आठवणींच्या रांगोळीतला एक रंग: काशिनाथ

काशिनाथ गावकरांच्या व्यक्तिरेखेभोवती गुंफलेला हा लेख, गोव्याच्या मातीतील जुन्या आठवणींना उजाळा देतो. बदललेली जीवनशैली आणि हरवत चाललेला गावगाडा यांचा भावनिक प्रवास लेखिकेने या कथावजा आठवणीतून अतिशय प्रभावीपणे मांडला आहे.

Story: व्यक्ती एके व्यक्ती |
4 hours ago
आठवणींच्या रांगोळीतला एक रंग: काशिनाथ

परवाच माहेरी गेले होते आईकडे. रात्री गरमागरम उकडा भात, डाळ आणि सुक्या बांगड्यांची कोशिंबीर - ती सुद्धा जळत्या निखाऱ्याची वाफ दिलेली, अहाहा! स्वर्गसुख. रोजच्या चायनीज पार्सलला कंटाळलेली मी तृप्त झाले. सहजच बाहेर ओसरीवर येऊन बसले. आसमंतात बरीच थंडी होती. अचानक आमच्या बाजूच्या गावकर वाड्यावरून अभंगाचे सूर ऐकू येऊ लागले. रात्रीच्या थंड आणि चिडीचूप वातावरणात लांब असले तरी ते व्यवस्थित ऐकू येत होते. कदाचित एफ.एम.वर कोणी लावले असावेत.

स्वर ऐकता ऐकता माझ्या डोक्यात आठवणी परत रांगोळी घालू लागल्या आणि समोर चित्र आले काशिनाथचे. आमच्या वरच्या वाड्याच्या बाजूलाच गावकर वाडा. आमचा जायचा-यायचा रस्ता तेथूनच होता. काशिनाथ गावकर - लांब सडक, निमगोरा, दात थोडे पुढे आणि ते सुद्धा गावठी विडी पिऊन पिवळे पडलेले. त्यांचे घर अगदी ऐन रस्त्याच्या बाजूला. जाता-येता तो सुट्टीवर असला तर बऱ्याचदा ओटीवर उघडाबंब, नुसता हाफ पँटवर व खांद्यावर टॉवेल या वेशात बसलेला असायचा. खरे सांगू, त्याकाळी ना कपड्यांची फॅशन होती, ना कपडे हे केवळ अंग झाकण्यासाठी असतात (मग ते मांजरपाटाचे असोत किंवा टेरीकॉटचे) या समजाला कोणी छेद देत होतं. त्यामुळे सगळ्यांचे डोळे सरावलेलेच असायचे.

रस्त्यावरून जाणाऱ्या प्रत्येकाला तो टोकायचाच, असा काशिनाथचा जणू नियमच होता. मला तो ‘बाय’ म्हणायचा. समोर बसलेला असला की, “बाय बरे मगो? इशकोलान बी वैता मगो?” हा नेहमीचा प्रश्न. आणि मग मी ‘हो’ म्हणून उत्तर दिले की म्हणायचा, “बेस्टे वैता, काय शिकताय गो?” असे म्हणून आपले पुढे आलेले पिवळे दात दाखवत जोरात हसायचा. रस्त्यावरून जाणाऱ्या प्रत्येकाला, मग तो भाटकार असो नाहीतर भांडी विकणारा, प्रत्येकाला त्याचा शाब्दिक प्रसाद मिळायचाच.

धाकटू गावकराच्या सहा मुलांपैकी काशिनाथ थोरला. एक बोचरे तोंड सोडले तर माणूस अगदी कष्टाळू. बापानंतर भावंडात वाटणी झाल्यावर एक छोटासा काजूचा डोंगर त्याच्या वाट्याला आला. तसा तो पेशाने ड्रायव्हर; मॅंगनीज खाणीवर शेवाळे चालवायचा, अगदी अनुभवी. कामावर सुट्टी नाहीच. संध्याकाळी घरी आला की आंघोळ करून मग नेमाने अपेयपान थोडेसे असायचेच. मग काजूच्या दिवसांत बायकोने गोळा करून आणलेले मुटटे दोणात टाकून तुडवण्याचा कार्यक्रम चालू होई. आणि मग जोडीला मराठी अभंग! रात्रीच्या शांत वातावरणात ते अभंग घरापर्यंत ऐकू येत. मग समजायचे की उद्या सकाळी मस्त काजूचा नीरा मिळणार आपल्याला.

रात्रीच्या किर्र वातावरणात दोन पेग मारून काजू तुडवत नीरा काढताना अभंग म्हणणारा पहिला आणि शेवटचा माणूस मी पाहिलेला. रोज थोडी पित असे, पण कधीच भांडण हा प्रकार नाही; फक्त जिभेची रसवंती जरा जोरात चाले, एवढेच. आमच्या वाड्यावर एकीचे लग्न झाले पुण्यात. माहेरवाशीण म्हणून आल्यावर ती नुसते पुण्याचे कौतुक करायची - तिकडच्या खाद्यसंस्कृतीचे वगैरे. आमच्या काशिनाथने एकदा ऐकून घेतले आणि मध्येच बॉम्ब टाकला, “आगो सुले! तुझी आवय सुकत चालल्या मगो, दिसंदिस हांगा येऊन बसता ते, आवयक पुण्याचे बरे बरे करून घाल मगो.” झाले! त्यानंतर सुलूने चुकूनसुद्धा आमच्या वाड्यावर पुणे संस्कृती वाजवली नाही.

फक्त तोंडच वाजायचे त्याचे, पण तसा तो पक्का घाबरट. रात्री रानात बिलकुल जात नसे; काय ते घराभोवतीच. बाकी गावकरी पिल्यानंतर वाघ बनत, पण याची कायम शेळी व्हायची. शेजारी कोणाचे भांडण झाले तरी याचा दरवाजा पहिला बंद! अगदी बायकोलाही घराबाहेर सोडत नसे. अहो, एक चांगला ड्रायव्हर असूनही घाबरट स्वभावामुळे तो मेन रोडवर ट्रक चालवत नसे; काय काम ते फक्त खाणीवरच. लोक हसायचे पण काशिनाथला फरक पडत नसे. मराठी गाणी, भजने, अभंग त्याला तोंडपाठ होते. चतुर्थी आली की काशिनाथला मोठी डिमांड असायची. भजन असे गायचा की तोड नाही. आणि ते दहा दिवस बाकी उद्योगही तो कटाक्षाने बंद ठेवत असे; अगदी गावच्या भटाचा वारसच जणू! असो.

खूप वर्षे नोकरी केली त्याने खाणीवरती. पगार-पाणी तसे चांगले होते, त्यामुळे चिंता नव्हती. सुशेगाद सगळे चालू होते. मुलीचे लग्न करून दिले, मुलगा आय.डी.सी.मध्ये कामाला जाऊ लागला. तोही चांगला, कोणाच्या अध्यात ना मध्यात. काशिनाथ खुश होता. माझ्या बाबांना नेहमी सांगे की, आता निवृत्तीनंतर आराम करायचा, काजू आणि काजूची फेणी दोन्ही बंद करणार. पण सगळे बरे असताना मध्येच एक अघटित घडले. त्याची पत्नी, जिने त्याला आयुष्यभर साथ दिली, त्याचा कडवटपणा झेलला, तीच एका असाध्य रोगाने आजारी पडली. काशिनाथ पार वेडापिसा झाला. खूप उपचार केले अहो! रात्री भीतीने घराबाहेर न पडणारा काशिनाथ आपल्या बायकोच्या शेवटच्या दिवसांत महिनाभर हॉस्पिटलमध्ये एकटा राहायचा. नोकरी तर संपलीच होती, पण बायकोच्या औषधोपचारात कमावलेला पैसाही संपला. अर्थात हाती काहीच लागले नाही; बायको जायची ती गेलीच.

काशिनाथ पार कोलमडून गेला. जो माणूस निवृत्तीनंतर दारू पूर्ण बंद करणार होता, तो आता सतत दारूच्याच अमलाखाली राहू लागला. घराच्या ओट्यावर निमूटपणे बसलेला दिसे. गावकऱ्यांना टोचून बोलणारा काशिनाथ आम्हाला माहीत होता, पण हा असा काशिनाथ प्रथमच पाहत होतो. सगळ्यांनी त्याला मार्गावर आणण्याचा खूप प्रयत्न केला पण उपयोग झाला नाही. शेवटी तो गेला आपल्या प्रिय बायकोला भेटायला स्वर्गात.

आजही कुठे  ‘जोहार मायबाप’ किंवा ‘आधी बीज एकले’ वगैरे अभंग कानावर पडले की पटकन काशिनाथ आठवतो. ते गावकर वाड्यावरील त्याचे घर, ती दिवसभर घरकाम करणारी त्याची बायको, तिने प्रेमाने दिलेला काजूचा फ्रेश नीरा... सगळं सगळं डोळ्यासमोर येतं. आता तो नीराही नाही आणि काशिनाथही. मुलाने तर काजू करणे कधीच बंद केले. आता उरल्या आहेत त्या फक्त आठवणी आणि त्यांनी घातलेली त्या जुन्या दिवसांची ती रांगोळी...


- रेशम जयंत झारापकर

मडगाव, गोवा.