बोर्डा येथे कार अडवून मारहाण प्रकरणी पाच संशयित दोषी

परिविक्षा कालावधीत चांगले वर्तन राखण्यासह दंड

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
02nd January, 11:41 pm
बोर्डा येथे कार अडवून मारहाण प्रकरणी पाच संशयित दोषी

मडगाव : बोर्डा मडगाव येथे २०१९ मध्ये विश्वास गुरव यांची कार अडवून शिवीगाळ करणे व मारहाण केल्याप्रकरणी पाच संशयितांना बेकायदा जमाव, शस्त्रे घेऊन दंगा करणे, बेकायदेशीपणे अडवणे, अवमान करत दुखापत करणे अशा गुन्ह्यांसाठी दोषी ठरवले आहे. परिविक्षा कायद्यानुसार एक वर्षासाठी चांगले वर्तन राखणे, १५ हजारांचे हमीपत्र व तेवढ्याच रकमेच्या हमीदाराच्या अटीवर सुटका करण्यात आली आहे.

बोर्डा मडगाव येथील स्वरुची शोरुमच्या समोरील रस्त्यावर २० मे २०१९ रोजी दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास पाच संशयितांनी विश्वास गुरव (रा. दवर्ली) यांना अडवून मारहाण केली. विश्वास गुरव हे आपल्या ह्युंदाई गाडीने जात असताना संशयित आफताब सवनूर (रा. हाऊसिंग बोर्ड, घोगळ), समीर अहमद अगसनहल्ली (रा. दवर्ली, नावेली), इम्तियाज कमदोड (हाऊसिंग बोर्ड, रुमडामळ), संजय कोडगणवार (रा. हाऊसिंग बोर्ड, घोगळ), जाफर तिलावली (रा. हाऊसिंग बोर्ड, घोगळ) यांनी दुचाकी आडवी घालून त्यांना पुढे जाण्यापासून अडवले. गुरव यांना शिवीगाळ करत विटांसह डस्टरने मारहाणही केली. याप्रकरणी फातोर्डा पोलिसांनी संशयितांविरोधात गुन्हा नोंद केला होता. दक्षिण गोवा जिल्हा न्यायालयातील सुनावणीवेळी संशयितांना बेकायदा जमाव करणे, धारदार शस्त्रे घेऊन दंगा करणे, बेकायदेशीपणे अडवणे, शांतता भंग करण्याच्या उद्देशाने अवमान करणे, दुखापत करणे यासाठी दोषी ठरवण्यात आले तर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपातून मुक्त केले होते.

दक्षिण गोवा जिल्हा सत्र न्यायालयात न्यायाधीश पूजा कवळेकर यांच्या न्यायालयात झालेल्या सुनावणीवेळी संशयितांना दोषी ठरवण्यात आलेले असले तरीही परिविक्षा कायद्यातील तरतुदीनुसार १५ हजारांचे वैयक्तिक हमीपत्र व तेवढ्याच रकमेचा एक स्थानिक हमीदार सादर केल्यावर सुटका करण्यात येईल. तसेच एका वर्षाच्या परिविक्षा कालावधीत संशयितांना शांतता राखणे तसेच कोणत्याही गुन्ह्यात सहभाग न होण्याच्या अटींचे पालन करावे लागणार आहे.

नुकसान भरपाईची रक्कम जमा करा!

न्यायालयाने घालून दिलेल्या अटींचे पालन न केल्यास संशयितांना बोलावून घेत दिलेली शिक्षा भोगावी लागेल. याशिवाय सदर नुकसान भरपाईची रक्कम संशयितांनी महिनाभराच्या कालावधीत जमा करावी. अन्यथा न्यायालयाकडून निश्चित शिक्षा भोगावी लागणार असल्याचे आदेशात नमूद आहे.