वेबसाईटवरून लग्न जुळविण्याच्या नादात गमावले तब्बल १.४१ कोटी

सत्तरी तालुक्यातील ५८ वर्षीय व्यक्तीची फसवणूक : नागपुरातून युवकाला अटक

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
06th January, 09:34 pm
वेबसाईटवरून लग्न जुळविण्याच्या नादात गमावले तब्बल १.४१ कोटी

पणजी : वधू शोधण्यासाठी वधू-वर सूचक संकेतस्थळावर नोंदणी​ करणे ५८ वर्षीय व्यक्तीला चांगलेच महागात पडले. वधू तर मिळाली नाहीच, उलट ‘समसिया बेगम’ हे नाव धारण केलेल्या व्यक्तीने फाॅरेक्स ट्रेडिंगचे आमिष दाखवून तब्बल १.४१ कोटींचा गंडा घातला. त्यानंतर भानावर आलेल्या त्या व्यक्तीने गोवा पोलिसांच्या सायबर विभागात धाव घेतली. सायबर विभागाने तपासाची सूत्रे गतिमान करत नागपूर येथून एका २३ वर्षीय युवकाला अटक केली. त्याच्या खात्यात १.४१ कोटींपैकी ९.९९ लाख रुपये जमा झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

सायबर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, वाळपई - सत्तरी येथील दाऊद नूर खान यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, तक्रारदाराने वधूसाठी एका भारतीय मुस्लीम वधू-वर सुचक संकेतस्थळावर नोंदणी केली होती. त्यानुसार, एका ‘समसिया बेगम’ हे नाव धारण केलेल्या महिलेने तक्रारदाराशी संपर्क साधला. सदर महिलेने तक्रारदाराला फाॅरेक्स ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतवल्यास जादा मोबदला देण्याचे आमिष दाखवले. त्यासाठी तक्रारदाराला www.m.fxpro.com या संकेतस्थळावर नोंदणी करण्यास भाग पाडले. त्यानुसार, तक्रारदाराला सदर महिलेसह इतरांनी वॉट्सअॅप, टेलिग्राम या सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्क साधून विविध बँकेच्या खात्यात सुमारे १ कोटी ४१ लाख ६४ हजार ८९४ रुपये जमा करण्यास भाग पाडले. याच दरम्यान सदर महिलेने तक्रारदारांशी संपर्क तोडला. तक्रारदाराला आपली फसवणूक झाल्याचे समोर आल्यानंतर त्याने सायबर विभागाकडे तक्रार दाखल केली. सायबर विभागाने गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. याच दरम्यान नागपूर येथील एका व्यक्तीच्या बँक खात्यात वरील रकमेतील ९.९९ लाख जमा झाल्याचे समोर आले. पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता आणि साहाय्यक अधीक्षक बी. व्ही. श्रीदेवी यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक दीपक पेडणेकर यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक नवीन नाईक, कॉ. आशिष नाईक, सिद्धेश पाळणी आणि महेश गावडे हे पथक नागपूरला रवाना करण्यात आले. पथकाने नागपूर (महाराष्ट्र) मधून संशयित ऋषभ हनवाळे (२३, नागपूर) याला अटक करून गोव्यात आणले. त्याची चौकशी केली असता, देशातील १९ गुन्ह्यांत त्याचा सहभाग असल्याचे समोर आले.


हेही वाचा