महिलांमध्ये संधिवाताचा धोका जास्त का?

भारतात पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये संधिवाताचे प्रमाण दुप्पट आहे. हार्मोन्स, जीवनशैली आणि पोषक घटकांची कमतरता यांमुळे हा धोका वाढतो. या लेखातून जाणून घेऊया महिलांमधील संधिवाताची कारणे आणि त्यावरील प्रतिबंधात्मक उपाय.

Story: आरोग्य |
26th December, 09:49 pm
महिलांमध्ये संधिवाताचा धोका जास्त का?

संधिवात म्हणजे ‘आर्थरायटीस’ (Arthritis) हा सांध्यांमध्ये वेदना, सूज, कडकपणा आणि हालचालींमध्ये अडथळा निर्माण करणारा आजार आहे. वाढते वय आणि शरीराची झीज झाल्यामुळे उद्भवणारी ही स्थिती आहे. तज्ज्ञांच्या मते, भारतात १५ टक्के म्हणजे जवळपास १८० दशलक्ष लोक 'आर्थरायटीस'च्या समस्येने ग्रस्त आहेत. अहवालांनुसार पुरुषांच्या तुलनेत महिलांना संधिवात होण्याची शक्यता दुप्पट असते. महिलांमध्ये ऑस्टिओआर्थरायटिसची लक्षणे सामान्यतः वयाच्या ३० आणि ४० च्या दशकात दिसू लागतात. ५५ वर्षांनंतर जेव्हा महिला रजोनिवृत्तीपर्यंत (Menopause) पोहोचतात, तेव्हा सांध्यांच्या समस्यांमधील लिंगभेद आणखी वाढतो.

अस्थिरोगतज्ज्ञांच्या माहितीनुसार, अ‍ॅन्कायलोझिंग स्पॉन्डिलायटिस ऑस्टिओ-आर्थरायटीस, रुमेटॉइड आर्थरायटीस, लहान मुलांमध्ये आढळणारा इडिओपॅथिक आर्थरायटीस, रिअ‍ॅक्टिव्ह आर्थरायटीस, सेप्टिक आर्थरायटीस, गाऊट आणि पॉली आर्थरायटीस यांसारखे संधिवाताचे सुमारे १०० पेक्षा जास्त प्रकार आहेत. मात्र, यातील ऑस्टिओ-आर्थरायटीस आणि रुमेटॉइड आर्थरायटीस हे दोन प्रकार भारतीय महिलांमध्ये अधिक प्रमाणात आढळतात. यामागे अनेक जैविक, हार्मोनल, सामाजिक आणि जीवनशैलीशी संबंधित कारणे असू शकतात. हे घटक समजून घेतल्यास या दीर्घकालीन आजाराचे योग्य व्यवस्थापन आणि प्रतिबंध करण्यास मदत होऊ शकते.

१. हार्मोन्सची भूमिका

महिलांच्या शरीरात इस्ट्रोजेन (Estrogen) हे हार्मोन महत्त्वाची भूमिका बजावते.

  •  इस्ट्रोजेन सांध्यांच्या आरोग्यावर परिणाम करते.
  •  मासिक पाळी, गर्भधारणा आणि रजोनिवृत्ती दरम्यान हार्मोन्समध्ये मोठे बदल होतात.
  •  रजोनिवृत्तीनंतर इस्ट्रोजेनची पातळी कमी होते, त्यामुळे हाडे ठिसूळ होतात व सांध्यांची झीज वेगाने होते.
  •  यामुळे वयाच्या साधारण ५० वर्षांनंतर महिलांमध्ये संधिवाताचा धोका झपाट्याने वाढतो.

२. ऑटोइम्यून आजारांचे प्रमाण

ऑटोइम्यून (Autoimmune) आजारांचे प्रमाण महिलांमध्ये पुरुषांपेक्षा २–३ पट जास्त असते. यामध्ये शरीराची रोगप्रतिकारक शक्ती चुकून स्वतःच्या सांध्यांवर हल्ला करते. यामागे हार्मोन्स, अनुवंशिकता आणि रोगप्रतिकारक यंत्रणेतील फरक हे घटक कारणीभूत असतात.

३. हाडांची कमी घनता (Bone Density)

महिलांमध्ये नैसर्गिकरित्या हाडांची घनता पुरुषांपेक्षा कमी असते.

  •   गर्भधारणा आणि स्तनपानामुळे शरीरातील कॅल्शियमची गरज वाढते.
  •  योग्य आहार नसल्यास हाडे आणि सांध्यांवर विपरित परिणाम होतो.
  •  यामुळे सांध्यांवर जास्त ताण येतो व झीज लवकर होते.

४. घरगुती आणि शारीरिक कामाचा ताण

 भारतीय महिलांच्या कामाच्या स्वरूपात वारंवार वाकणे, जड भांडी उचलणे आणि जमिनीवर बसून काम करणे यांचा समावेश असतो. या हालचालींचा गुडघा, कंबर आणि मानेच्या सांध्यांवर ताण पडतो. दीर्घकाळ अशा कामामुळे संधिवाताचा धोका वाढतो.

५. पोषणाची कमतरता

 महिलांमध्ये अनेकदा कॅल्शियम, व्हिटॅमिन डी आणि लोहाची कमतरता आढळते. या पोषक घटकांच्या अभावामुळे हाडे कमकुवत होतात, स्नायू आणि सांधे दुखू लागतात व संधिवाताची लक्षणे तीव्र होतात.

६. वजन आणि लठ्ठपणा

 गर्भधारणेनंतर किंवा हार्मोनल बदलांमुळे महिलांचे वजन वाढण्याची शक्यता जास्त असते. वाढलेल्या वजनामुळे गुडघे आणि कंबरेच्या सांध्यांवर अतिरिक्त ताण येतो, ज्यामुळे ऑस्टिओआर्थरायटिसचा धोका वाढतो.

७. वेदनांकडे दुर्लक्ष आणि उशिरा निदान

 महिलांमध्ये स्वतःच्या वेदनांकडे दुर्लक्ष करण्याची आणि कुटुंबाला प्राधान्य देण्याची सवय असते. यामुळे डॉक्टरांकडे जाण्यास उशीर होतो, संधिवात सुरुवातीच्या टप्प्यात ओळखला जात नाही आणि आजार बळावतो.

८. मानसिक ताण आणि तणाव

 दीर्घकालीन तणावामुळे शरीरातील दाह (Inflammation) वाढतो, ज्यामुळे ऑटोइम्यून आजार बळावतात आणि वेदना अधिक तीव्र जाणवतात.

संधिवाताचा धोका टाळण्यासाठी उपाय:

  •  संतुलित आणि पौष्टिक आहार: सांध्यांच्या आरोग्यासाठी आहारात कॅल्शियमयुक्त पदार्थ (दूध, दही, ताक, पनीर), व्हिटॅमिन डी (अंडी, मासे), प्रथिने (डाळी, कडधान्ये) आणि दाहशामक घटक (हळद, आले, लसूण) यांचा समावेश करावा.
  •  नियमित व्यायाम: चालणे, योगासने (वज्रासन, ताडासन, भुजंगासन), स्ट्रेचिंग आणि सायकलिंग नियमितपणे करावे. यामुळे वजनावर नियंत्रण राहते.
  •  कामाची योग्य पद्धत: जमिनीवर किंवा मांडी घालून जास्त वेळ बसणे टाळावे. जड वस्तू उचलताना पाठ सरळ ठेवावी आणि घरकामात मधूनमधून विश्रांती घ्यावी.
  •  सूर्यप्रकाश: नैसर्गिक व्हिटॅमिन डी मिळवण्यासाठी दररोज १५–२० मिनिटे सकाळच्या कोवळ्या उन्हात बसावे.
  •   मानसिक आरोग्य: तणाव कमी करण्यासाठी ध्यान (Meditation), प्राणायाम आणि आवडीचे छंद जोपासावेत.
  •  लवकर निदान: सांधेदुखीची सुरुवातीची लक्षणे दिसताच तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

महिलांमध्ये संधिवाताचा धोका वाढण्यामागे केवळ एक कारण नसून हार्मोन्स, जीवनशैली, पोषण आणि शारीरिक ताण यांचा एकत्रित परिणाम असतो. योग्य वेळी घेतलेली काळजी, संतुलित आहार आणि नियमित व्यायामाच्या जोरावर संधिवाताचा धोका कमी करून वेदनारहित जीवन जगणे शक्य आहे.



- डॉ. श्वेता राऊत मुळगावकर