उत्तर गोवा जिल्हा पंचायतीच्या अध्यक्षपदी रेश्मा बांदोडकर बिनविरोध

होंडाचे नामदेव च्यारी बनले उपाध्यक्ष : ११ सदस्यांची दांडी


30th December, 11:29 pm
उत्तर गोवा जिल्हा पंचायतीच्या अध्यक्षपदी रेश्मा बांदोडकर बिनविरोध

नवनिर्वाचित अध्यक्ष रेश्मा बांदोडकर आणि उपाध्यक्ष नामदेव च्यारी यांचे अभिनंदन करताना सदस्य. (कैलास नाईक)
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : उत्तर गोवा जिल्हा पंचायतीच्या अध्यक्षपदी रेश्मा संदीप बांदोडकर यांची, तर उपाध्यक्षपदी नामदेव च्यारी यांची बिनविरोध निवड झाली. मंगळवारी पणजीत गोमंतक मराठा भवनाच्या तिसऱ्या मजल्यावर निवडणुकीची प्रक्रिया करण्यात आली. अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी प्रत्येकी एकच अर्ज आल्याने निवडणूक अधिकाऱ्यांनी दोघांचीही बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली.
जिल्हा पंचायत निवडणुकीत रेश्मा बांदोडकर रेईस-मागूश मतदारसंघातून भाजपच्या उमेदवारीवर निवडून आल्या आहेत. नामदेव च्यारी यांनी भाजपच्या तिकिटावर होंडा मतदारसंघातून विजय मिळवला होता. नवनिर्वाचित अध्यक्ष रेश्मा बांदोडकर यांनी सांगितले की, जिल्हा पंचायतीच्या सर्वच सदस्यांच्या मतदारसंघांतील विकासकामे लवकर पूर्ण करण्याचा माझा प्रयत्न असेल. जिल्हा पंचायतीसाठी उपलब्ध होणारा फंड विकासकामांसाठी पुरेपूर वापरला जाईल यासाठी प्रयत्नरत राहीन. सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन काम केले जाईल. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, आमदार केदार नाईक, तसेच मतदारसंघातील सर्व सरपंच, उपसरपंच, पंच आणि कार्यकर्ते यांचे मी सदैव ऋणी असेन. पक्षाने सोपवलेली जबाबदारी प्रामाणिकपणे निभावण्याचा प्रयत्न करेन.
आमदार केदार नाईक यांनी उत्तर गोवा जिल्हा पंचायतीच्या नवनिर्वाचित अध्यक्ष रेश्मा बांदोडकर यांचे अभिनंदन केले. ते म्हणाले की, हिवाळी अधिवेशनात जिल्हा पंचायतीच्या फंडात वाढ करण्याची मागणी करणार आहे.
२५ पैकी ११ सदस्य गैरहजर
निवडणूक प्रक्रियेवेळी काँग्रेस, आरजी आणि अपक्ष सदस्यांनी अनुपस्थित राहणे पसंत केले. विशेष म्हणजे सत्ताधारी गटातील ६ सदस्यही काही कारणांमुळे गैरहजर राहिले. २५ पैकी फक्त १४ सदस्य उपस्थित होते.