म्युच्युअल फंडात महिन्याला सरासरी ३९ हजार कोटींची गुंतवणूक

प्रतिव्यक्ती गुंतवणुकीत गोवा अव्वल : ऑक्टोबरमध्ये सर्वाधिक ४६ हजार ६२१ कोटींची गुंतवणूक


08th January, 12:01 am
म्युच्युअल फंडात महिन्याला सरासरी ३९ हजार कोटींची गुंतवणूक

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : मागील काही वर्षांत म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याचा पर्याय लोकप्रिय ठरत आहे. बँक खाते अथवा अन्य पारंपरिक पर्यायांतील गुंतवणुकीपेक्षा म्युच्युअल फंडमधून अधिक परतावा मिळत आहे. वर्ष २०२५ मध्ये गोव्यातून म्युच्युअल फंडमधील गुंतवणुकीचे एकूण मूल्य सुमारे ४.७७ लाख कोटी रुपये होते. याचाच अर्थ राज्यातून महिन्याला सरासरी ३९ हजार कोटी रुपये मूल्य असणारी गुंतवणूक झाली आहे.
मागील वर्षात जागतिक पातळीवरील युद्धे, अमेरिकेने लादलेले निर्बंध व अन्य कारणांमुळे म्युच्युअल फंड, शेअर बाजाराततील गुंतवणुकीवर काहीसा परिणाम झाला होता. मात्र जुलै २०२५ नंतर म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत पुन्हा वाढ झाली. गोव्याचा विचार करता २०२५ मध्ये सर्वाधिक ४६ हजार ६२१ कोटी रुपये गुंतवणूक ऑक्टोबर महिन्यात झाली होती. मार्च महिन्यात सर्वात कमी म्हणजेच ३६ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती.
राज्यात जुलैनंतर डिसेंबरपर्यंत प्रत्येक महिन्यात सरासरी ४० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक झाली. जानेवारी ते जून २०२५ मध्ये हीच गुंतवणूक ३६ ते ३९ हजार कोटी रुपयांच्या दरम्यान होती. वरील कालावधीत गोव्यातून ग्रोथ/ ईक्विटी स्कीममध्ये सर्वाधिक पैसे गुंतवण्यात आले. गोव्यातील प्रतिव्यक्ती गुंतवणूक २.६७ लाख रुपयांपर्यंत होती. प्रतिव्यक्ती गुंतवणुकीत गोवा देशात आघाडीवर होता, तर महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी राहिला. केंद्र शासित प्रदेशांत दिल्लीतील प्रतिव्यक्ती गुंतवणूक अधिक होती.
राज्यातील २.७० लाख लोकांची शेअर बाजारात गुंतवणूक
राष्ट्रीय शेअर बाजाराच्या (एनएससी) अहवालानुसार, नोव्हेंबर २०२५ अखेरीस राज्यातील २.७० लाख लोकांनी शेअर बाजारात गुंतवणूक केली आहे. नोव्हेंबरमध्ये राज्यातील २,४०० लोकांनी प्रथमच शेअर बाजारात गुंतवणूक केली. राज्यातील एकूण गुंतवणुकदारांपैकी ३३.१ टक्के महिला होत्या. याची राष्ट्रीय सरासरी २४.७ टक्के इतकी होती.