राज्य निवडणूक आयोगाची खासदार विरियातो यांनाच नोटीस

मडगाव : एसआयआर (SIR) अंतर्गत नागरिकांना ओळख सिध्द करण्यासाठी कागदपत्रांसह उपस्थित राहण्याच्या नोटीसा (Notice) पाठवण्यात येत आहे. अशीच नोटीस दक्षिण गोवा खासदार (South Goa Member of Parliament) कॅ. विरियातो फर्नांडिस यांनाही आली. वैध मतदारांची नावे वगळण्यासाठी हा उपक्रम असल्याचा चिंतेला हा पुष्टी देणारा प्रकार असल्याचे मत खासदार फर्नांडिस यांनी व्यक्त केले.
राज्य निवडणूक आयोगाकडून (State Election Commission) मतदार यादीत नाव कायम ठेवण्यासाठी ओळख सिद्ध करणार्या कागदपत्रांसह हजर राहण्याबाबत दक्षिण गोवा खासदार कॅ. फर्नांडिस यांना नोटीस पाठवण्यात आलेली आहे. राज्य निवडणूक आयोगाने २०२४ च्या झालेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान, प्रत्येक उमेदवाराची निवडणूक लढवण्यासाठी नाव मंजूर करण्यापूर्वी सर्व कागदपत्रांची पडताळणी करत प्रतिज्ञापत्रही घेतलेले आहे. यानंतरही लोकसभा निवडणूक दोन वर्षांपूर्वी लढवलेल्या व सध्याच्या खासदारांना निवडणूक आयोगाकडून कागदपत्रे पडताळणी व ओळख पटवण्यासाठी नोटीस दिलेली असल्याने समाजमाध्यमांतून विविध प्रतिक्रिया उमटू लागलेल्या आहेत. तसेच हा सर्व खटाटोप विरोधी पक्षांच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना व सरकारविरोधातील व्यक्तींचा लोकशाहीने दिलेल्या हक्कावर गदा आणण्यासाठी केला जात असल्याचा आरोप पुन्हा एकदा होऊ लागला आहे.
यावर खासदार कॅ. फर्नांडिस यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या १८ वर्षांच्या तरुणांना मतदानाचा हक्क देण्याच्या पुढाकारामुळे पात्र झाल्यानंतर १९८९ पासून मतदान करत आहे. भारतीय नौदलातील २६ वर्षांच्या सेवेदरम्यान, लोकसभा, विधानसभा, पंचायत किंवा जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये मतदान करण्यासाठी लष्करी नियुक्तीच्या दूरच्या ठिकाणांहून गोव्याला अनेकवेळा प्रवास केला आहे. मतदार पुर्ननिरीक्षण कार्यक्रमात एका खासदाराला अशाप्रकारे कागदपत्रांच्या छाननीला सामोरे जावे लागत असेल, तर सामान्य माणसाची काय अवस्था असेल, याची कल्पनाच केलेली बरी असेही खासदार फर्नांडिस म्हणाले. तसेच विरोधी पक्ष आणि स्वयंसेवी संस्था, नागरिकांनी निवडणूक आयोगाद्वारे वैध मतदारांची नावे वगळण्यासाठी आणि त्यांना मतदानाच्या लोकशाही प्रक्रियेत भाग घेण्यापासून रोखण्यासाठी एसआयआर प्रक्रिया राबवली जात असल्याबद्दल चिंता व्यक्त केलेली होती. त्या शंकेची पुष्टी करणारा हा प्रकार असल्याचे खासदार फर्नांडिस यांनी सांगितले.