४०० वर्षांपासून उत्सव साजरा करण्याची प्रथा

वाळपई : गोळावली सत्तरी येथील श्री सिद्धेश्वर देवस्थानचा ‘भगूत’ उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दरवर्षी दोन वेळा हा उत्सव साजरा करण्यात येत असतो. गेल्या ४०० वर्षापासून हा उत्सव साजरा करण्याची प्रथा रुढ झाली आहे.
सिद्धेश्वर देवस्थानाच्या नावाने या गावाला विशिष्ट असा नावलौकिक प्राप्त झाला आहे. यामुळे दरवर्षी जुलै व जानेवारी महिन्यामध्ये साजरा होणाऱ्या या पारंपरिक भगूत उत्सवात भाविक मोठ्या प्रमाणात सहभागी होत असतात.
सिद्धेश्वर देवस्थानचा पारंपरिक भगूत उत्सवाला आगळीवेगळी अशी आख्यायिका आहे. ग्रामस्थांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, गेल्या ४०० वर्षांपासून ही परंपरा आजही अखंडितपणे सुरू आहे. या देवस्थानशी संलग्न असलेले भाविक यामध्ये उत्स्फूर्तपणे भाग घेत असतात.
ज्येष्ठ नागरिक देमगो खोत यांनी सांगितले की, काही वर्षांपूर्वी या गावातील एक नागरिक गावाच्या वस्तीपासून घनदाट जंगलामध्ये एका निर्जन ठिकाणी सातत्याने जात होता. यामुळे त्याच्या पत्नीला संशय आला म्हणून तिने त्याचा पाठलाग केला. घटनास्थळी पोहोचल्यानंतर पत्नीच्या बांगड्याचा आवाज आला. यामुळे सदर ठिकाणी वास्तव्य असलेला सिद्धेश्वर अदृश्य झाला. यावेळी त्याने सदर नागरिकाला वर्षातून दोनवेळा आपल्या सेवेसाठी येण्याची आज्ञा केली. यामुळे दरवर्षी दोन वेळा हा उत्सव साजरा करण्यात येत असतो.
उत्सवाचे आकर्षण म्हणजे घनदाट जंगलामध्ये असलेल्या एका निर्जनस्थळी जाऊन धार्मिक पूजन व इतर धार्मिक उपक्रम करण्यात येत असतात. त्यानंतर मांसाहारी जेवणाचा कार्यक्रम करण्यात येत असतो.
यंदा जवळपास एक हजारपेक्षा जास्त जणांनी या उत्सवामध्ये भाग घेतल्याचे खोत यांनी सांगितले.
गावामध्ये इतर प्रकारचे धार्मिक व पारंपरिक कार्यक्रम होत असतात. तरीसुद्धा या भगत उत्सवामुळे वेगळ्या प्रकारची ओळख या गावाला प्राप्त झाली आहे. यंदा या उत्सवामध्ये सकाळी देवळामध्ये धार्मिक नृत्य करून गावापासून जवळपास २ किलोमीटर अंतरावर जंगलामध्ये निर्मनुष्य ठिकाणी धार्मिक व पारंपरिक कार्यक्रम झाले. त्यानंतर सार्वजनिक सांगणे करून मांसाहारी जेवणाचा आनंद भाविकांनी घेतला. हा भगूत जुलै महिन्यामध्ये पुन्हा होणार आहे.
भगूत उत्सवावेळी भाविक आपल्या अडचणी सिद्धेश्वरासमोर मांडतात. त्या सुटल्यानंतर नवस फेडण्यासाठी या उत्सवांमध्ये भाविक भाग घेत असतात. आतापर्यंत अनेकांना अडचणींपासून सुटका करण्यासाठी सिद्धेश्वराच्या आख्यायिकाचा लाभ झालेला आहे, असे ज्येष्ठ नागरिक देमगो खोत यांनी सांगितले.