गुन्हा शाखेकडून मागणीसाठी न्यायालयात अर्ज

प्रतिनिधी । गोवन वार्ता
पणजी : नोकरीसाठी पैसे घेऊन ते आयएएस अधिकारी आणि अभियंत्याला दिल्याचा दावा संशयित पूजा नाईक हिने केला होता. या दाव्याच्या पडताळणीसाठी गुन्हा शाखेचे निरीक्षक दत्तगुरु सावंत यांनी पूजाची नार्को चाचणी करण्यासाठी पणजी येथील प्रथमवर्ग न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.
अलीकडेच पूजा नाईकने गौप्यस्फोट केला होता. २०१९ च्या मेगा भरती दरम्यान ६१३ उमेदवारांकडून सरकारी नोकरीसाठी घेतलेले १७.६८ कोटी रुपये एका आयएएस अधिकाऱ्याला आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या एका वरिष्ठ अभियंत्याला दिल्याचे तिने सांगितले होते. हे काम एका वरिष्ठ मंत्र्याच्या इशाऱ्यावरून केल्याचे पुरावे पोलिसांकडे असल्याचा दावाही तिने केला होता. त्यानंतर काही दिवसांनी तिने आयएएस अधिकारी निखिल देसाई आणि सार्वजनिक बांधकाम खात्याचे प्रधान मुख्य अभियंता उत्तम पार्सेकर यांना पैसे दिल्याचे तिने म्हटले होते. याच दरम्यान पूजाच्या विरोधात म्हार्दोळ पोलीस स्थानकात नोंद गुन्हा गुन्हा शाखेकडे वर्ग करण्यात आला. गुन्हा शाखेने पूजाची चौकशी केली. पूजाने आपण ‘नार्को टेस्ट’ देण्यास तयार असल्याचे निवेदन सोशल मीडियावर केले होते. दरम्यान, गुन्हा शाखेचे निरीक्षक दत्तगुरु सावंत यांनी पणजी येथील प्रथमवर्ग न्यायालयात पूजाच्या नार्को चाचणीसाठी अर्ज केला आहे.
अब्रूनुकसानीच्या दाव्याची सुनावणी १३ रोजी
नोकरीसाठी पैसे घेतल्याचा आरोप करून बदनामी केल्याप्रकरणी आयएएस अधिकारी निखिल देसाई यांनी पूजाला कायदेशीर नोटीस बजावली होती. पूजाने प्रतिसाद न दिल्यामुळे देसाई यांनी तिच्याविरोधात पणजी येथील प्रथमवर्ग न्यायालयात अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला आहे. या प्रकरणाची सुनावणी १३ जानेवारी रोजी होणार आहे.