नात्यांपलीकडची माया

रक्ताच्या नात्यापलीकडे जाऊन मायेची पाखर घालणाऱ्या एका 'आई'ची ही हृदयस्पर्शी आठवण. गरिबीतही दुसऱ्याच्या मुलीवर पोटच्या मुलासारखेच प्रेम करणाऱ्या त्या माऊलीचा आणि तिच्या निखळ प्रेमाचा हा एक भावनिक प्रवास आहे.

Story: ललित |
2 hours ago
नात्यांपलीकडची माया

काय कोणास ठाऊक, एक वेगळंच नातं होतं माझं तिच्यासोबत. भेट वर्षातून दोन-तीनदा व्हायची, ती सुद्धा ठराविक सणांना. दिवाळीची सुट्टी होती, मनात आलं तिच्याकडे राहायला जायचं. या गोष्टीला कमीत-कमी बारा-पंधरा वर्षे झाली असणार. महाराष्ट्रातल्या एका छोट्याशा गावात ती राहायची. जिथे ती राहायची तिथे जेमतेम चार-पाच घरं होती, ती सुद्धा लांब अंतरावर. तिला एक मुलगी व एक मुलगा, वयाने माझ्याहून एक-दोन वर्षांनी मोठे. तिने घर बांधलं होतं; नवीन घर असल्यामुळे प्रत्येक गोष्ट किंवा वस्तू तिथे नव्हती. त्याकाळी कामाला गेलं तरी तेवढा पगार मिळत नसायचा, की त्यातून प्रत्येकाच्या गरजा भागाव्यात. ती कामाला जायची, मात्र त्या पगारातून तिचा स्वतःचाच खर्च सुटत नसायचा. आज ना उद्या पगारात वाढ होईल, या एका आशेवर ती कामाला जायची. जिथे ती राहायची तिथे येण्या-जाण्यासाठी तेवढ्या गाड्या नव्हत्या, त्यामुळे तिला कामावर येण्या-जाण्याचा त्रास व्हायचा.

असंच मनात आलं की तिच्या घरी राहायला जावं. एक-दीड तासाची वाट संपली व मी तिच्या घरी पोहोचले. घरात पाऊल टाकलं आणि आवाज दिला तर तिची मुलं बाहेर आली. माझे डोळे तिला शोधत होते, मात्र मग कळालं की ती कामाला गेली आहे आणि संध्याकाळपर्यंत घरी येईल. थोडा वेळ असाच गेला, संध्याकाळ होत होती. अंगणात त्यांच्या शेजारची आणखी दोन-चार मुलं खेळायला आली. कदाचित ती रोज खेळत असणार. त्यांची व माझी ओळख झाली व खेळायला सुरुवात झाली. खेळता-खेळता एक रिक्षा रस्त्यावर येऊन थांबली. खेळ चालू असल्याकारणाने तिकडे फारसं लक्ष गेलं नाही, मात्र कोणीतरी प्रवासी उतरत होते हे नक्की. खेळता-खेळता पाठीमागे वळून पाहिलं तर ती 'तीच' होती! रस्त्यावरून खाली उतरत होती. माझी नजर तिच्याकडे गेली आणि काय कोणास ठाऊक, ती दिसताक्षणी चेहऱ्यावर एक वेगळंच हास्य आलं आणि मी एकटक तिच्याकडे बघत उभी राहिले. ती आली, तिने आमच्यावर एक नजर टाकली व घराच्या पायऱ्या चढण्यासाठी थोडीशी वळली. त्याक्षणी माझ्या हसऱ्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह आलं. असं कसं होऊ शकतं? माझं सोडाच, तिची दोन मुलंसुद्धा आश्चर्याने माझ्याकडे पाहत राहिली. त्यांनासुद्धा तोच प्रश्न पडला होता, की आपली आई हिला (मला) बघून काहीही न बोलता कशी जाऊ शकते? इतक्यात पायऱ्या चढणारी ती अचानक पाठीमागे वळली. तिची नजर माझ्यावर पडली, तोंडातून एकही शब्द बाहेर आला नाही मात्र डोळ्यांतून अश्रू आले. तिच्या हातात असलेली पिशवी तिने खाली ठेवली नाही, तर ती तिच्या हातातून कधी सुटून खाली पडली हे तिला समजलेच नाही. वाहत असलेल्या अश्रूंनिशी ती माझ्याकडे आली. जसं लहान मुलाला आपण उचलून घेतो व घट्ट पकडतो, अगदी त्याच पद्धतीने तिने मला उचलून घेतलं व घरात आणलं. आजूबाजूची मुलं आमच्याकडे बघत राहिली. तसंच मला घेऊन ती घरात आली व आपल्या मांडीवर घेऊन बसली. खूप वेळ ती मला घेऊन बसली होती; गप्पा मारल्या, घरच्यांची चौकशी केली. ती अनेकदा म्हणाली, की “अजून माझा विश्वास बसत नाहीये की तू माझ्या मांडीवर बसली आहेस.”

जेवढे दिवस कामाला हजेरी लागायची, तेवढाच पगार मिळायचा. असं असूनसुद्धा माझ्यासाठी ती पंधरा दिवस कामाला गेली नाही. मला काय आवडतं, काय नाही, हे तिला बरोबर माहीत होतं. मला जिलेबी आवडते म्हणून तिने जिलेबी आणली. आपल्या मुलांनी जिलेबी पाहिली तर ते खातील, म्हणून तिने कपड्यांच्या मागे एका पिशवीत ती लपवून ठेवली आणि फक्त मलाच ती जागा दाखवली. तिने सांगितलं, "जेव्हा तुला खाविशी वाटेल, तेव्हा तिथे जाऊन घे." मी एवढी वाईट वागले की त्यातील एकही जिलेबी मी तिच्या मुलांना दिली नाही आणि त्या दोघांनीही आपल्या आईच्या धाकामुळे त्या पिशवीला कधी हात लावला नाही. एवढंच नाही तर, मला जेवताना फ्रिजमधलं थंड पाणी पिण्याची सवय होती, हेही तिला माहीत होतं. तिच्याकडे फ्रिज नव्हता, म्हणून ती रोज एक लिटरच्या दोन बाटल्या कोणाच्या तरी फ्रिजमध्ये नेऊन ठेवायची - दुपारी एक आणि रात्री एक. प्रत्येक बाटलीचे दहा रुपये ती त्या व्यक्तीला द्यायची. दिवसाला २० रुपये पाण्यासाठी आणि १० रुपये संध्याकाळी समोसा-पावासाठी, असा ३० रुपयांचा खर्च ती रोज माझ्यावर करायची.

तुम्हीच सांगा, कोणती आई स्वतःच्या मुलांना खाऊ न देता तो लपवून ठेवून दुसऱ्याच्या मुलाला देईल? मी जरी तिच्या कितीही जवळची असले, तरी शेवटी मी दुसऱ्याची मुलगी होते. एखादी आई ज्या पद्धतीने आपल्या मुलांवर प्रेम करते, त्यांना वाढवते, ते फक्त एक आईच करू शकते. पण माझ्या बाबतीत सांगायचं तर, तिने माझ्यावर तेवढीच माया केली जेवढी तिने स्वतःच्या मुलांवर केली होती. मुलांमध्ये आणि माझ्यात तिने कधीच फरक केला नाही. तिच्यासोबत घालवलेले ते पंधरा दिवस आजसुद्धा आठवतात. असं म्हणतात ना, देवाला चांगलीच माणसं आवडतात; तिच्या बाबतीत असंच झालं. देवाने खूप लवकर तिला आपल्याकडे बोलवून घेतलं. एका अपघातात ती सापडली आणि आमच्या नात्यावर कायमचा पूर्णविराम आला.

नातं कोणतंही असो, ते पैशांवर व परिस्थितीवर अवलंबून नसावं. तुमच्या वाईट परिस्थितीत जी व्यक्ती तुमच्यासोबत असेल, त्या व्यक्तीला आयुष्यभर जपा. कारण चांगल्या काळात प्रत्येक जण तुमचा हात धरायला येईल, ते सुद्धा आमंत्रण न देता; पण जो वाईट परिस्थितीत हात धरेल, तीच व्यक्ती तुमच्यावर खऱ्या अर्थाने प्रेम करणारी असेल. लहान मुलाचंच उदाहरण घ्या, त्याला काहीही कळत नसतं, पण ते प्रत्येक व्यक्तीजवळ जात नाही. कोणी कितीही बोलावलं तरी ते जात नाही. जी व्यक्ती त्याच्यासोबत वेळ घालवते, मायेने जवळ घेते, अशाच व्यक्तींकडे ते मूल सहज जातं. कधी-कधी मूल आई-वडिलांपेक्षा आजी-आजोबांकडे राहणं पसंत करतं, कारण त्यांनी केलेली माया! कधीकधी नात्यात गोडवा आणण्यासाठी समोरच्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर हास्य कसं येईल, याचा विचार करावा लागतो. काही चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी कधीकधी काही गोष्टी गमवाव्याही लागतात.


- हर्षदा सावंत 

मांद्रे