केपेत मुख्यालय : धारबांदोडा, सांगे, केपे, काणकोण तालुक्यांचा समावेश

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : राज्यात तिसरा जिल्हा स्थापन करण्यावर सर्वपक्षीय बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले. नवीन जिल्ह्याचे नाव ‘अटल’ असेल. त्याचे मुख्यालय केपे येथे राहणार आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बैठकीनंतर ही माहिती दिली. याबाबतची अधिकृत अधिसूचना लवकरच जारी केली जाणार आहे.
तिसऱ्या जिल्ह्यामध्ये दक्षिण गोव्यातील धारबांदोडा, सांगे, केपे आणि काणकोण या तालुक्यांचा समावेश असेल. विरोधी पक्ष नेते युरी आलेमाव यांनी सांगितले की, तिसऱ्या जिल्ह्याला काँग्रेसचा विरोध नसला तरी त्याबाबत अभ्यास आवश्यक आहे. तिसऱ्या जिल्ह्याच्या अभ्यासासाठी सरकारने समिती स्थापन केली होती. समितीचा अहवाल उघड न करता घाईघाईत तिसरा जिल्हा करणे अयोग्य आहे. आरजीचे आमदार वीरेश बोरकर यांनीही लोकांना विश्वासात घेणे आवश्यक असल्याचे सांगितले.
तिसऱ्या जिल्ह्याच्या स्थापनेबाबत मंत्रिमंडळ बैठकीत व विधानसभेत चर्चा झाली आहे. निती आयोगाच्या शिफारसीप्रमाणे देशात १२० नवीन लहान जिल्हे स्थापन झाले आहेत. गोव्यातील तिसरा जिल्हा हा यापैकीच एक आहे. तिसऱ्या जिल्ह्यामुळे अतिरिक्त निधी मिळण्यासह केंद्रीय योजनांचा अधिक प्रमाणात लाभ घेणे शक्य होणार आहे. स्थानिक नागरिकांना जिल्हा पातळीवरील कामांसाठी लांबचा प्रवास करावा लागणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. 
धारबांंदोडा, केपे, काणकोण व सांगे या तालुक्यांचा तिसरा जिल्हा करण्यास सर्व आमदारांनी पाठिंबा दिला आहे. तिसरा जिल्हा सर्व तालुक्यांना लाभदायक ठरणार आहे.
- रमेश तवडकर, कला व संस्कृती मंत्री
...........
नवीन जिल्ह्यात होणारी कार्यालये
जिल्हाधिकारी मुख्यालय
जिल्हा पोलीस अधीक्षक मुख्यालय
इतर महत्त्वाच्या खात्यांची विभागीय कार्यालये
...........
नवीन जिल्ह्यातील तालुकानिहाय लोकसंख्या (२०११च्या जनगणनेनुसार)
सांगे ६५,१४७
काणकोण ४५,१७२
केपे ८१,१९३
एकूण १,९१,५१२
२०११ च्या जनगणनेवेळी धारबांदोडा तालुका अस्तित्वात नव्हता. तेव्हा धारबांदोडा भाग सांगे तालुक्यात होता. धारबांदोडा तालुक्यात फोंडा तालुक्यातील काही भागाचा समावेश आहे. त्यामुळे तिसऱ्या जिल्ह्याची लोकसंख्या २.१५ लाख असेल. लवकरच जनगणना होणार आहे. त्यानंतर अचूक लोकसंख्या समजू शकेल.
तिसऱ्या जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ : सावर्डे, केपे, कुडचडे, सांगे, काणकोण.
फेररचनेनंतर गोव्यात लोकसभा मतदारसंघांची संख्या वाढू शकते.
विधानसभेच्या जागाही फेररचनेनंतर वाढू शकतात
तिसरा जिल्हा झाल्यामुळे तिसरी जिल्हा पंचायतही तयार होऊ शकते.
तिसऱ्या जिल्ह्यात समाविष्ट होणारी गावे
धारबांदोडा : आगलोत, बांडोळी, कामरकोंडा, करंझोळ, कोडली, कुळे, कार्मोणे, धारबांदोडा, मोईसाल, मोले, पिळये, साकोर्डे, सांगोड, शिगाव, सोनावळी, सुर्ला
सांगे : आंतोरे, भाटी, भोमा, काले, कोळंब, कोंपराय, करंगिणी, कष्टी, कोठार्ली, कुंबरी, कुर्डे, डोंगर, डोंगुर्ली, दुदाळ, कुर्पे, मावळींगे, मुगुळी, नायकिणी, नेतुर्ली, नुंदे, ओडशेल, पाटीये, पोर्टी, पोर्टे, रिवण, रुंबरे, साळावली, सांगे, सांतान, सावर्डे, शिगणे, तोडू, उगे, वेर्ले, विंचुर्डे, विलीयण, शेळपे
केपे : आमोणा, अवेडे, असोल्डा, अडणे, आंबावली, बाळ्ळी, बेंदुर्डे, बार्शे, चायफी, कोठंबी, काकोडा, कावरे, कुर्डे, कार्ला, काजूर, कुडचडे, कुस्मणे, देव, फातर्पा, गोकुल्डे, होडार, मोरपिर्ला, मळकोपण, मळकर्णे, मायणा, मंगल, नाकेरी, नागवे, पाडी, पिर्ला, किटल, केडे, केपे, किसकोंडा, शिरवई, सुळकर्णे, तिळय, उंदर्णा, शेल्डे, शेळवण, शिक शेळवण, झानोडे
काणकोण : आगोंद, अंजदीव, काणकोण, चावडी, खोला, खोतीगाव, गावडोंगरी, लोलये, नगर्से-पाळोळे, पैंगीण.