नवीन वर्ष : इतरांसाठी नाही तर आता स्वतःसाठी जगा

हे वर्ष संपत आहे आणि त्याच्यासोबत जुनी दुःखं, जुने ओझे, जुने प्रश्न ही मागे टाकूया. नवीन वर्ष कोणासाठी ही नाही तर हे नवीन वर्ष फक्त "स्वतःसाठी जगा".

Story: प्रासंगिक |
26th December, 09:59 pm
नवीन वर्ष : इतरांसाठी नाही तर आता स्वतःसाठी जगा

हे वर्ष संपायला आता फक्त पाच दिवस उरले आहेत. कॅलेंडरची पानं एकामागोमाग एक उलटत आहेत आणि प्रत्येक पानासोबत मागच्या वर्षाच्या आठवणी, अनुभव, दुःख, आनंद, अपेक्षा, अपयश सगळं मनात पुन्हा एकदा गर्दी करत आहे. या वर्षामध्ये जे काही घडलं, जे काही झालं, चांगलं असो वा वाईट ते सगळं आता मागे टाकायची वेळ आली आहे. नवीन वर्ष उंबरठ्यावर उभं आहे आणि त्याच्यासोबत एक नवीन प्रश्न आपल्याला स्वतःला विचारायला हवा "हे वर्ष आपण कोणासाठी जगलो?"

मागील वर्षाकडे वळून पाहिलं तर असं लक्षात येतं की आपण बहुतेक वेळा इतरांसाठीच जगलो. आई वडिलांसाठी, कुटुंबासाठी, मित्रांसाठी, नात्यांसाठी, समाजासाठी सगळ्यांसाठी काही ना काही करत राहिलो. कोणाला दुखावू नये म्हणून आपण गप्प राहिलो. कोणाच्या अपेक्षा पूर्ण व्हाव्यात म्हणून आपली इच्छा बाजूला ठेवली. कोणाला वाईट वाटू नये म्हणून स्वतःचं मन मारून घेतलं. आपण खूप काही दिलं, पण प्रश्न असा आहे की "आपल्याला काय मिळालं?"

इतरांसाठी जगणं चुकीचं नाही आणि इतरांचा विचार करणं पण चुकीचं नाही. माणूस म्हणून, समाजाचा एक भाग म्हणून, इतरांसाठी काही करणं ही खूप सुंदर गोष्ट आहे. पण इथेच एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो "इतरांसाठी जगताना आपण स्वतःला विसरतो का?"

जर इतरांच्या आनंदासाठी आपलं अस्तित्वच नाहीसं होत असेल, जर इतरांच्या सोयीसाठी आपली स्वप्नं तुटत असतील, जर इतरांच्या समाधानासाठी आपलं मन रोज मरत असेल, तर मग हे “चांगुलपण” नाही ही स्वतःची हळूहळू होणारी हत्या आहे. स्वतःसाठी जगणं म्हणजे स्वार्थीपणा नाही. बर्‍याच लोकांना वाटतं की स्वतःसाठी जगणं म्हणजे स्वार्थी असणं. पण खरं सांगायचं तर स्वतःसाठी जगणं म्हणजे स्वतःचा सन्मान करणं आहे. स्वतःच्या भावना समजून घेणं. स्वतःच्या गरजा ओळखणं. स्वतःच्या मनाचं ऐकणं. जो माणूस स्वतःशी प्रामाणिक नसतो, तो कधीच इतरांना खरं सुख देऊ शकत नाही.

थोडा थांबा आता, "आपण स्वतःला कधी हे प्रश्न विचारले का? "मला खरंच काय हवं आहे?", "मी जे करतेय ते माझ्यासाठी आहे का?", "मी शेवटचं स्वतःसाठी काय केलं?", "माझ्या आनंदाची जबाबदारी मी स्वतः घेते का?". या प्रश्नांची उत्तरं सोपी नाहीत, पण एकदा मनापासून विचारलं की उत्तरं आपोआप मिळतात.

नवीन वर्ष म्हणजे फक्त १ जानेवारी नाही तर नवीन वर्ष म्हणजे नवीन विचार, नवीन दृष्टिकोन, नवीन निर्णय. या नवीन वर्षात आपण स्वतःसाठी हे काही विचार ठरवूया, "आता आपली स्वप्नं थांबवायची नाहीत", आता “लोक काय म्हणतील” यापेक्षा “मला काय वाटतं” याला महत्त्व द्या.

स्वतःसाठी जगणं म्हणजे मोठमोठे बदलच हवेत असं नाही तर छोट्या छोट्या गोष्टींपासून सुरुवात होते. जस की, स्वतःसाठी वेळ काढणं, नको असलेल्या गोष्टींना “नाही” म्हणणं, आपल्या मनाचं ऐकणं, आपल्या आवडी जपणं, स्वतःची मानसिक शांतता महत्त्वाची मानणं, हे सगळं म्हणजे स्वतःसाठी जगणं आहे.

मागील वर्षात आपण चुका केल्या. काही निर्णय चुकीचे ठरले. काही लोकांवर विश्वास ठेवून फसवणूक झाली. पण नवीन वर्षात एक गोष्ट नक्की करा ती म्हणजे "स्वतःला माफ करा". कारण आपण जे काही केलं, ते त्या वेळच्या आपल्या समजुतीनुसार योग्यच वाटत होतं. या नवीन वर्षात आणखी एक सर्वात महत्त्वाची गोष्ट करा ती म्हणजे "स्वतःशी मैत्री करा". "स्वतःशी बोला", "स्वतःला समजून घ्या", "स्वतःच्या चुका स्वीकारा", "स्वतःचं कौतुक करा". कारण आयुष्याच्या शेवटपर्यंत तुमच्यासोबत कायम राहणारी एकच व्यक्ती आहे ते म्हणजे "तुम्ही स्वतः".

हे वर्ष संपत आहे आणि त्याच्यासोबत जुनी दुःखं, जुने ओझे, जुने प्रश्न ही मागे टाकूया. नवीन वर्ष कोणासाठी ही नाही तर हे नवीन वर्ष फक्त "स्वतःसाठी जगा". तुम्हाला जे वाटतं ते करा, तुम्हाला जे योग्य वाटतं ते निवडा, तुमच्या आनंदाला प्राधान्य द्या. कारण जेव्हा तुम्ही स्वतः आनंदी असतात तेव्हाच तुम्ही इतरांना खरं सुख देऊ शकता.


- वर्धा विलास हरमलकर

भांडोळ