पराभवाची समीक्षा न करता पालेकरांना ज्या पद्धतीने पदावरून हटवण्यात आले, ती प्रक्रिया अत्यंत चुकीची, अपारदर्शक आणि अपमानास्पद होती : परब

पणजी: नुकत्याच झालेल्या जिल्हा पंचायत निवडणुकीतील दारुण पराभवानंतर गोव्यातील 'आम आदमी पक्षा'त मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. पक्षाचे माजी संयोजक ॲड. अमित पालेकर आणि नवनियुक्त तात्पुरते संयोजक श्रीकृष्ण परब यांनी आपल्या पदासह पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. या दोन्ही नेत्यांनी पक्षाचे राष्ट्रीय निमंत्रक अरविंद केजरीवाल आणि गोवा प्रभारी आतिशी यांना आपले राजीनामा पत्र पाठवले असून, वैयक्तिक कारणास्तव हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले आहे.
काही दिवसांपूर्वीच जिल्हा पंचायत निवडणुकीच्या निकालात 'आप'ला मोठा फटका बसला होता. या पार्श्वभूमीवर पक्षाने अमित पालेकर यांची संयोजक पदावरून हकालपट्टी करून त्यांच्या जागी संघटन सरचिटणीस श्रीकृष्ण परब यांच्याकडे तात्पुरता पदभार सोपवला होता. मात्र, आता पालेकर, परब यांच्यासह पक्षाचे उपाध्यक्ष चेतन कामत आणि युवा अध्यक्ष रोहन नाईक यांनीही पक्षाला सोडचिठ्ठी दिली असून, या सामूहिक राजीनाम्यामुळे गोव्यात 'आप'समोर मोठे नेतृत्व संकट उभे राहिले आहे. पदाचा त्याग केल्याने 'आप'ची गोव्यातील संघटनात्मक बांधणी धोक्यात आली आहे.
आपल्या राजीनाम्यात पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचे कारण स्पष्ट करताना ॲड. अमित पालेकर म्हणाले की, पक्षाने मला लोकांचे प्रश्न मांडण्याची संधी दिली, त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. हा निर्णय मी रागाच्या भरात घेतलेला नसून आत्मसन्मानासाठी विचारपूर्वक घेतला आहे. पक्ष सोडला असला तरी यापुढेही जनतेच्या समस्या आणि अन्यायाविरुद्ध माझा लढा सुरूच राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली. २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत पालेकर हे पक्षाचे मुख्यमंत्रिपदाचा चेहरा होते, मात्र सांताक्रूझ मतदारसंघात त्यांना पराभव पत्करावा लागला होता.
दुसरीकडे, श्रीकृष्ण परब यांनी मे २०२५ मध्ये 'आरजीपी' सोडून 'आप'मध्ये प्रवेश केला होता. त्यांच्याकडे पक्षाची विस्कटलेली घडी बसवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती, परंतु त्यांनीही तडकाफडकी राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
राजीनाम्यात काय म्हणाले श्रीकृष्ण परब..
श्रीकृष्ण परब यांनी आपल्या राजीनाम्याचे सविस्तर विवेचन करताना पक्षाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अमित पालेकर यांना ज्या पद्धतीने पदावरून हटवण्यात आले, ती प्रक्रिया अत्यंत चुकीची, अपारदर्शक आणि अपमानास्पद असल्याचे त्यांनी म्हटले आहे. जिल्हा पंचायत निवडणुकीतील पराभवाचे ठोस विश्लेषण न करताच घाईने निर्णय घेतल्यामुळे कार्यकर्त्यांचे मनोबल खचले असून, युतीबाबतच्या संदिग्धतेमुळे पक्षात मोठे संभ्रमाचे वातावरण आहे. पक्षात उद्भवलेल्या स्थितीमुळे आपल्या तत्त्वांना बाधा येत असल्याने त्यांनी राजीनामा देणेच योग्य आहे, असे ते म्हणाले.
जिल्हा पंचायत निवडणुकीत 'आप'ने ५० पैकी ४२ जागा लढवल्या होत्या, मात्र केवळ एका जागेवर पक्षाला विजय मिळवता आला. या निवडणुकीत आरजीपी आणि गोवा फॉरवर्ड सारख्या स्थानिक पक्षांनी 'आप'पेक्षा सरस कामगिरी केली. बहुतांश मतदारसंघांत 'आप'ला मतांचा चार आकडी आकडाही पार करता आला नाही. या अपयशाचे खापर नेत्यांवर फुटल्याने पक्षांतर्गत वाद उफाळून आला आणि त्यातूनच हे मोठे राजीनामे सत्र सुरू झाल्याचे मानले जात आहे.