​स्वरांचा 'प्रसाद' आणि रंगभूमीचा 'सावकार' : पद्मश्री प्रसाद सावकार

संगीत रंगभूमीचे सम्राट आणि गोमंतकाचे कंठभूषण पद्मश्री प्रसाद सावकार यांच्या कलेचा आणि थोर व्यक्तिमत्त्वाचा वेध घेणारा त्यांच्या एका परमभक्ताने लिहिलेला हा कृतज्ञतापूर्वक शब्दप्रवास.

Story: विशेष |
26th December, 09:53 pm
​स्वरांचा 'प्रसाद' आणि रंगभूमीचा 'सावकार' : पद्मश्री प्रसाद सावकार

मी कुणीही काहीही नसताना परमेश्वराने मला विविध क्षेत्रांतील सम्राट भेटवले, त्यांपैकीच एक सम्राट म्हणजे आपल्या गोमंतकाचे कंठभूषण असलेले गायक-नट पद्मश्री प्रसाद सावकार. १४ डिसेंबरला त्यांनी वयाची ९७ वर्षे पूर्ण केली. अगदी लहान वयापासून मी त्यांची परमभक्त. रेडिओवर पहाटे 'मंगल प्रभात' मध्ये लागणारे त्यांचे 'उठ पंढरीच्या राया, वेळ झाला' हे भक्तीगीत ऐकतच माझा दिवस उजाडायचा. त्यांच्या भक्कम आणि मधुर ताना मला अक्षरशः भारावून टाकायच्या. त्यांच्या तडफदार नाट्यगीतांनी मनावर तेव्हा केलेलं गारूड आजतागायत तसंच आहे. हा सावकार घराण्याला परमेश्वराने दिलेला 'प्रसाद'च आहे.

​खरंतर संगीत रंगभूमीला अवकळा आली होती, त्या पडत्या काळात रंगभूमीला ऊर्जितावस्था प्राप्त झाली ती पंडितजींच्या नाटकांमुळेच. नाटकात प्रसाद सावकार यांची भूमिका असणं आणि थिएटर प्रेक्षकांनी तुडुंब भरून जाणं हे समीकरण नेहमीच अबाधित राहिलं. 'अमृत मोहिनी', 'सुवर्णतुला', 'पंडितराज जगन्नाथ', 'जय जय गौरीशंकर', 'मंदारमाला' अशी त्यांची एकाहून एक सरस संगीत नाटके गाजली. मला आठवतंय, मी सातवीत असताना कारवारच्या म्युनिसिपालिटीच्या आवारात झाडांच्या त्या उघड्या थिएटरमध्ये सलग तीन दिवस रात्रीच्या वेळी कुणाकुणाच्या सोबतीने जाऊन 'मंदारमाला'चे प्रयोग पाहिले होते; केवळ पंडितजींची गाणी ऐकण्याच्या हव्यासापोटी!

​एवढं नाव कमावलं, यशाच्या शिखरावर पोहोचले, तरी मोठेपणा आणि 'ग'ची बाधा यांपासून ते अस्पर्श राहिले. प्रसन्न हसरा चेहरा, बोलके हसरे डोळे आणि देखणं रूप हे तर बाह्यरूप झालं; त्यांचं अंतरंगही तेवढंच सुंदर आणि गोड आहे, याची प्रचिती सर्वांनाच त्यांच्या वागण्यातून येते. हास्याचा खळखळाट करून त्यांची बोलण्याची ढब समोरच्याला चैतन्य देऊन जाते. प्रत्येक भेटीत ते रंगभूमीवरील नट-नट्यांचे, नाट्य निर्मात्यांचे किस्से, विनोद आणि गंभीर गोष्टी; काही निर्मात्यांचे आलेले चांगले-वाईट अनुभव आपल्या रसाळ कथनशैलीत सांगतात, तेव्हा त्यांच्या शब्दधारांमध्ये श्रोते चिंब भिजून जातात. त्यांच्या लागवी आणि गप्पिष्ट स्वभावामुळे माणसं त्यांच्याकडे खेचली जातात.

​नाट्य क्षेत्रातील प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या 'विष्णुदास भावे' पुरस्काराने ते सन्मानित झाले, तेव्हा आकाशवाणीवर त्यांची मुलाखत घेण्याची संधी मला मिळाली. तेव्हा झालेला आमचा परिचय आदरयुक्त स्नेहात रूपांतरित झाला. त्यांच्या जन्मदिवसाला फोनवर शुभेच्छा देताना ते भरभरून बोलतात. माझ्या प्रत्येक पुस्तक प्रकाशनाला त्यांनी आवर्जून लावलेली उपस्थिती कार्यक्रमाला एक उंची देऊन गेल्यासारखे मला वाटते. प्रत्येक वेळी ते मला नाट्यलेखन करण्यासाठी आग्रह धरतात. मी "बापरे!" म्हणताच, "तुम्ही नक्कीच लिहू शकाल" असा माझ्याबद्दल दाखवलेला विश्वास मला सुखावून जातो.

​परवाच १४ डिसेंबर रोजी त्यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. कॉटवर पहुडलेले, किंचित क्षीण झालेले; परंतु तशा अवस्थेतही चेहऱ्यावरील टवटवीत आणि दिलखुलास हास्याने माझे स्वागत झाले. त्यांच्या सुनेने विचारले, "ओळखलंत का बाबा यांना?" माझ्यावर आपली कमकुवत नजर स्थिर ठेवत ते म्हणाले, "प्रभुवेर्लेकर त्या!" मी ओळखले गेल्याचे पाहून माझं मन थुईथुई नाचलं आणि आपली स्मरणशक्ती शाबूत असल्याच्या विश्वासावर तेही खळखळून हसले. माझी विचारपूस केली आणि काय आश्चर्य! त्यांच्या गळ्यातून आपसूक सूर बरसू लागले. रसिकजनांसमोर सूर छेडण्याची त्यांची जन्माची सवय या वयातही ताजी आहे. 'सूर येताना' या संगीतातील त्रयीने त्यांच्या गळ्यात या वयातही चिरस्थान मिळवले आहे याचा अनुभव आला. वयाने थकले तरी रक्तात मिसळलेले सूर कधीच विलग होऊ शकत नाहीत याची प्रचिती आली.

​मागील काही वर्षांत आपल्या शिष्यवृंदाला शिकवण्याचा आनंद त्यांनी घेतला. त्यांच्या 'फिशिंग'च्या छंदाविषयी कळले; मांडवी नदीवर स्वतः गळ टाकून मासे पकडण्यातला एक वेगळा छंद या मत्स्यप्रेमीने जोपासला होता.

​गोमंतकाचे नाव आपल्या कलेद्वारे मराठी जगतात उज्ज्वल केले, त्या अवलियाची जीवनाच्या शतकाकडे वाटचाल चालू आहे. त्यांच्या वयाचा शतकमहोत्सव साजरा होवो, हीच मनापासूनची मनोकामना!



- मीरा प्रभुवेर्लेकर