
पणजीः गोव्यातील (Goa) करमळी मेगा प्रकल्पा (Karmali Mega Project) विरोधात झालेल्या आंदोलनाचा सूड घेण्यासाठी अॅड. भुवनेश्वर फातर्पेकर यांच्यावर हल्ला झाला. जो माणूस विरोधात बोलतो किंवा आवाज काडतो, त्याच्यावर अशा पद्धतीने हल्ला होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या विषयी मुख्यमंत्री (Chief Minister) डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे बोलून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करणार, असे सांत आंद्रेचे आमदार (Mla) वीरेश बोरकर यांनी सांगितले.
फातर्पेकर हे बुधवारी सकाळी दुचाकीने जात असताना या वाहनाने त्यांना धडक दिली. या घटनेत ते गंभीर जखमी होऊन सध्या गोवा वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेत आहेत. आमदार वीरेश बोरकर आणि आरजीपीच्या कार्यकर्त्यांनी त्याची विचारपूस केली. यावेळी बोरकर बोलत होते. फातर्पेकर करमळीच्या मेगा प्रकल्पा विरोधात आवाज उठवत होते आणि लोकांचा प्रश्न म्हणून त्यांनी हा विषय लावून धरला होता, असे बोरकर यांनी सांगितले.
फातर्पेकर जुने गोवा महामार्गावरील ‘अंडरपास’जवळ चढावावरून सकाळी १०.१५ वाजण्याच्या सुमारास दुचाकी घेवून जात होते. तेव्हा बाजूने एक वाहन आले व त्यांच्या स्कूटरला डाव्या बाजूने धडक देवून पळून गेले. पूर्ण गोवाभर अंदाधुंदीचा कारभार चालला असून, कायदा व सुव्यवस्थेची स्थिती बिकट झाल्या कारणाने कोण काय करील याचा नेम नाही, असा आरोप बोरकर यांनी केला.
दोन दिवसांपूर्वी आम्ही फातर्पेकर यांच्या नेतृत्त्वाखाली टीसीपीत मेगा प्रकल्पा विरोधात आंदोलन केले होते. काल आम्हाला काम बंद करण्याचा आदेश मिळाला आणि आज त्यांच्यावर हल्ला झाला. पोलिसांनी याविषयी चौकशी सुरू असल्याचे सांगितले आहे. या प्रकल्पाच्या विरोधात आवाज उठवल्याने, त्यांचा सूड घेतला, असा आरोप बोरकर यांनी केला.
फातर्पेकरांच्या डोक्याला, हाताला आणि कमरेला मार लागला. कोणीही विरोधात बोलतो, आवाज काढतो त्यांच्यावर अशाच प्रकारे हल्ले होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याच्या पुढे आवाज काढल्यास असेच हल्ले होणार काय याचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यावे. मी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे या घटनेची दखल घेऊन आवश्यक कारवाई करण्याची मागणी करणार, असे बोरकर म्हणाले.