मकबूल खान प्राणघातक हल्लाप्रकरणी पाच संशयितांची निर्दोष मुक्तता

२०१८ मधील घटना : सबळ पुराव्यांअभावी संशयाचा फायदा

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
04th January, 11:26 pm
मकबूल खान प्राणघातक हल्लाप्रकरणी पाच संशयितांची निर्दोष मुक्तता

मडगाव : दवर्लीतील मकबूल खान याच्यावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणात अटक केलेल्या संशयित राजू तलवार, विपुल पट्टारी, सादिक शेख, दामोदर नाईक, उन्वन देशनूर यांना सबळ पुराव्यांअभावी संशयाचा फायदा देत निर्दोष मुक्त करण्यात आले.

मडगाव अग्निशमन दलाच्या कार्यालयानजीक दवर्ली येथील रहिवासी मकबूल खान याला मारहाण करण्यात आली होती. ही घटना १५ जुलै २०१८ मध्ये घडली होती. या प्रकरणी मडगाव पोलिसांनी संशयित राजू तलवार (३४, रा. खारेबांध), विपुल पट्टारी (२१, रा. शिरवडे), सादिक शेख (२०, रा. खारेबांध), दामोदर नाईक (२६, रा. खारेबांध) व उन्वन देशनूर (२२, शिरवडे) यांना अटक केली होती. या पाच जणांवर बेकायदा जमाव करणे, शस्त्राचा वापर करत दंगा करणे, दुखापत करणे, खुनाचा प्रयत्न केल्याचे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले होते. संशयितांनी मकबूल खान याच्यावर गँगमधील पूर्ववैमनस्यातून हल्ला केला होता. मकबूल याच्या पाठीवर कोयत्याने तसेच पोटात चाकूने वार करण्यात आले होते. मारहाणीच्या घटनेनंतर संशयित कर्नाटक येथे पळून गेले होते.

मडगाव पोलिसांनी येल्लापूर येथून त्यांना ताब्यात घेत अटक केली होती.

याप्रकरणी दक्षिण गोवा जिल्हा सत्र न्यायालयात न्यायाधीश पूजा कवळेकर यांच्या न्यायालयात झालेल्या सुनावणीवेळी न्यायालयाने सबळ पुराव्यांअभावी संशयितांची मुक्तता केली आहे.

फिर्यादीला शस्त्र ओळखण्यात अपयश

न्यायालयात फिर्यादीने सुरुवातीला कोयत्याने हल्ला झाल्याचे सांगितले. पण न्यायालयात त्याला शस्त्राची ओळख पटवता आली नाही. तसेच हत्याराबाबत स्पष्टता नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आले. केवळ फिर्यादीच्या साक्षीवर संशयितांना दोषी ठरवता येणार नाही, कारण त्यांच्याविरोधात सबळ पुरावा नाही, असे मुद्देही न्यायालयाने आदेशात नमूद केले आहेत. सबळ पुरावे नसल्याने संशयाचा फायदा देत पाचही संशयितांना न्यायालयाने गुन्ह्यातून मुक्त केले.