आसाममधील जलकुंभी ही वनस्पती आता केवळ एक जलपर्णी राहिलेली नसून, ती 'हरित सोने' म्हणून उदयास येत आहे. जलकुंभीमुळे निर्माण होणाऱ्या कृषी-उद्योजकता आणि ग्रामीण रोजगाराच्या नवीन संधींचा आढावा.

दीर्घकाळापासून जलकुंभी (Eichhornia crassipes) ही आसाममधील नद्या, तलाव, दलदली व 'बील्स' (ऑक्सबो लेक्स) यांमध्ये पसरलेली एक त्रासदायक आणि आक्रमक जलवनस्पती मानली जाते. विशेषतः पावसाळ्यात तिची प्रचंड वाढ होऊन पाण्याच्या पृष्ठभागावर जाड थर तयार होतो. यामुळे मासेमारी, नौकानयन व सिंचनात अडथळे निर्माण होतात, पाण्यातील ऑक्सिजन कमी होतो आणि जलचर जैवविविधतेला धोका निर्माण होतो. या समस्येवर मात करण्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च करूनही जलकुंभी पुन्हा-पुन्हा उगवते. मात्र, अलीकडच्या काळात या वनस्पतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत आहे. आता जलकुंभीला केवळ नष्ट करावयाचे तण नसून ‘हरित सोने’ म्हणून पाहिले जात आहे. आसाममध्ये कृषी-उद्योजकता, ग्रामीण रोजगार आणि पर्यावरण पुनरुज्जीवनाला हे हरित सोने नवी चालना देऊ शकते.
ब्रह्मपुत्रा नदी व तिच्या उपनद्यांनी घडवलेला आसामचा भौगोलिक प्रदेश जलकुंभीच्या वाढीस अत्यंत पोषक आहे. ही मुबलक उपलब्धता समस्या मानण्याऐवजी संशोधक, विकास संस्था आणि स्थानिक समुदाय तिला उपयुक्त संसाधन म्हणून वापरण्याचे मार्ग शोधत आहेत. जलकुंभीसाठी शेतीची जमीन, खते किंवा सिंचनाची गरज नसते; त्यामुळे ती ग्रामीण कुटुंबांसाठी विनामूल्य कच्चा माल ठरते. तिचा उपयोग केल्यास खर्चिक नियंत्रण उपायांऐवजी संसाधनाधारित आणि उपजीविकाभिमुख दृष्टिकोन विकसित होतो, ज्यात पर्यावरण व्यवस्थापन आणि आर्थिक विकास एकमेकांना पूरक ठरतात.
जलकुंभीचा सर्वाधिक यशस्वी वापर हस्तकला आणि कुटीर उद्योगांमध्ये दिसून येतो. जलकुंभीच्या देठांपासून तंतू काढून ते वाळवले जातात व त्यापासून टोपल्या, चटया, पिशव्या, भिंतीवरील सजावटीच्या वस्तू, दिव्यांचे शेड्स आणि हलके फर्निचर तयार केले जाते. ही उत्पादने जैवविघटनशील, आकर्षक आणि पर्यावरणपूरक असल्याने ग्राहकांमध्ये त्यांची मागणी वाढत आहे. आसामच्या अनेक भागांत महिला बचत गट या उपक्रमांचे नेतृत्व करत असून, कमी गुंतवणुकीत व मूलभूत प्रशिक्षणाच्या आधारे त्यांना नियमित उत्पन्न मिळत आहे. पूरकाळात शेतीकाम ठप्प असताना हे उद्योग विशेषतः उपयोगी ठरतात.
हस्तकलपलीकडे जलकुंभी सेंद्रिय शेतीसाठीही अत्यंत उपयुक्त आहे. नायट्रोजन, फॉस्फरस व पोटॅशियमसारख्या पोषकद्रव्यांनी समृद्ध असल्यामुळे ती कंपोस्ट, हिरवळीचे खत व 'मल्च' म्हणून वापरता येते. जलकुंभीपासून तयार केलेले कंपोस्ट मातीची सुपीकता, ओलावा धारण करण्याची क्षमता आणि सूक्ष्मजीवांची क्रियाशीलता वाढवते, ज्यामुळे रासायनिक खतांवरील अवलंबित्व कमी होते. सेंद्रिय शेतीबाबत वाढती जागरूकता आणि वाढता उत्पादन खर्च लक्षात घेता, जलकुंभी आधारित खत आसामच्या लहान व अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी कमी खर्चाचा स्थानिक पर्याय ठरत आहे. काही उद्योजक 'वर्मी-कंपोस्ट' आणि द्रव जैवखतेही तयार करत असून, ग्रामीण अर्थव्यवस्थेत बाजारपेठेचे नवे मार्ग खुले होत आहेत.
जैवऊर्जा उत्पादन हे जलकुंभीचे आणखी एक आशादायक क्षेत्र आहे. तिच्या उच्च जैवभारामुळे (Biomass) बायोगॅस निर्मितीसाठी ती उपयुक्त ठरते, ज्यातून स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन मिळू शकते. वाळवलेल्या जलकुंभीपासून इंधन ब्रिकेट्स (Briquettes) तयार करून लाकडावरील अवलंबित्व कमी करता येते आणि वनसंपदेवरील ताण घटवता येतो. संशोधन संस्थांनी जलकुंभीपासून हस्तनिर्मित कागद, पॅकेजिंग साहित्य आणि पार्टिकल बोर्ड तयार करण्याची शक्यताही दाखवून दिली आहे, जी भविष्यात हरित अर्थव्यवस्थेशी जोडली जाऊ शकते.
जलकुंभी आधारित कृषी उद्योजकतेचे खरे सामर्थ्य तिच्या समावेशक आणि विकेंद्रित स्वरूपात आहे. काढणी, वाळवणे, प्रक्रिया, कंपोस्टिंग आणि उत्पादन निर्मिती ही कामे श्रमप्रधान व स्थानिक पातळीवर होतात, ज्यामुळे महिला, युवक आणि भूमिहीन मजुरांना रोजगार मिळतो. बचत गट, सहकारी संस्था आणि सूक्ष्म उद्योगांच्या माध्यमातून होणारे मूल्यवर्धन गावातच राहते. उत्पादन डिझाइन, गुणवत्ता नियंत्रण, ब्रँडिंग आणि डिजिटल मार्केटिंगची जोड मिळाल्यास ग्रामीण उद्योजक शहरी व राष्ट्रीय बाजारपेठांपर्यंत पोहोचू शकतात.
पर्यावरणीय लाभही तितकेच महत्त्वाचे आहेत. जलकुंभीचे नियमित संकलन केल्यास पाण्याचा प्रवाह सुधारतो, मत्स्यसंपदा वाढते आणि डासांचे प्रमाण कमी होते. स्थानिक समुदायांना आर्थिक लाभ मिळाल्यास जलस्रोतांचे संवर्धन ही एक सामूहिक जबाबदारी बनते. हवामान-सहिष्णू उपजीविका आणि शाश्वत जलसंधारणासाठी हा दृष्टिकोन आसामसाठी अत्यंत उपयुक्त ठरतो.
जलकुंभीला कृषी-उद्योजकतेचा प्रभावी मार्ग बनवण्यासाठी धोरणात्मक व संस्थात्मक पाठबळ आवश्यक आहे. कौशल्य विकास, सूक्ष्म वित्तपुरवठा, बाजार जोडणी आणि संशोधन-उद्योग सहकार्य यांद्वारे या यशस्वी मॉडेल्सचा विस्तार करता येईल. पर्यावरणीय आव्हानाला विकासाच्या संधीत रूपांतरित करण्याच्या टप्प्यावर आज आसाम उभा आहे. जलकुंभीला तण न समजता संसाधन म्हणून स्वीकारल्यास, शाश्वतता आणि नवकल्पनांवर आधारित हरित अर्थव्यवस्थेची पायाभरणी होऊ शकेल.
