वर्षाचा मानसिक हिशोब: आकड्यांचा ऑडिट की भावनांचा स्वीकार?

नव्या वर्षाच्या सुरुवातीला केवळ यशाचा हिशोब न मांडता, मनातील दडपलेल्या भावनांचा स्वीकार करून स्वतःशी सौम्य राहण्याचा मार्ग दाखवणारा हा एक मार्गदर्शक आणि आश्वासक लेख.

Story: मनी मानसी |
02nd January, 11:43 pm
वर्षाचा मानसिक हिशोब: आकड्यांचा ऑडिट की भावनांचा स्वीकार?

नववर्ष सुरू झाले आहे. रोजची घडी हळूहळू बसतेय. शुभेच्छांचे फॉरवर्ड्स आता फारसे दिसत नाहीत. आयुष्य पुन्हा आपल्या गतीने धावायला लागले आहे. कामं रांगेत उभी आहेत, आणि बाहेरचं जग सांगतंय, “चला कामाला लागा..!”

पण हे मन मात्र लगेच कामाला लागत नाही. ते आधी थांबतं. मागे वळून पाहतं. आणि तेव्हाच जाणवतं, आपल्या मनाला पडलेले प्रश्न अजून जुनेच आहेत. गेलं वर्ष माझ्यासाठी नेमकं कसं गेलं? मी जे ठरवलं होतं, ते सगळं झालं का? आणि सगळ्यात अवघड प्रश्न! जे झालं नाही, त्याचं काय करायचं?

आपण वर्षाअखेरीचा हिशोब लावताना फार काटेकोर असतो. पगार, वजन, यश, अपयश सगळ्याची जणू एक Excel sheet तयारच असते! परंतु गंमत म्हणजे, या हिशोबात भावनांना मात्र जागाच नसते. थकवा “miscellaneous” मध्ये जातो. निराशा “ignore” होते. आणि तरीही रोज उठून आयुष्य सांभाळण्याचा प्रयत्न मात्र carry forward होतो. म्हणून एक मानसोपचारतज्ज्ञ म्हणून मला नेहमी जाणवतं, हा हिशोब अपुरा आहे. कारण मानसिक हिशोब म्हणजे आकड्यांचा नाही, तर वर्षभर साठलेल्या आपल्याच भावनांचा एक ऑडिट असतो.

अनेक जण म्हणतात, “माझं वर्ष वाया गेलं.” मी मनातल्या मनात म्हणते, वाया नाही गेलं, जड गेलं. कधी परिस्थितींमुळे, कधी नात्यांमुळे, कधी स्वतःच्या अपेक्षांमुळे तर कधी स्वतःशी चाललेल्या न संपणाऱ्या लढ्यामुळे. आणि त्याची दखल घेतली नाही, की मन स्वतःलाच अपयशी ठरवतं. या हिशोबात एक मोठा पण दुर्लक्षित भाग असतो, जे झालं नाही त्याचं दुःख.

दुःख म्हणजे फक्त काही गमावल्यावरच येतं असं नाही. न झालेल्या गोष्टींचंही शोक असतं. न मिळालेली संधी, न जुळलेलं नातं, अर्धवट राहिलेली स्वप्नं, यांना कुठेच अधिकृत शोककाळ नसतो. त्यामुळे समाज पटकन म्हणतो, “सोडून दे.. नवीन सुरुवात कर.” पण मन अजून closure शोधत असतं.

कित्येक समुपदेशन सत्रात हे स्पष्ट दिसतं की, दडपलेलं दुःख नाहीसं होत नाही. ते कधी चिंताविकाराचं रूप घेऊन, तर कधी चिडचिड म्हणून, तर कधी सतत स्वतःवर दोषारोप करायच्या सवयींमधून दृष्टीस पडतं. ह्यात closure आणि acceptance ह्या दोघांची उत्तम सांगडच तुमच्या अस्वस्थ मनाला शांततेच्या पैलतीरास पोहोचवेल हे तुम्हाला माहीत आहे का?

होय. Acceptance अर्थात स्वीकार. आता हे म्हणजे काही हार मानणं नव्हे! उलट, स्वीकार म्हणजे वास्तवाशी भेटून, समजून त्यासोबत आयुष्याची होडी पुढे कशी न्यायची ते पाहणं. कारण जोपर्यंत आपण स्वतःला दोष देत राहतो, तोपर्यंत सगळे पुढचे प्लॅन हे जणू पाय मुरगळून मॅरेथॉन पळण्यासारखे असतात. जखम पाहिल्याशिवाय मलम लावता येत नाही, हे साधं तत्त्व इथेही लागू होतं. आणि ते मलम लावून ती जखम भरून येणं म्हणजेच closure मिळणं, नाही का? आहे की नाही, दोघांची गंमत!

आणि म्हणून याच ठिकाणी आज नव्या वर्षाची goal setting सुरू व्हायला हवी.

उपचारात्मक (Therapeutic) दृष्टिकोनातून goal म्हणजे “मी काय सुधारायचंय” यापेक्षा “मला कसं जगायचंय” हा प्रश्न!

उद्दिष्टं कमी असू शकतात, पण खरी असावीत. परिपूर्ण होण्यापेक्षा प्रामाणिक राहण्याची; स्वतःशी सौम्य राहण्याची; प्रत्येक महिन्यात स्वतःला थोडी जागा देण्याची.

स्वतःकडून सगळं काही जमायलाच हवं, हा हट्ट थोडा सैल करणे आवश्यक आहे.

आपण स्वतःशी कशी भाषा वापरतो, याकडे क्वचितच लक्ष देतो. “मी पुन्हा मागे पडलो. माझ्याकडून काहीच जमत नाही.” ही वाक्यं इतकी सवयीची होतात, की ती खरी वाटायला लागतात. समुपदेशनात अनेकदा दिसतं, जे लोक स्वतःशी सतत कठोरपणे आंतरिक संवाद साधतात, ते फार पुढे जात नाहीत; ते फक्त अधिक थकतात. स्वतःवर सतत ताशेरे ओढून, कोणीही आयुष्यात उत्तीर्ण झालेलं नाही. त्यामुळे परिपूर्णतेचा आग्रह कमी झाला, की पुढची पावलं अधिक स्थिर पडतात. स्वतःशी सौम्य राहणे आणि स्वतःशी प्रामाणिक राहणे, हेच खरे self-compassion आहे.

वर्षाचा मानसिक हिशोब म्हणजे स्वतःला योग्य ठरवणं नाही, किंवा चुकीचं ठरवणंही नाही किंवा स्वतःला निर्दोष ठरवणं देखील नव्हे! तो म्हणजे स्वतःला सतत दोषी ठरवणं थांबवणं.. स्वतःशी चाललेला खटला थोडा वेळ तहकूब करणं. गेलं वर्ष कदाचित पूर्ण झालेलं नसेल. काही गोष्टी तशाच राहिल्या असतील - अर्धवट, न बोललेल्या, न उमटलेल्या. पण त्या सगळ्या तुमच्या अपयशाच्या नोंदी नाहीत; त्या तुमच्या जगण्याच्या खुणा आहेत. न झालेल्या गोष्टींना लगेच उत्तर देणं गरजेचं नसतं. काही प्रश्नांना वेळ लागतो. काही उत्तरं पुढे येतात आणि काही गोष्टी योग्य वेळी व्यवस्थित उमजतात. म्हणून ह्या नवीन वर्षी पुढे जाताना एवढंच पुरेसं आहे - घाई न करता, स्वतःशी वाद न घालता, आतल्या गोंधळाला थोडी जागा देत चालणं. कारण कधी कधी आयुष्य सुधारायला फार मोठे संकल्प गरजेचे नसतात.. फक्त स्वतःला समजून घ्यायचं असतं.


- मानसी कोपरे

मानसोपचारतज्ज्ञ व समुपदेशक, डिचोली - गोवा, ७८२१९३४८९४