
पणजी : गोव्यातील (Goa) मोपा विमानतळावर (Mopa Airport) टॅक्सी चालकांना ’पीकअप अॅंड ड्रॉप’साठी जीएमआरने (GMR) लागू केलेले शुल्क अमान्य असून, त्याला टॅक्सी चालकांनी (Taxi Driver) तीव्र विरोध सुरू केला आहे. विरोध करण्यासाठी कोलवाळ येथे बुधवारी मोठ्या संख्येने टॅक्सी चालक एकवटले. संबंधित अधिकारिणीने आमचे प्रश्न सोडवावेत अशी मागणी त्यांनी केली.
यासंदर्भात टॅक्सी चालकांनी माहिती देताना सांगितले की, टॅक्सी चालकांना जीएमआर ‘पीकअप अॅंड ड्रॉप’साठी २१० रुपये शुल्क आकारत आहे व केवळ २ मिनिटांसाठी शुल्क आकारत आहे. ड्रॉप करण्यासाठी व पीकअपसाठी २ मिनिटांसाठी शुल्क आकारणे आम्हाला अमान्य असून, जगात कुठेही ड्रॉप करण्यासाठी शुल्क आकारले जात नाही तर पीकअपसाठी १० मिनिटांनंतर शुल्क आकारले जावे अशी आमची मागणी आहे. टॅक्सी चालकांना प्रवाशांना सोडण्यासाठी तेराशे ते चौदाशे रुपये मिळत असतात. त्यातील २१० रुपये जीएमआरला दिल्यास आम्ही काय खावे? असा प्रश्न टॅक्सी चालकांनी उपस्थित केला. सध्या, याठिकाणी जीएमआरची केवळ दादागिरी सुरू आहे व ती आम्हाला अमान्य असल्याचे टॅक्सी चालकांनी सांगितले. याठिकाणी मामलेदार व पोलीस असून, त्यांच्याबरोबर आमचे शिष्टमंडळ विमानतळ अधिकारिणीला भेटून प्रश्न मांडणार असल्याचे टॅक्सी चालकांनी सांगितले.