देबानंद साना मृत्यूची मानवाधिकार आयोगाने घेतली दखल


06th January, 04:54 pm
देबानंद साना मृत्यूची मानवाधिकार आयोगाने घेतली दखल

पणजी : गोवा वैद्यकीय महाविद्यालयात (Goa Medical College) मृत्यू झालेल्या देबानंद साना प्रकरणाची मानवाधिकार आयोगाने (Human Rights Commission) ‘स्वेच्छा दखल’ घेतली आहे. आयोगाला यामध्ये कोणताही गैरप्रकार घडलेला नाही याची खात्री करायची आहे. यासाठी आयोगाने दक्षिण गोवा जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षकांना नोटीस जारी केली आहे. याबाबत १० मार्च पर्यंत चौकशी अहवाल सादर करण्याची सूचना आयोगाने केली आहे. 

याआधी २७ डिसेंबर रोजी ३४ वर्षीय देबानंद साना (मूळ कोलकाता) याचा गोमेकॉमध्ये उपचारदरम्यान मृत्यू झाला होता. त्याआधी २३ डिसेंबर रोजी वास्को येथे चोर समजून साना याला मारहाण झाल्याचा आरोपही करण्यात आला होता. येथील स्थानिकांना साना याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले होते. चौकशीनंतर साना मानसिक रुग्ण असल्याचे सांगत त्याला बांबोळी येथील 'इन्स्टिट्यूट ऑफ सायकियाट्री अँड ह्युमन बिहेवियर'मध्ये (आयपीएचबी) दाखल केले होते.

यानंतर त्याला आयपीएचबी मधून हलवून उपचारासाठी गोमेकॉमध्ये दाखल करण्यात आले होते. साना याचा मृत्यूनंतर काही दिवसांपूर्वी कोलकाता, पश्चिम बंगाल येथे त्याच्या कुटुंबीयांनी आंदोलन केले होते. साना याचा मृत्यू पोलिसांच्या ताब्यात असताना झाल्याचे आरोप कुटुंबीयांनी केले होते. पोलिसांनी त्याच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केल्याने साना याचा मृत्यू झाला; असा आरोप कुटुंबीयांनी केला. याबाबत चौकशी करण्याची मागणी देखील त्यांनी केली होती. 

याबाबत दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयाने २९ डिसेंबर रोजी मानवाधिकार आयोगाला दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, साना हा २३ डिसेंबर रोजी भुतेभाट, वास्को येथील एका घरावर चढला होता. तो संशयित आणि आक्रमक वागत असल्याने त्याला स्थानिकांनी पकडून नंतर पोलिसांच्या ताब्यात दिले. त्याची वैद्यकीय तपासणी करून त्याला आयपीएचबी दाखल करण्यात आले. त्याच्या मृत्यूची अनैसर्गिक मृत्यूची नोंद करून भारतीय न्याय संहिता कलम १९६ नुसार पुढील तपास सुरू आहे.

हेही वाचा