पाखरांनाही सायंकाळी दमलेले पंख कवटाळून आपल्या बांधलेल्या घरट्यात शिरुन निवांत झोपी जाण्याची ओढ छळत असावी. म्हणूनच प्रत्येक जीवजंतूंना आपले घर भूमीवरील स्वर्गच असल्यासारखे वाटते.

माझ्या मते घराला घरपण त्या घरात जमलेल्या माणसांमुळे, त्यांच्यामधील प्रेमळ भावाच्या ओढीमुळे आणि त्यांतील अतूट स्नेहांमुळे लाभते. घरात भरलेली माणसांची ऊबदार गर्दी खऱ्या अर्थाने वीट, माती, सिमेंट किंवा दगडी भिंतींना देखील मांगल्यपूर्ण 'घर' बनवते.
त्यामुळे मला अगदी लहानपणापासूनच संयुक्त कुटुंबीयांची कौलारू दगडी घरे खूप आवडत असत. उन्हाळ्यात शीतल गारवा देणारे नळ्यांचे छप्पर, शेणाने सारवलेले अंगण, मध्यभागी पवित्र तुळस, सर्वत्र दरवळणारा कृष्ण तुळशीचा सुगंध आणि अंगणातच पलीकडे गुरे-पाखरांसाठी डबर्यात साठवलेले पाणी... असली घरे आजही जर उंच इमारतींच्या मागे कुठेही मला दिसली की, माझे मन भरून येते.
असेच एकदा बसची वाट बघत असताना दोन घरांकडे बघून मी अक्षरशः भारावून गेले. मला रस्त्याच्या जराच पलीकडे ती दोन घरे दिसली. रस्त्यावर चालत असताना माझी नजर त्या छोट्याशा घराकडे गेली आणि मी बघतच राहिले.
ते घर खूप छोटे होते. तिन्हीसांजेची वेळ होती. ते घर पण आपल्या रोषणाईने अगदी दिपून गेले होते. मातीच्या लहान भिंती बाहेरच्या दिव्यांमुळे चकाकत होत्या. अंगणातच उजवीकडे हाताने बनवलेले आकाशकंदील टांगले होते. मी जरासे पाऊल मागे चालून बसची वाट बघण्यासाठी थांबले, तरी त्या घराचा प्रकाश किंचितही कमी झाला नाही. घरातून लहान मुलांच्या खिदखिद हसण्याचा आवाज ऐकू येत होता. एक वृद्ध जोडपे लाल रंगाच्या प्लास्टिकच्या खुर्च्यांवर बसून चहापानाचा निखळ आनंद लुटत होते. घराच्या छपरावरती डीटीएचचा अँटेना लावलेला होता. घराच्या आजूबाजूला काही झाडे होती. त्यांची हिरवी वसुंधरा त्या घराला प्रत्येक क्षणाला आणखी सुंदर बनवत होती. घराच्या अगदी समोरच सुकलेले माड होते. ते माड त्या घरावरती कधीही पडू शकेल याची खात्री त्या घरातील प्रमुख सदस्यांना असावी, तरी त्या घरात मला अपार आनंदाची जाणीव होत होती. तान्हं बाळ जसं आईला बिलगून प्रसन्न डोळे मिटून हसतो, त्याप्रमाणे ते छोटंसं घर हसत होतं. दिवाळी जणू काही आपल्याच घरात आहे असं जणू मोठमोठ्याने खिदखिदून सांगत होते.
क्षणभरात मी माझे भान हरवून त्या सुंदर घराकडे एकटक बघत होते. आपण जरा डोकावून त्यांच्या घरी असंच जाऊन यावं म्हणून मला राहून राहून वाटू लागले.
थोडक्यात, माझी नजर त्याच घराच्या थोड्या बाजूला असलेल्या सिमेंट-काँक्रीटच्या स्लॅपच्या घरावरती पडली. सायंकाळ होऊन देखील त्या घराची लाईट अजून पेटली नव्हती. घराच्या दुसऱ्या मजल्यावर आकाशकंदील दिसत होते. घरातून कसलाच आवाज येत नव्हता. घराबाहेर कोणाचीच हालचाल दिसत नव्हती. एक अनोळख्या शांतीचा आवेग मला ते घर बघताच जाणवला. ते घर असूनही त्यामध्ये 'घरपण' मला भासले नाही. असं मुळीच नसतं की मोठ्या घरांमध्ये संयुक्त कुटुंब किंवा सदस्य आनंदित राहत नसतात. घरातील सदस्यांची स्नेहाची संख्या
मातीच्या, तसेच सिमेंटच्या घरांना 'घरपण' देते; 'माणूसपणा' देते.
बसमध्ये बसून घरी पोहोचेपर्यंत मी हाच विचार करत होते की, एक घर कशाला एवढे छोटे असूनही बालिश हसणारे आणि दुसरे एवढे शांत... हा प्रश्न माझ्या मनात भुंगा घालू लागला.
प्रत्येक पावलावर आपल्या भारताची जशी संस्कृती बदलते, तशीच प्रत्येक भिंतीमागे माणसांची कहाणी बदलते, राहणीमान बदलते, सुखदुःखांच्या गोष्टी बदलतात. परंतु बदलत नसतो, तो फक्त माणुसकीचा जिवंतपणा... प्रत्येक दगडी, माती आणि स्लॅपच्या घरांमधला जिवंतपणा... ज्यामुळे प्रत्येकाच्या घराला खऱ्या अर्थाने घरपण लाभते. नाही तर या जगातला कुठलाच माणूस बाह्य जगातील काम पटापट आटपून आपल्या घरी लवकर परतला नसता; आपल्या माणसांकडे परत आला नसता. अगदी शाळकरी मुल सुद्धा शाळेची मोठी घंटा ऐकताच दप्तर पाठीवर घालून दमून देखील वेभानपणे हसून धावत धावत आपल्या घरी जातो. गुरांनाही आपल्या गोठ्याची ओढ अशीच लागत असावी. पाखरांनाही सायंकाळी दमलेले पंख कवटाळून आपल्या बांधलेल्या घरट्यात शिरुन निवांत झोपी जाण्याची ओढ छळत असावी. म्हणूनच प्रत्येक जीवजंतूंना आपले घर भूमीवरील स्वर्गच असल्यासारखे वाटते.
- रुबीना शेख, शिक्षिका