राजीनामा: एका प्रवासाचा शेवट आणि नव्या वळणाची सुरुवात

राजीनामा म्हणजे केवळ एका अध्यायाचा शेवट नसून, तो एका नवीन पुस्तकाची सुरुवात असतो. तो आपल्याला बदल स्वीकारण्याचे बळ देतो. जुन्या चुकांमधून घेतलेली शिकवण आणि चांगल्या माणसांनी दिलेली साथ हीच आपली खरी पुंजी असते.

Story: लेखणी |
3 hours ago
राजीनामा: एका प्रवासाचा शेवट आणि नव्या वळणाची सुरुवात

राजीनामा' हा शब्द उच्चारायला जितका सोपा आहे, त्याहीपेक्षा कितीतरी पटीने तो जड आणि अर्थपूर्ण आहे. या शब्दाची फोड केली तर लक्षात येते की, यात नोकरी सोडणाऱ्याने नोकरी देणाऱ्याला "मी आता हा प्रवास थांबवतोय" यासाठी 'राजी' करायचे असते. पण त्याही आधी, स्वतःच्या मनाला त्या निर्णयासाठी 'राजी' करणे, ही सर्वात मोठी लढाई असते. ज्या नोकरीसाठी एकेकाळी रात्रंदिवस कष्ट घेतले, मुलाखती दिल्या आणि जिथे करिअरची स्वप्ने पाहिली, तीच जागा एक दिवस कायमची सोडायची, हा विचारच मनाला अस्वस्थ करून जातो.

नोकरीच्या पहिल्या दिवशी आपण जेव्हा त्या अनोळखी कार्यालयात पाऊल ठेवतो, तेव्हा आसपासची सर्व माणसे परकी असतात. पण पाहता पाहता, त्याच परक्या माणसांशी जिवाभावाचे नाते कधी जुळते, हे कळतही नाही. कामाच्या व्यापातून वेळ काढत शेअर केलेले टिफिन, चहाच्या टपरीवरच्या गप्पा आणि सुख-दुःखाच्या देवाणघेवाणीतून तयार झालेली ती मैत्रीची वीण खूप घट्ट असते. कार्यालयात साजरे केलेले वाढदिवस, सण-उत्सव आणि एकमेकांना दिलेली साथ यामुळे ते कार्यालय केवळ कामाची जागा न राहता 'दुसरे घर' बनून जाते. म्हणूनच, जेव्हा राजीनामा देण्याची वेळ येते, तेव्हा केवळ खुर्ची किंवा टेबल सोडत नाही, तर आपण आपल्या आयुष्यातील एक मोठा कालखंड आणि त्या असंख्य आठवणी तिथेच मागे ठेवून जात असतो. अशा वेळी कंठ दाटून येणे स्वाभाविकच आहे.

राजीनामा देताना केवळ गोड आठवणीच येतात असे नाही, तर माणसांच्या खऱ्या स्वभावाचे दर्शनही डोळ्यांसमोर तरळू लागते. या प्रवासात काही माणसे सापाप्रमाणे कपटी वागल्याचेही आठवते. 'तोंडावर मध आणि पोटात विष' ठेवून वागणारी, कामापुरती गोड बोलून पाठीमागून केसानी गळा कापणारी माणसेही याच प्रवासात भेटलेली असतात. 'कामापुरता मामा' आणि 'ताकापुरती आजी' करणाऱ्या प्रवृत्ती जेव्हा लक्षात येतात, तेव्हा मनात एक प्रकारची विरक्ती येते. कधी कधी वरिष्ठांचा (Boss) अवाजवी जाच किंवा कार्यालयातील राजकारण हे देखील राजीनाम्याचे मुख्य कारण असू शकते. हे अनुभव आपल्याला माणूस म्हणून प्रगल्भ करतात आणि जगातील खऱ्या नात्यांची पारख करायला शिकवतात.

असो, वेळ कोणासाठी थांबत नसते आणि कोणावाचून कोणाचे कामही अडत नसते. राजीनामा म्हणजे केवळ एका अध्यायाचा शेवट नसून, तो एका नवीन पुस्तकाची सुरुवात असतो. तो आपल्याला बदल स्वीकारण्याचे बळ देतो. जुन्या चुकांमधून घेतलेली शिकवण आणि चांगल्या माणसांनी दिलेली साथ हीच आपली खरी पुंजी असते. राजीनामा देताना मन जरी जड झाले तरी, त्यात पुन्हा स्वतःला सिद्ध करण्याची उमेद दडलेली असते.

खरंच, 'राजीनामा' हा शब्द खूपच भारी आहे. तो आपल्याला मागे वळून पाहायला लावतो आणि त्याच वेळी पुढच्या प्रवासासाठी सज्जही करतो. हा केवळ कागदावरचा सह्यांचा खेळ नसून, तो एका व्यक्तीच्या संघर्षाचा, आठवणींचा आणि भविष्यातील स्वप्नांचा एक भावनिक दस्तऐवज असतो.


- श्रुती करण परब