लोटलीत क्रिकेट अकादमीसाठी २५ हजार चौ.मी. जागेस मान्यता; आक्षेपांसाठी एक महिन्याची मुदत

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
07th January, 01:16 pm
लोटलीत क्रिकेट अकादमीसाठी २५ हजार चौ.मी. जागेस मान्यता; आक्षेपांसाठी एक महिन्याची मुदत

पणजी : गुंतवणूक प्रोत्साहन मंडळातर्फे लोटली (Loutolim) येथे क्रिकेट अकादमी आणि क्रीडा संकुल (Cricket Academy and Sports Complex) उभारण्यासाठी २५ हजार चौरस मीटर जागा देण्यास मान्यता दिली आहे. येथे ‘मेसर्स व्हेंचर बिल्डिंग ड्रीम्स प्रायव्हेट लिमिटेड’ कंपनीतर्फे बांधकाम करण्यात येणार आहे. याशिवाय कुंकळळी येथे ‘मेसर्स शिर्डी स्टील री रोलर्स प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीला विस्तारासाठी १६ हजार, ३०९ चौ.मी. जागा देण्यात आली आहे. दोन्ही प्रकल्पांबाबत आक्षेप घेण्यासाठी एक महिन्याची मुदत देण्यात आली आहे. 

यानुसार लोटली येथील सर्व्हे क्रमांक ३२३/१- एफ (पार्ट) येथील ५,८०० तर सर्व्हे क्रमांक ३२३/१- डी येथील १९,२०० चौ.मी. जमीन गुंतवणूक प्रोत्साहन क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली आहे. याबाबत कंपनीने फेब्रुवारी २०२५ मध्ये अर्ज केला होता. कुंकळळी येथे ‘मेसर्स शिर्डी स्टील री रोलर्स प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनी उत्पादन वाढवण्यासाठी दोन नवीन यंत्र सामुग्री बसवणार आहे. यासाठी कंपनीने ऑक्टोबर २०२३ मध्ये अर्ज केला होता. याला मान्यता देण्यात आली आहे. यानुसार येथील सर्व्हे क्रमांक ३३८/१ (पार्ट) येथील १३ हजार ४०९ तर सर्व्हे क्रमांक ३३९/० (पार्ट) येथील २,९०० चौ.मी. जागा देण्यात आली आहे. 

वरील दोन्ही क्षेत्र गुंतवणूक प्रोत्साहन क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. जागेची घरपट्टी, इतर कर, शुल्क आणि इतर सर्व प्रकारच्या देय रकमेचे मूल्यांकन आणि वसुली करण्यासाठी गोवा गुंतवणूक प्रोत्साहन आणि सुलभता मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यानुसार या जागेसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांना घरपट्टी, इतर कर किंवा शुल्कासाठी पाच वर्षांची नुकसान भरपाई सरकारकडून देण्यात येईल. वरील जागेच्या संदर्भात गोळा केलेली घरपट्टी, इतर कर, शुल्क आणि इतर सर्व प्रकारची देय रक्कम त्वरित सरकारकडे जमा करावी लागेल.

हेही वाचा