कोलवाळ तुरुंगात मोबाईल जॅमर, सीसीटीव्ही बसवण्याचे आदेश

उच्च न्यायालय गंभीर : २० जानेवारीपूर्वी अहवाल देण्याचे निर्देश


08th January, 12:20 am
कोलवाळ तुरुंगात मोबाईल जॅमर, सीसीटीव्ही बसवण्याचे आदेश

प्रतिनिधी । गोवन वार्ता
पणजी : बारा वर्षीय मुलाच्या खून प्रकरणातील संशयिताने तुरुंगातून तक्रारदाराला फोन करून मानसिक त्रास दिल्याचा प्रकार समोर आला होता. याची दखल घेऊन गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयाने तुरुंग प्रशासनावर कठोर शब्दांत ताशेरे ओढले. कैद्यांकडून तुरुंगातून वापरण्यात येत असलेले मोबाइल फोन, चार्जिंग पॉईंट्ससह, अमलीपदार्थ तसेच इतर प्रकार रोखण्यासाठी मोबाईल जॅमर, सीसीटीव्ही कॅमेरे, सेल्युलर इन्स्पेक्शन सिस्टम, अशा उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. या संदर्भात तुरुंग उपअधीक्षकांना २० जानेवारीपूर्वी अंमलबजावणी अहवाल सादर करण्याचे निर्देश न्या. श्रीराम सिरसाट यांनी दिले.
डिचोली भागात २१ सप्टेंबर २०२४ रोजी खून झाला होता. संशयित चंदू पाटील याला मालकाने कामावरून काढले होते. त्या रागातून संशयित पाटीलने सहकारी अर्शद अलीच्या बारा वर्षीय भावाचा निर्घृण खून केला होता. या प्रकरणाची सुनावणी बाल न्यायालयात सुरू आहे. संशयित चंदूने बाल न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. त्यावेळी तक्रारदाराने न्यायालयात संशयित चंदू आपल्याला तुरुंगातून फोन करून खटल्यासंदर्भात चौकशी करत असल्याची माहिती लेखी स्वरूपात दिली. त्यात मोबाईल क्रमांक, फोन केलेल्या दिवसाची तारीख आणि वेळ यांची माहितीही दिली. याची दखल घेऊन न्यायालयाने तुरुंग प्रशासनाला कारवाईचे आदेश दिले. तुरुंग उपअधीक्षकांनी संशयित चंदूच्या कोठडीतून मोबाईल जप्त केल्याची माहिती देऊन त्याला ‘कारणे दाखवा’ बजावल्याचे सांगितले. संशयित चंदूने विशेषाधिकार बंद केल्याची माहिती दिली.
दरम्यान, बाल न्यायालयाने संशयित चंदूचा जामीन फेटल्यानंतर हे प्रकरण गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयात आले. सुनावणी दरम्यान संशयित चंदूच्याविरोधात दाखल तक्रारींची आणि संशयिताने तुरुंगातून तक्रारदाराला फोन करून मानसिक त्रास दिल्याचा प्रकार न्यायालयाच्या निदर्शनास आला. तुरुंगातील मोबाईल चार्जिंग पॉईंट्स व इतर गैरप्रकारही समोर आले. पीडितेच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करता येत नाही. तुरुंग प्रशासनाच्या ढिलाईमुळे गुन्हेगारांना प्रोत्साहन मिळते, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.


न्यायालयाने ओढलेले ताशेरे
कोलवाळ तुरुंगात संशयिताच्या कोठडीत चार्जिंग पॉईंट असणे गंभीर आहे.
हे अधिकाऱ्यांच्या संमतीशिवाय होणे शक्य नाही.
तुरुंगातून यापूर्वीही ड्रग्स, मोबाइल्स जप्त झाली आहेत.
तरीही गैरप्रकार रोखण्यासाठी ठोस पावले उचलली नाहीत.
नियमित तपास फक्त दिखावा आहे.
मोबाईल जॅमर, सीसीटीव्ही कॅमेरे, सेल्युलर इन्स्पेक्शन सिस्टम बसवा.
तुरुंग अधीक्षकांना दिलेले निर्देश
कोलवाळ तुरुंग प्रवेशद्वारावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवा.
सीसीटीव्ही अंतर्गत वैयक्तिक तपास करा.
कैदी आणि नातेवाईक यांच्या मुलाखत क्षेत्रात कॅमेरे लावा.
रोज कोठडीची तपासणी करा.
सीडीआर, टॉवर लोकेशन तपासा.
कोठडीतून चार्जिंग पॉईंट काढून टाका.
दैनंदिन सीसीटीव्ही फुटेज पेनड्राईव्हमध्ये जपून ठेवा.
उल्लंघनासाठी कठोर शिक्षा जाहीर करा.
कोठडीत चार्जिंग पॉईंट्स कसे बसवले याची चौकशी करा.
वरील उपाय तत्काळ लागू करा.