२०२५ मध्ये दक्षिणेत अपघातांच्या संख्येत ५ टक्क्यांनी घट

राजेंद्र प्रभुदेसाई : विनाहेल्मेट, अतिवेगाने गाडी चालवणार्‍यांवर लक्ष

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
07th January, 11:16 pm
२०२५ मध्ये दक्षिणेत अपघातांच्या संख्येत ५ टक्क्यांनी घट

मडगाव : दक्षिण गोव्यात २०२४ मध्ये १,३०१ तर २०२५ मध्ये १,२३६ अपघातांची (accident) नोंद आहे. तुलनेने २०२५ मध्ये ६५ प्रकरणे कमी झाली असून ५ टक्के कमी अपघातांची नोंद आहे, अशी माहिती दक्षिण गोवा वाहतूक पोलीस उपअधीक्षक राजेंद्र प्रभुदेसाई यांनी दिली. यावर्षी विनाहेल्मेट व अतिवेगाने गाडी चालवणार्‍यांवर लक्ष दिले जाईल. अपघात दहा टक्क्यांनी कमी आणण्याचे उद्दिष्ट राहील, असेही त्यांनी सांगितले.

दक्षिण गोव्यातील अपघातांबाबत माहिती देताना प्रभुदेसाई यांनी सांगितले की, दक्षिण गोव्यात अपघाती मृत्यू झाल्याची १२२ प्रकरणे असून यात ५.४ टक्के कमी आली आहे. अपघाती मृत्यू झालेल्यांची संख्या २०२४ मध्ये १३९ होती व २०२५ मध्ये ही संख्या १२८ झालेली असून ११ अपघाती मृत्यू कमी झाले आहेत. यात ७.९ टक्के कमी आली आहे. गंभीर जखमी अपघाताची प्रकरणे सहाने वाढली असून यात ३ टक्के वाढ आहे. अपघाती मृत्यूची वेर्णात दोन, वास्कोत सहा, मुरगावात सहा अशी वास्को वाहतूक पोलीस क्षेत्रात १४ प्रकरणे वाढली. फोंडा क्षेत्रात चार तर म्हार्दोळ परिसरात दोन प्रकरणे वाढली आहेत.

२०२४ पेक्षा २०२५ मध्ये ७९,३५८ चलन प्रकरणे कमी झाली आहेत. अपघाती मृत्यू व अपघात कमी होण्यावर लक्ष देण्यात आले होते. वेगाने गाडी चालवणे २०२४ मध्ये १०,६५० प्रकरणे, २०२५ मध्ये १५,७८३ प्रकरणे नोंद आहेत. यात ५,१३३ वाढ आहे. हेल्मेटशिवाय गाडी चालवणे २०२४ मध्ये १६,७२२ तर २०२५ मध्ये २४,९४९ प्रकरणे नोंद आहेत. यात ८,२२७ प्रकरणे वाढलेली आहेत.

वेर्णा, फोंडा, मायना कुडतरीत अपघातांत वाढ

२०२५ मध्ये वेर्णा परिसरात १६७, फोंड्यात १६७ तर मायना कुडतरीत १२१ अपघात झाले होते. फोंडा २२, वेर्णा १९ व मायना कुडतरीत १३ अपघाती मृत्यू झाले आहेत. वेर्णा, फोंडा व मायना कुडतरी पोलीस ठाण्याच्या परिक्षेत्रात अपघातात वाढ झाल्याचे दिसून आल्याने यावर लक्ष दिले जाणार आहे.

फोंडा, फातोर्डात बस अपघात जास्त

बस अपघात फोंडा व फातोर्डा परिसरात जास्त होतात. फोंडा ११ व फातोर्डा येथे १० बस अपघातांची नोंद आहे. ट्रक अपघात फोंडा येथे १९ तर, म्हार्दोळमध्ये २० झाले आहेत. याशिवाय कुंकळ्ळी व वेर्णा याठिकाणी ट्रक अपघात नोंद असून ही औद्योगिक वसाहतीची क्षेत्रे असल्याने ट्रकांच्या वाहतुकीवर लक्ष दिले जाणार आहे. स्पीडगार्ड व इंटरसेप्टर गाड्यांची नेमणूक या भागात केली जाईल, असे प्रभुदेसाई यांनी सांगितले.

अतिवेग, विनाहेल्मेट ही अपघाती मृत्यूची कारणे

राज्यातील अपघातांच्या आकडेवारीनुसार, जास्त अपघात शनिवारी १७ टक्के व रविवारी १५.४६ टक्के झाले आहेत. यातील १,२६४ हे दिवसा तर ८५६ अपघात रात्रीच्यावेळेला झाल्याचे दिसून आले. जास्त अपघात सायंकाळी ७ ते ८ वाजेपर्यंत होतात. ५९.०६ टक्के दुचाकींचे अपघाती मृत्यू झाले आहेत. सरळ रस्त्यावर केवळ वेगाने गाडी चालवल्याने ७१ टक्के अपघात तर वळणाच्या ठिकाणी १८.७९ टक्के अपघात झाले. अतिवेग व हेल्मेट न घालणे ही दक्षिण गोव्यातील अपघाती मृत्यूंची मुख्य कारणे राहिलेली आहेत.

२०२४ च्या तुलनेत २०२५ मध्ये चलन देण्याची संख्या कमी झाली आहे व अपघातांची संख्याही कमी झाल्याचे दिसते. चलन वाढवल्यास अपघात कमी होतात हा समज चुकीचा ठरतो. कोणत्या वेळी, कोणत्या ठिकाणी व कोणत्या नियमांसाठी चलन देण्यात येते, यावर अपघातांची संख्या कमी होते. त्यानुसार, १० टक्के अपघात कमी होण्यावर लक्ष देण्यात येणार आहे, असे राजेंद्र प्रभुदेसाई यांनी सांगितले. 

 

हेही वाचा