धिरयोवर आळा आणण्यात कोलवा पोलीस अपयशी

मडगाव : सुरावली येथे बुधवारी धिरयोचे आयोजन करण्यात आले होते. यावरून कोलवा पोलीस कारवाई करण्यात अपयशी ठरत असल्याचे दिसून आले. जिल्हा प्रशासनाकडून स्थापन समिती घटनास्थळी पोहोचताच सुरावली येथील धिरयो आयोजकांसह बघ्यांची गर्दी पांगली.
धिरयो आयोजन करणे हा कायद्याने गुन्हा आहे. मात्र, सासष्टीच्या किनारपट्टी भागात सर्रासपणे धिरयोचे आयोजन होत असून व्हिडिओ व्हायरल होत आहेत. कोलवा पोलिसांकडून कारवाई केली जात नसल्याचा आरोप स्थानिकांकडून होत आहे. डिसेंबर महिन्यात कोलवा परिसरात धिरयोचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर ३ जानेवारी रोजी कोलवा परिसरात पुन्हा एकदा धिरयोचे आयोजन करण्यात आले. त्याचे व्हिडिओ व्हायरल झाल्यावर कोलवा पोलिसांकडून दोघा आयोजकांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मात्र, अजूनही त्यांची ओळख पटलेली नाही. त्यातच बुधवारी पुन्हा एकदा धिरयोचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून स्थापन करण्यात आलेल्या समितीला मिळाली.
मामलेदार गौरव गावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथक घटनास्थळी पोहोचताच सुरावली येथे आयोजित करण्यात आलेली धिरयो बंद करण्यात आली. धिरयोसाठी जमा झालेली गर्दी झुंजी बंद झाल्यावर माघारी निघाली. सासष्टी तालुक्यासह दक्षिण गोवामधील धिरयो बंद होण्यासाठी काही महिन्यांपूर्वी दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश जारी करत त्यानंतर समितीही स्थापन केली होती. मात्र, त्यानंतरही धिरयो सुरू आहेत. याचा प्रत्यय बुधवारी पुन्हा आल्याने कोलवा पोलिसांसह जिल्हा प्रशासन धिरयो बंद करण्यात अपयशी ठरल्याचे दिसून आलेले आहे. कोलवा पोलीस कुणाच्यातरी दबावाखाली काम करत आहेत, असा आरोप सध्या होत आहे.
जिल्हाधिकाऱ्यांकडून धिरयोची दखल
धिरयो आयोजनाची दखल दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली आहे. दक्षिण गोवा अतिरिक्त जिल्हाधिकारी रमेश गावकर यांनी पुन्हा नव्याने आदेश जारी करत कोलवा पोलिसांना धिरयो प्रकरणात उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन व्हावे, धिरयो आयोजक, जमिनीचा मालक यासह पाहण्यास आलेल्याची माहिती घ्यावी, असे सांगतानाच कडक कारवाईचे निर्देश दिले आहेत.