बर्च क्लब दुर्घटना प्रकरण : हणजूण पोलिसांकडून शोध जारी

म्हापसा : साकवाडी हडफडे येथील बर्च बाय रोमियो लेन क्लब अग्नितांडव प्रकरणी हडफडे नागवाचे अपात्र सरपंच रोशन रेडकर आणि सरकारी सेवेतून बडतर्फ केलेले पंचायत सचिव रघुवीर बागकर यांचा शोध हणजूण पोलीस घेत आहेत. न्यायालयाने अटकपूर्व अर्ज फेटाळल्यापासून दोघेही भूमिगत झाले आहेत.
दि. ६ डिसेंबर २०२५ रोजी झालेल्या बर्च क्लबमध्ये अग्नितांडवात २५ निष्पाप लोकांचा जीव गेला होता. तर, सहाजण जखमी झाले होते. या दुर्घटना प्रकरणात नोंदवलेल्या गुन्ह्यामध्ये पोलिसांकडून आपली अटक टाळण्यासाठी रोशन रेडकर तसेच रघुवीर बागकर यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली होती.
दि. ३० डिसेंबर रोजी म्हापसा येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने दोघांचाही हा अर्ज फेटाळला होता. तसेच ३१ डिसेंबर रोजी पंचायत संचालनालयाने सरपंच रोशन रेडकर व तत्कालिन पंचायत सचिव रघुवीर बागकर यांना बर्च दुर्घटनेला कारणीभूत ठरल्याने कारवाई केली. सरपंच रेडकर यांच्यावर पंच सदस्य अपात्रतेची तर बागकर यांच्यावर सेवेतून बडतर्फ करण्याची कारवाई करण्यात आली.
तत्पूर्वी, अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्याचा आदेश जारी करताच हणजूण पोलिसांनी रेडकर व बागकर यांना अटक करण्याच्या उद्देशाने त्यांचा शोध घेतला. मात्र, ते शुक्रवार २ जानेवारीपर्यंत सापडू शकले नाहीत. पोलिसांनी रेडकर यांच्या हडफडेतील दोन्ही घरांवर तसेच बागकर यांच्या पर्रा व मयडे येथील घरांवर टेहळणीसाठी पोलीस कर्मचारी तैनात केले आहेत.
परंतु अद्याप दोघेही पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. दोघांचे मोबाईल फोन बंद असल्याने तांत्रिकदृष्ट्या त्यांचा मागावा काढण्यात पोलिसांना अचडणी येत आहेत.