अर्थ खात्याकडून निर्बंध : अनावश्यक खर्च टाळण्यासाठी उपाय

पणजी : अर्थ खात्याने विविध सरकारी खात्यांना (finance department of Goa) अर्थसंकल्पीय तरतुदींतील २५ टक्क्यांपेक्षा जास्त रक्कम खर्च करण्यास निर्बंध (restrictions on expenditure) घातले आहेत. हा आदेश ३१ मार्च २०२६ पर्यंत लागू असेल. तसेच चालू आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तीन महिन्यांत खात्यांना अर्थसंकल्पीय अंदाजित खर्चापेक्षा २० टक्क्यांहून अधिक रक्कम खर्च करता येणार नाही. अनावश्यक खर्च टाळण्यासाठी मार्च अखेरपर्यंत ठराविक वस्तू विकत घेण्यावर निर्बंध घातले आहेत. खात्याने नुकतेच याबाबत परिपत्रक जारी केले आहे.
खात्यांना पुढील सूचना मिळेपर्यंत नवीन पदे निर्माण करता येणार नाहीत. ३१ मार्च २०२६ पर्यंत फर्निचर, संगणक, प्रिंटर, झेरॉक्स, टेलिफोन अथवा फॅक्स मशीन, एसी, कार्यालयीन वाहने खरेदी करता येणार नाहीत. असे असले या कालावधीत खात्यांना कर्मचाऱ्यांचे वेतन, निवृत्ती वेतन, कर्जाची परतफेड इत्यादीसाठी वरील २५ टक्क्यांचा नियम लागू असणार नाही. सरकारच्या फ्लॅगशिप योजनांसाठी पुढील तीन महिन्यांपर्यंत ४० टक्केपर्यंत रक्कम खर्च करता येईल.
लेखा खात्याच्या संचालकांना वर नमूद केलेल्या साहित्याच्या खरेदीची कोणतीही बिले न स्वीकारण्याचा निर्देश देण्यात आले आहेत. खात्यांनी या कालावधीत वरील साहित्य खरेदी करून पुढील आर्थिक वर्षात बिले सादर केली, तरीही ती स्वीकारली जाऊ नयेत, असे परिपत्रकात स्पष्ट केले आहे. तातडीच्या खर्चाची गरज भासल्यास खात्यांनी अर्थ खात्याची विशिष्ट पूर्वपरवानगी घेऊनच निधी खर्च करावा, असेही परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
काटेकोरपणे पालन आवश्यक!
- खर्चाचे सुसूत्रीकरण करणे, अनावश्यक महसुली खर्चाला आळा घालणे, भांडवली खात्यांतर्गत विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून देणे आदींसाठी ही सूचना जारी करण्यात आली आहे.
- याद्वारे अर्थ खाते अन्य खात्यांना त्यांच्या गरजांचे योग्य मूल्यांकन करून बचत परत करण्यास प्रोत्साहित करत आहे.
- सर्व खाते प्रमुख आणि सचिवांनी या सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक असल्याचे परिपत्रकात नमूद केले आहे.