गोवा वाचविण्यासाठी न्या. रिबेलोंच्या आवाहनाला विरोधी पक्षांचा पाठिंबा

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : शेती, पर्यावरण सांभाळण्यासह गोवा वाचविण्यासाठी लोकचळवळ उभारण्याची नितांत आवश्यकता आहे. यासाठी निवृत्त न्यायाधीशांप्रमाणे काही बुद्धीजिवी लोक पुढाकार घेत असतील, तर ती चांगली बाब ठरेल, अशा शब्दांत राज्यातील विरोधी पक्षांनी निवृत्त न्यायाधीश फेर्दिन रिबेलो यांच्या आवाहनाला पाठिंबा दिला आहे. काँग्रेस, गोवा फॉरवर्ड, आप व रिव्हॉल्युशनरी गोवन्स (आरजी) अशा सर्व विरोधी पक्षांनी फेर्दिन रिबेलो यांच्या आवाहनाला पाठिंबा दिला आहे.
गोव्यातील जमिनींची विक्री परप्रांतियांना होऊ नये, डोंगर कापणी बंद होऊन बेकायदा बांधकामांवर कारवाई करावी व सरकारी व खासगी नोकऱ्या गोमंतकीयांनाच मिळाव्यात या आरजीच्या प्रमुख मागण्या आहेत. निवृत्त न्यायाधीश फेर्दिन रिबेलो यांनी एक प्रकारे आरजीच्या मागण्यांनाच पाठिंबा दर्शवला आहे. काही दिवसांपूर्वी माझी त्यांच्याबरोबर या विषयावर चर्चाही झाली आहे. त्यांच्या आवाहनाचा गोमंतकीयांनी गंभीरपणे विचार करायला हवा, असे आरजीचे आमदार वीरेश बोरकर यांनी म्हटले आहे.
गोवा वाचविण्यासाठी लोकचळवळ व्हायलाच हवी. गोमंतकीयांना नोकऱ्यात प्राधान्य, जमीन विक्री बंद करणे, पर्यावरण व शेतीचे संवर्धन या गोष्टी गोवा वाचविण्यासाठी आवश्यक आहेत. येत्या निवडणुकीत हाच मुख्य मुद्दा असेल, असे गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष आमदार विजय सरदेसाई यांनी स्पष्ट केले आहे.
निवृत्त न्यायाधीश फेर्दिन रिबेलो यांचे आवाहन विचार करण्यायोग्य आहे. डोंगर कापून पर्यावरणाचा ऱ्हास करणे, जमिनीच्या प्रकारात फेरफार करणे हे प्रकार बंद व्हायला हवेत. सीआरझेडचे उल्लंघन, मांडवीतील कॅसिनो हटविण्यासाठी जन आंदोलन उभे राहिल्यास काँग्रेस पक्षाचा पाठिंबा असेल. गोमंतकीयांनी त्यांच्या आवाहनाचा गांभीर्याने विचार करायला हवा, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी म्हटले आहे.
विकासाच्या नावाखाली गोव्याची संस्कृती व पर्यावरणाचा जो ऱ्हास सुरू आहे, तो बंद व्हायलाच हवा. निवृत्त न्यायाधीश फेर्दिन रिबेलो यांनी लोकचळवळ उभारण्यासाठी दिलेली हाक योग्य आहे. त्यांना प्रत्येकाने पाठिंबा दिल्यास जनआंदोलन उभे राहण्यास वेळ लागणार नाही.
_ व्हेंझी व्हिएगस, आमदार, आप 
निवृत्त न्यायाधीश फेर्दिन रिबेलो यांनी गोवा वाचविण्यासाठी जाहीर केलेला कार्यक्रम हा आरजीच्या ध्येयधोरणाशी सुसंगत असाच आहे. त्यांच्या आवाहनाला माझा पाठिंबा असून गोवा वाचविण्यासाठी लोकचळवळ उभी राहायला हवी.
_ वीरेश बोरकर, आमदार, आरजी