सरकारी कार्यालयांत वाढदिवस, ‘सेंड ऑफ’ पार्ट्यांवर बंदी

कार्मिक खात्याचा आदेश : शिस्त, वेळेचे पालन आवश्यक


07th January, 12:16 am
सरकारी कार्यालयांत वाढदिवस, ‘सेंड ऑफ’ पार्ट्यांवर बंदी

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : सरकारी कार्यालयांमध्ये वाढदिवस पार्टी, निरोप समारंभ, तसेच अन्य कोणत्याही प्रकारच्या पार्ट्या, खेळांचे आयोजन करू नये, अशी ताकीद कार्मिक खात्याने दिली आहे. याबाबत नुकतेच परिपत्रक जारी करण्यात आले आहे. कर्मचारी शिष्टाचार, शिस्त आणि वेळेचे पालन करतील याची जबाबदारी खाते प्रमुखांची असणार आहे. नियमभंग केल्यास खाते प्रमुखांवर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
परिपत्रकात म्हटले आहे की, सरकारी कर्मचारी कार्यालयाच्या वेळेत वाढदिवसांचे दीर्घकाळ चालणारे समारंभ, निरोप समारंभ, खेळ किंवा कार्यालयाच्या आवारात कोणतेही खासगी कार्यक्रम, अशा परवानगी नसलेल्या कामांमध्ये गुंतलेले असतात. ही बाब नुकतीच कार्मिक खात्याच्या निदर्शनास आणून देण्यात आली आहे. अशा कार्यक्रमांमुळे कामकाजात व्यत्यय येतो, उत्पादकतेत घट होते आणि कार्यालयात कामासाठी येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होते.
वैयक्तिक समारंभांमुळे कार्यालयाचा वेळ आणि जागेचा गैरवापर होत आहे. शासकीय कर्मचाऱ्यांचे असे वर्तन शासकीय सेवकाला अशोभनीय ठरते. असे वर्तन शिस्तभंगाच्या कारवाईस पात्र ठरते. सीसीएस (आचार) नियम, १९६४ च्या नियम ३ च्या उप-नियम (१) नुसार प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्याने नेहमीच संपूर्ण सचोटी राखणे, कर्तव्याप्रती निष्ठा राखणे आवश्यक आहे. त्याने शासकीय सेवकाला अशोभनीय ठरेल असे कृत्य करू नये.
नियमभंग झाल्यास खाते प्रमुखाविरुद्ध कारवाई
सर्व शासकीय खाती आणि कर्मचाऱ्यांनी वरील नियमाचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे. कार्यालयाची जागा आणि वेळेचा वापर केवळ प्रशासकीय काम आणि सार्वजनिक सेवेसाठीच केला जाईल, याची खात्री केली पाहिजे. सर्व खाते प्रमुखांनी शासकीय कर्मचारी अधिकृत कर्तव्ये पार पाडताना योग्य शिष्टाचार, शिस्त आणि वेळेचे पालन करतील याची खात्री करावी. अन्यथा संबंधित खाते प्रमुखाविरुद्ध दंडात्मक कारवाई सुरू केली जाईल, असे परिपत्रकात स्पष्ट केले आहे.