नाताळ सणाचा गोडवा: आठवणींच्या कुळागरातून

गोव्यातील हिंदू-ख्रिस्ती बांधव्याच्या अतूट मैत्रीचा आणि नाताळच्या पारंपरिक गोड फराळाचा हा एक सुगंधी प्रवास. लहानपणीच्या आठवणी आणि मेरीच्या मम्मीच्या हातच्या चवीने सजलेला एक हृदयस्पर्शी लेख.

Story: विशेष |
19th December, 10:31 pm
नाताळ सणाचा गोडवा: आठवणींच्या कुळागरातून

आपला गोमंतक म्हणजे 'गोवा' किंवा 'गोंय' हा निसर्गसंपन्न, नारळी-पोफळीच्या कुळागरांनी नटलेला, वाऱ्यावर सळसळणाऱ्या भातशेतांनी सजलेला आणि गोड, रुचकर जलाशयांनी संपन्न असा मनोहारी प्रदेश आहे. येथे अनेक वर्षांपासून हिंदू आणि ख्रिश्चन बांधव अगदी मिळून-मिसळून, गुण्यागोविंदाने नांदत आहेत. गणेश चतुर्थी, दीपावली आणि ख्रिसमस म्हणजेच 'नाताळ' हे तीन प्रमुख सण आपल्या गोव्यात हिंदू आणि ख्रिश्चन बांधव पूर्वापार एकत्र साजरे करतात. जगभरात साजरा होणाऱ्या नाताळ सणाची धामधूम गोव्यातही अगदी न्यारीच असते.

दीपावली सणाची धामधूम संपली की, डिसेंबर महिन्याच्या गुलाबी थंडीत ख्रिसमस सणाची तयारी सुरू होते. बाजारपेठा रंगीबेरंगी नक्षत्रे (Stars), गोठा सजवण्याचे सामान, नाताळ स्पेशल फराळ आणि इतर वस्तूंच्या गर्दीने ओसंडून वाहतात. माझ्या बालपणी आणि तरुणपणी, माहेरच्या गावी नाताळ सण जवळ आला की उत्साहाचे एक आनंदी वातावरण आपसूक तयार व्हायचे. आमच्या वाड्यावर ख्रिश्चन बांधवांची मोजून तीन घरे होती; त्यात 'मेरी'चे घर माझ्या घराच्या शेजारीच होते. मेरी ही माझी अगदी जवळची मैत्रीण होती. आजही आम्ही आपापल्या संसारात व्यस्त असलो, तरी आमची मैत्री तशीच घट्ट आहे.

डिसेंबरच्या प्रारंभी मेरीच्या त्या ऐसपैस मोठ्या घराची साफसफाई आणि रंगकाम सुरू झाले की ती मला सांगायची, “नातालाचे दिवस बोगले पावल्यात, तयारी कोतांय.” आता नाताळ येणार आणि मेरीच्या मम्मीच्या हातचे भरपूर पदार्थ फस्त करायला मिळणार, म्हणून मलाही खूप छान वाटायचे. नाताळच्या चार-पाच दिवस आधी मेरीची मम्मी आणि इतर बायका घरामागच्या अंगणात 'दोश' म्हणजे चणाडाळीचा हलवा करण्याचा बेत आखायच्या. भल्या मोठ्या पितळी भांड्यात लाकडी दवल्याने तो हलवा ढवळायला सुरुवात झाली की, नारळाचे दूध मिश्रित सुगंध संपूर्ण वाड्यावर दरवळायचा. हलव्याचे ते मिश्रण ताटात ओतून त्याच्या वड्या पाडायला सुरुवात झाली की जिभेवरची रसना जागी व्हायची. पिवळसर रंगाच्या भरपूर वड्या पाडल्या जायच्या; ती लुसलुशीत वडी जिभेवर ठेवताच विरघळणारी असायची.

मेरीची मम्मी खास नाताळसाठी घरीच 'केक' बनवायची. अंडी फेटून घातलेला आणि भरपूर सुकामेव्याने भरलेला तो केक इतका रुचकर लागायचा की काय सांगू! त्या केकसाठी माझी आई तर खास दोन-चार दिवसांची साय फ्रिजमध्ये राखून ठेवायची. नाताळला चार-पाच दिवस असताना अजून एक खास पदार्थ बनायचा, तो म्हणजे 'बुलींना' (Bolinnas). ही बुलींना म्हणजे खोबऱ्याची बिस्किटे. गावठी तुपात खमंग, कुरकुरीत भाजलेला गव्हाचा रवा आणि भरपूर ताज्या ओल्या नारळाचा चव घातलेली ती छोटी गोलाकार बिस्किटे फार चविष्ट असायची. बाहेरून कुरकुरीत आवरण आणि आतून मऊसर गर, अशी ही 'बुलींना' चव न्यारीच!

आणखी एक पारंपरिक पदार्थ म्हणजे 'कलकल'. दाटसर नारळाचे दूध आणि भरपूर काजूगराचे काप घालून या सत्वाच्या वड्या पाडल्या जायच्या. मऊ लुसलुशीत असा हा पदार्थ लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनाच प्रिय असे. तळणीच्या फराळात ‘नेवऱ्यो’ (करंज्या) आणि 'करमलां' (शंकरपाळी) असायची. करंजीच्या सारणात भरपूर नारळ, काजू आणि मनुका असायच्या, तर 'करमलां'ना थोडासा वेगळा आकार दिलेला असे.

नाताळचा मुख्य दिवस म्हणजे २५ डिसेंबर. ज्या दिवशी येशू ख्रिस्त या भूतलावर अवतरले. हा जन्मोत्सव साजरा करण्यासाठी कितीतरी गोडाधोडाचे पदार्थ करून शेजारीपाजारी आणि हितचिंतकांना खास ट्रे किंवा ताटात भरून दिले जायचे. त्यावर हाताने विणलेला सुंदर टॉवेल झाकलेला असे. वाड्यावरच्या प्रत्येक घरी जाऊन हे पदार्थ आनंदाने दिले जात आणि सोबत नाताळच्या शुभेच्छाही असायच्या.

मेरीच्या घरी नाताळला दुपारच्या जेवणात खास मांसाहारी पदार्थ असायचे. त्या काळात आमच्या एकत्र कुटुंबात मासे खूप कमी आणि ठराविक दिवशीच खाल्ले जायचे. मुख्य स्वयंपाकघरात मांसाहारी पदार्थ वर्ज असल्याने आमच्या घरात अंडी किंवा चिकन शिजवले जात नसे. हे मेरीच्या कुटुंबाला माहीत होते. त्यामुळे आमच्यासाठी ती वेगळ्या भांड्यात छोले, पुलाव आणि फ्रूट सॅलड बनवून ठेवायची. संध्याकाळी आम्ही मुले आणि माझे बाबा शुभेच्छा देण्यासाठी जायचो, तेव्हा ती आग्रहाने आम्हाला हे शाकाहारी पदार्थ, ताजे फराळाचे पदार्थ आणि चॉकलेट्स खायला द्यायची.

काळ बदलला आहे, सगळीकडे 'रेडीमेड'चा जमाना आहे. नोकरी आणि व्यवसायामुळे आजच्या स्त्रियांना घरी फराळ बनवणे शक्य होत नाही. सणाची पद्धतही बदलली आहे, आता पार्ट्यांचे आयोजन केले जाते. तरीही, त्याकाळी आवडीने आणि पोटभर खाल्लेल्या त्या पदार्थांची चव आजही माझ्या जिभेवर रेंगाळत आहे.

आता पुन्हा नाताळ जवळ आला आहे. २४ डिसेंबरपासून सणाची धामधूम सुरू होईल. सगळीकडे उत्साहाचे वातावरण आहे. सर्वांना नाताळ सणाच्या आणि येणाऱ्या २०२६ नवीन वर्षाच्या भरभरून हार्दिक शुभेच्छा!


- शर्मिला प्रभू