, मंगळवार व बुधवारी समुद्रातील भर पाण्यात जेटी उभारली जात असल्याचे पाहून आम्हाला आश्चर्य वाटले. जेव्हा आम्ही बंदर कप्तान अधिकार्यांकडे चौकशी केली, तेव्हा त्यांनी अशा जेटीसारख्या कोणत्याही संरचनेसाठी परवानगी किंवा ना हरकत दाखला दिला नसल्याचे सांगितले.
जेव्हा आम्ही घटनास्थळी असलेल्या दृष्टीच्या कर्मचार्यांकडे विचारपूस केली, तेव्हा त्यांनी ही जेटी जीवरक्षक कार्यासाठी आहे आणि तिथे जेट-स्की ठेवणार आहेत. सर्व वॉटर स्पोर्ट्स चालक त्यांच्या जेट स्की समुद्रकिनारी ठेवतात, कोणीही अशा प्रकारे जेटस्की भर समुद्रात ठेवत नाहीत. मासेमारी क्षेत्रात हे उभारले जात असून आम्हाला याबद्दल कधीही माहिती देण्यात आली नाही. त्यामुळे यात हस्तक्षेप करण्याची मागणी फर्नांडिस यांनी सरकारी अधिकार्यांकडे केली.
दरम्यान, दृष्टी मरीनच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, सीहॉर्स नावाची ही जेटी एक हंगामी स्वरूपाचे तरंगते स्थानक आहे. जे कळंगुट, कांदोळी, मिरामार व बायणा या गोव्यातील चार लोकप्रिय समुद्रकिनारी पाळत ठेवण्यासाठी आहे. सीहॉर्स हे अशा प्रकारचे पहिले तरंगते व्यासपीठ आहे, जे समुद्रात पूर्णपणे कार्यरत जीवरक्षक चौकी म्हणून काम करण्यासाठी डिझाइन केले आहे.
प्रत्येक सीहॉर्स युनिटमध्ये चार ते सहा जीवरक्षक बसू शकतात. ही युनिट जेट स्की रॅम्प, बचाव फलक, सफबोर्ड, आणि बचाव नळ्यांनी सुसज्ज आहेत. तात्पुरत्या तरंगत्या स्थानकांच्या रॅम्पवर एक जेट स्की ठेवलेली असते, ज्यामुळे पाण्याशी संबंधित आपत्कालिन परिस्थितींना त्वरित प्रतिसाद देणे शक्य होते, अशी माहिती दृष्टीकडून देण्यात आली.
इच्छित ठिकाणी तरंगत नेल्यानंतर व्यासपीठ स्थिर ठेवण्यासाठी या जीवरक्षक चौकीचे चार पाय प्रत्येकी सुमारे सहा मीटर लांब समुद्राच्या तळाशी नांगरले जाऊ शकतात. समुद्राची खोली आणि भरती-ओहोटीच्या परिस्थितीनुसार ते किनार्यापासून २० ते ३० मीटर अंतरावर ठेवता येते. सध्या समुद्रकिनार्यावरून मदत पोहोचायला तीन ते चार मिनिटे लागतात. त्या तुलनेत सीहॉर्समुळे आपत्कालिन परिस्थितीत प्रतिसाद वेळ मिनिटापेक्षा कमी होईल.
- नवीन अवस्थी, दृष्टी मरीनचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ)