लुथरांच्या अटकपूर्व जामीन अर्जाविरोधात हस्तक्षेप याचिका

१३ रोजी निवाडा : बर्च क्लब बनावट आरोग्य दाखला प्रकरण

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
07th January, 11:25 pm
लुथरांच्या अटकपूर्व जामीन अर्जाविरोधात हस्तक्षेप याचिका

म्हापसा : हडफडे येथील ‘बर्च बाय रोमियो लेन’ (berch) या क्लबसाठी अबकारी खात्याचा परवाना मिळवण्यासाठी कांदोळी आरोग्य केंद्राचा बनावट दाखला वापरल्याने संशयित आरोपी लुथरा बंधूंच्या अटकपूर्व जामीन अर्जाविरोधात दिल्लीतील पीडित जोशी कुटुंबीयांनी हस्तक्षेप याचिका दाखल केली आहे. संबंधित अर्जावरील निवाडा म्हापसा अतिरिक्त सत्र न्यायालयाने १३ जानेवारीपर्यंत राखून ठेवला आहे.

न्यायालयात बुधवारी सायंकाळी या हस्तक्षेप अर्जावर सुनावणी झाली. हस्तक्षेप अर्जदार जोशी कुटुंबीयांचे वकील अॅड. विष्णू जोशी यांनी युक्तिवाद करताना सांगितले की, ज्या दिवशी लुथरा बंधू आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे बर्च क्लबसाठी उत्पादन शुल्क परवाना मिळवला, त्याच क्षणापासून बर्च क्लब दुर्घटनेचा मुद्दा निर्माण झाला.

संशयितांच्या बेफिकीरी व हलगर्जीपणामुळे २५ निष्पाप लोकांचे जीव गेले. यात जोशी कुटुंबियांचे चौघेजण मृत्युमुखी पडले. या दुर्घटनेतून वाचलेली एकमेव सदस्या भावना जोशी ही न्यायालयात उपस्थित आहे.

लुथरा बंधूंच्या वतीने असा दावा करण्यात आला आहे की, बनावट दाखल्याच्या प्रकरणातील अटकपूर्व जामीन अर्जात पीडित कुटुंबीय हस्तक्षेप करू शकत नाहीत. मात्र हा युक्तिवाद आश्चर्यकारक आहे. आम्ही पीडित असून आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे हा हस्तक्षेप अर्ज मान्य करावा, अशी विनंती अॅड. जोशी यांनी न्यायालयाकडे केली.

लुथरा बंधूंच्या वकिलांनी युक्तिवाद करताना सांगितले की, पीडित कुटुंबीय बनावट दस्तऐवज प्रकरणात हस्तक्षेप याचिका दाखल करू शकत नाहीत. या प्रकरणाशी त्यांचा थेट संबंध नाही. जोशी कुटुंबीयांनी सादर केलेला अर्ज सर्वसाधारण स्वरूपाचा असून फिर्यादींची भूमिका गंभीर स्वरूपाची नाही. अर्जामध्ये संबंधित अर्जदारांची नावेही नमूद नाहीत तसेच विरोधाची ठोस कारणेही दिलेली नाहीत. बनावट एनओसी प्रकरणात, अर्जदार स्वत:ला पीडित म्हणू शकत नाहीत. ही कागदपत्रे बनावट करण्याच्या कथित गुन्ह्यामध्ये पीडित कुटुंबावर कोणताही परिणाम झालेला नाही. त्यामुळे या प्रकरणात हस्तक्षेप करण्याचा त्यांना कायदेशीर अधिकार नाही.

दोन्ही पक्षाचे युक्तिवाद ऐकल्यानंतर, या अर्जावरील निवाडा येत्या १३ जानेवारी रोजी दिला जाईल, असे न्यायाधीश द्विजपल पाटकर यांनी आदेश देत तोपर्यंत सुनावणी तहकूब केली.

जोशी कुटुंबाची न्यायासाठी भावनिक साद

बर्च दुर्घटनेतून वाचलेल्या भावना जोशी यांच्यासह त्यांचे चार नातेवाईक आपल्या मृतकांच्या प्रतिमा घेऊन सुनावणी संपेपर्यंत खुल्या कोर्ट रुममध्ये उभे होते. गेल्या काही सुनावणीवेळी हजर राहून याप्रकरणातील संशयितांचा जामीन किंवा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर होऊ नये म्हणून हे कुटुंब न्यायालयाकडे मागणी करीत आहे. 

रेडकर, बागकर यांना दिलासा नाहीच!

हडफडे नागवाचे अपात्र सरपंच रोशन रेडकर आणि सरकारी सेवेतून बडतर्फ केलेले पंचायत सचिव रघुवीर बागकर यांना अंतरिम दिलासा देण्यास गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी नकार दिला. दरम्यान, या प्रकरणाची पुढील सुनावणी शुक्रवार ९ रोजी ठेवली आहे. दोघांचा शोध हणजूण पोलीस घेत आहेत. न्यायालयाने अटकपूर्व अर्ज फेटाळल्यापासून दोघेही भूमिगत आहेत. 

हेही वाचा