मिथिलांचलच्या मखाण्याला जागतिक ओळख देणारी 'प्रतीभा'

आज ‘पर्ल मिथिला मखाना’ मुळे ५०० हून अधिक शेतकरी कुटुंबांच्या आयुष्यात सुबत्ता आली आहे. मध्यस्थांची साखळी तोडल्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात ३०% वाढ झाली आहे. आज दरभंगाचा शेतकरी आत्मविश्वासाने सांगतो की, त्याच्या घामाला योग्य दाम मिळत आहे.

Story: इतिहास घडवणाऱ्या स्त्रिया |
19th December, 10:25 pm
मिथिलांचलच्या मखाण्याला जागतिक ओळख देणारी 'प्रतीभा'

सातासमुद्रापार, अमेरिकेतील लखलखते दिवे आणि करिअरच्या अफाट संधी समोर असताना, एखादी तरुण मुलगी ते सगळं सोडून बिहारच्या दरभंगा जिल्ह्यातल्या चिखलात पाय रोवून उभ्या असलेल्या शेतकऱ्याचा विचार करते, तेव्हा खऱ्या अर्थाने 'परिवर्तन' घडतं. ही गोष्ट आहे प्रतीभा बोंडिया खेरिया यांची ज्यांनी केवळ एक व्यावसायिक संस्था उभी केली नाही, तर मिथिलांचलच्या मातीचा स्वाभिमान पुन्हा जागा केला.

अमेरिकेत 'अ‍ॅग्रिबिझनेस'चे उच्च शिक्षण घेत असताना प्रतीभा यांच्या डोळ्यांसमोर नेहमीच आपल्या देशातील शेतकरी असायचा. बिहारचा 'मखाना' हा जगासाठी सुपरफूड असला, तरी तो पिकवणारा शेतकरी मात्र गरिबीच्या गर्तेतच होता. मध्यस्थांची साखळी शेतकऱ्याचा घाम स्वस्त दरात विकत घेत होती. हे चित्र बदलण्याच्या जिद्दीतून जन्म झाला, ‘पर्ल मिथिला मखाना’ या ब्रँडचा.

मखाना म्हणजे केवळ कुरकुरीत स्नॅक नाही, तो मिथिलांचलचा सांस्कृतिक वारसा आहे. प्रतीभा यांनी जेव्हा हा ब्रँड सुरू केला, तेव्हा एक संकल्प केला होता गुणवत्तेशी तडजोड करायची नाही आणि शेतकऱ्यांच्या हाताला काम द्यायचे. मखाण्याची प्रक्रिया ही अत्यंत कठीण आणि कष्टाची असते. पाण्यातून बिया काढण्यापासून ते त्या भाजून फोडण्यापर्यंतचा प्रत्येक टप्पा आजही १००% मानवी कौशल्यावर आधारित आहे.

प्रतीभा यांनी ठरवलं की, या प्रक्रियेत यंत्राचा वापर करून मखाण्याचा 'आत्मा' मारायचा नाही. त्यांच्या कारखान्यात प्रत्येक मखाना हाताने तपासला जातो, सोलला जातो आणि निवडून योग्य गटात वर्गीकृत केला जातो. ही पद्धत केवळ गुणवत्तेसाठी नाही, तर त्यामागे शेकडो हातांना पूर्वी ज्या मखाण्याला मातीमोल भाव मिळायचा, आज ‘पर्ल मिथिला मखाना’ मुळे ५०० हून अधिक शेतकरी कुटुंबांच्या आयुष्यात सुबत्ता आली आहे. मध्यस्थांची साखळी तोडल्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात ३०% वाढ झाली आहे. आज दरभंगाचा शेतकरी आत्मविश्वासाने सांगतो की, त्याच्या घामाला योग्य दाम मिळत आहे. प्रतीभा यांनी केवळ नफा कमावला नाही, तर शेतकऱ्यांचा त्यांच्या कष्टावरचा विश्वास पुन्हा मिळवून दिला.

प्रतीभा यांच्या या मोहिमेत स्त्रियांचा सहभाग हा सर्वात प्रेरणादायी भाग आहे. मखाना सुकवणे, त्याची छाननी करणे आणि पॅकिंग करणे या कामात स्थानिक महिला मोठ्या संख्येने सहभागी आहेत. ‘पर्ल मिथिला मखाना’च्या प्रत्येक पाकिटावर या महिलांच्या कष्टाची आणि कौशल्याची मोहोर उमटलेली असते. आज हा ब्रँड केवळ बिहारपुरता मर्यादित न राहता देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला आहे.

प्रगती म्हणजे केवळ परदेशात जाऊन स्थायिक होणं नव्हे, तर आपल्या ज्ञानाचा उपयोग आपल्या मातीतील माणसांचे अश्रू पुसण्यासाठी करणं होय. 'पर्ल मिथिला मखाना' आज केवळ एक 'लेबल' राहिलेला नाही, तर तो एका लेकीने आपल्या मातीला दिलेल्या शब्दाची आणि घेतलेल्या कष्टाची साक्ष आहे.

‘पर्ल मिथिला मखाना’ ब्रँडची खास वैशिष्ट्ये:

  •  शेतकऱ्यांशी थेट नातं: कोणताही मध्यस्थ नसल्यामुळे नफ्याचा थेट हिस्सा शेतकऱ्यांच्या पदरात पडतो.
  •  हस्तकला जपली: यांत्रिक युगातही १००% हाताने केलेली प्रक्रिया (Hand-processed) ही या ब्रँडची ओळख आहे.
  •   शुद्धता आणि पारदर्शकता: प्रत्येक मखाना हा नैसर्गिक असून त्यात कोणतीही भेसळ किंवा कृत्रिम प्रक्रिया केली जात नाही.
  •   सामाजिक उत्तरदायित्व: ५०० पेक्षा जास्त कुटुंबांना शाश्वत रोजगार मिळवून देत हा ब्रँड ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा बनला आहे.


  • - स्नेहा सुतार