तूर्त दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांकडेच जिल्ह्याचा ताबा

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : राज्यात ‘कुशावती’ हा तिसरा जिल्हा स्थापन होऊन त्याची अधिसूचना जारी झाली आहे. नवीन जिल्ह्यासाठी जिल्हाधिकारी आणि तीन अतिरिक्त जिल्हाधिकारी असतील. या विषयीची स्वतंत्र अधिसूचना जारी झाली आहे. कार्यालये तसेच इतर यंत्रणा स्थापन होईपर्यंत तूर्त दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांकडेच तिसऱ्या जिल्ह्याचा ताबा राहणार आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले.
अधिसूचनेत तिसऱ्या जिल्ह्यात येणारे तालुके आणि गावे यांची नावे आहेत. सर्वपक्षीय बैठकीनंतर मंगळवारी सरकारने तिसऱ्या जिल्ह्याला मान्यता दिली होती. या जिल्ह्याचे नाव ‘कुशावती’ असेल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बुधवारी जाहीर केले. नूतन जिल्ह्यातील काणकोण, केपे, सांगे आणि धारबांदोडा या चार तालुक्यांतून ‘कुशावती’ नदी वाहते. त्यामुळे जिल्ह्याला ‘कुशावती’ नाव देण्याचा निर्णय झाला आहे, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्याचे मुख्यालय केपे येथे राहणार आहे. केपे येथे पूर्ण वेळ प्रशासकीय कार्यालये स्थापन होईपर्यंत दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांकडे या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारीपदाचा ताबा असेल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
काणकोण, धारबांदोडा येथून केपेसाठी थेट बस
काणकोण तसेच धारबांदोडा येथून केपे या जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्यासाठी थेट बसची व्यवस्था केली जाणार आहे. नव्या जिल्ह्यासाठी स्वतंत्र जिल्हा पंचायत असेल. या जिल्हा पंचायतीसाठी अध्यक्ष, उपाध्यक्ष असतील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
२४ तासांत तीन वेळा नामकरण
तिसरा जिल्हा स्थापन करण्याचे निश्चित झाल्यानंतर सुरुवातीला जिल्ह्याचे नाव ‘चंद्रपूर’ निश्चित करण्यात आले होते. सर्वपक्षीय बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्याचे नाव ‘अटल’ असे जाहीर केले. मात्र अटल नावावरून टीका होऊ लागल्यानंतर आता जिल्ह्याचे नाव ‘कुशावती’ घोषित करण्यात आले आहे.
...
कुशावती जिल्ह्यासाठी अधिकऱ्यांची नियुक्ती
कुशावती जिल्ह्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांसह इतर अधिकाऱ्यांची नियुक्ती सरकारने केली आहे.
जिल्हाधिकारी - एग्ना क्लीटस (आयएएस)
पोलीस अधीक्षक - टिकमसिंग वर्मा (आयपीएस)
उपवनसंरक्षक : संतोश कुमार रेड्डी (आयएफएस)
याशिवाय दीपक वायंगणकर (फॉरेस्ट सेटलमेंट अधिकारी), डॉ. मेडोरा डिकॉस्टा (प्रकल्प अधिकारी, डीआरडीए), वेल्टन तेलीस, प्रजीत चोडणकर (उपजिल्हाधिकारी), प्रसिद्ध नाईक (उपसंचालक, पंचायत), अवेलिना डिसा परेरा (उपजिल्हाधिकारी), रोहन लोलयेकर (उपजिल्हाधिकारी), गीता गावकर (उपसंचालक, आदिवासी कल्याण), श्रीनेत कोठावले (अतिरिक्त जिल्हाधिकारी), रमेश गावकर (अतिरिक्त जिल्हाधिकारी), विशाल कुंडईकर (अतिरिक्त जिल्हाधिकारी), मॅन्युएल बारेटो (अतिरिक्त पंचायत संचालक), दीपाली नाईक (प्रकल्प संचालक, डीआरडीए), शर्मिला गावकर (उपजिल्हाधिकारी - भूसंपादन)