अध्यात्म म्हणजे केवळ देव-धर्म की स्वतःचा शोध? मानसशास्त्र आणि अध्यात्म यांचा समन्वय साधत, मानवी मनाच्या 'इंट्यूशन'पासून 'हायर सेल्फ'पर्यंतचा प्रवास.

अध्यात्म (Spirituality) म्हणजे नेमकं काय?
हा प्रश्न हल्ली जरा घाबरवणारा झाला आहे. कुणाला वाटते, हे देव, पूजा, मंत्र किंवा ध्यान आहे; तर कुणाला वाटते की हे सगळे फार वरवरचे आहे आणि अजिबातच व्यवहार्य नाही. पण खरं सांगायचं तर, अध्यात्म ही ना अंधश्रद्धा आहे, ना जबाबदारीतून पळ काढण्याची सोय. ती आहे स्वतःला प्रामाणिकपणे प्रश्न विचारण्याची हिंमत!
हे अध्यात्म जेवढे देवळात असते, तेवढेच ते आपल्या स्वयंपाकघरात, ऑफिसच्या फाईलमध्ये आणि अगदी ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या अस्वस्थ मनातही असते.
अहो, कधीकधी 'गुगल मॅप' नसतानाही आपण अचूक वळण घेतो. त्या क्षणी कुणीतरी आतून कुजबुजल्यासारखं वाटतं, “इथूनच जा...” नाही का? ती काही जादू नव्हे; ती अंतःप्रेरणा असते. आता ही काय नवीन भानगड आहे?
घाबरू नका, सांगते. ही अंतःप्रेरणा (Intuition) म्हणजे केवळ अंदाज नव्हे, ना कोणती गूढ शक्ती. उलट, मानसशास्त्राच्या भाषेत सांगायचे तर, तो आपल्या अनुभवांचा, भावनांचा, स्मृतींचा आणि नकळत ओळखलेल्या संकेतांचा (Patterns) एक शांत निष्कर्ष असतो. म्हणजेच, आपल्या अनुभवांची आणि सुप्त मनाची प्रक्रिया एकत्र येऊन तयार झालेली एक आंतरिक जाणीव!
मात्र, प्रत्येक आंतरिक जाणीव ऐकावीच असं नसतं. ती तेव्हाच ऐकावी, जेव्हा ती भीतीतून नाही तर शांत स्पष्टतेतून येते. कारण, 'भीती ओरडते, पण अंतःप्रेरणा कुजबुजते!' त्यामुळे भीती आणि अनुभवातून आलेली अंतःप्रेरणा यातील फरक ओळखणे, हीच खरी मानसिक परिपक्वता होय.
आणि याच परिपक्वतेतून अंतर्मनातला आवाज, अर्थात आपली आंतरिक ओढ जन्माला येते. आपल्यात अशा अनेक गोष्टी असतात, ज्या वारंवार मनाला ओढ लावतात. कितीही टाळलं तरी मन पुन्हा पुन्हा तिथेच जातं. अशा वेळी, “हे माझ्यासाठीच आहे,” अशी एक अनामिक खात्री वाटणे, यालाच काही जण 'उच्च स्वरूप' असे म्हणतात. हे 'हायर सेल्फ' म्हणजे आपली ती आवृत्ती, जी अजिबात घाबरत नाही, घाई करत नाही आणि निर्णय घेताना अधिक समजूतदार असते.
आता तुम्ही म्हणाल, या आपल्या आवृत्तीला ‘हायर’ (उच्च) का म्हणतात? कारण बहुतेक परिस्थितीत आपल्यातला 'अहं' लगेच विचारतो, “लोक काय म्हणतील?” आणि तो तात्काळ समाधान शोधायचा प्रयत्न करतो. पण आपली सुधारित आवृत्ती (Higher Self) मात्र, “तुला काय योग्य वाटतं?” असं विचारून आपल्याला अर्थपूर्ण निर्णय घेण्यास मदत करते.
मात्र, या प्रवासात एक थोडासा अवघड पण आवश्यक टप्पा येतो, 'छाया कार्य'. यात 'शॅडो' (छाया) म्हणजे आपल्या व्यक्तिमत्त्वाचे ते भाग जे आपल्याला स्वतःलाच आवडत नाहीत. जसे की राग, मत्सर, असुरक्षितता किंवा अपराधीपणा. “मी असा नाहीच,” असे म्हणत आपण जे लपवतो, तीच आपली सावली. 'शॅडो वर्क' म्हणजे स्वतःला दोष देणे नव्हे, तर स्वतःकडे प्रामाणिकपणे पाहणे आणि गुण-दोषांवर काम करणे होय. उदाहरणार्थ, जर आपल्याला काही लोक फार त्रासदायक वाटत असतील, तर थोडं थांबून अंतर्मुख होऊन पाहिलं की कळतं, तो त्रास समोरच्या व्यक्तीचा नसून, आपल्याच नाकारलेल्या भागाचा तो एक आरसा असू शकतो. यालाच मानसशास्त्रात 'प्रोजेक्शन' (Projection) म्हणतात.
या सगळ्यात अध्यात्मिक उपचार कुठे सुरू होतात?
‘हीलिंग’ म्हणजे केवळ कायम आनंदी राहणे नव्हे, तर भावनांना जागा देणे, त्यांचा स्वीकार करणे आणि मानसिक जखमांवर फक्त वरवरची मलमपट्टी न करता त्यांची खरी काळजी घेणे होय. ध्यान, डायरी लिहिणे, श्वसनाचे व्यायाम, शरीर-ऊर्जेची जाणीव ही साधने मनाला समजून घेण्याची शिस्त शिकवतात. परंतु, असे अध्यात्मिक उपचार वैद्यकीय किंवा मानसोपचाराची जागा घेऊ शकत नाहीत; ते फक्त त्यांना पूरक ठरू शकतात.
म्हणूनच, अध्यात्म आणि मानसशास्त्र हे एकमेकांचे विरोधी नाहीत. मानसशास्त्र विचारते, “मन कसं काम करतं?" तर अध्यात्म त्या मनाकडे 'साक्षीभावाने' पाहायला शिकवते. जेव्हा हे दोन्ही एकत्र येतात, तेव्हा मानसिक आरोग्यावरचे उपचार अधिक खोल आणि प्रभावी होतात. यामुळे जागरूकता (Awareness) वाढते, भावनांचे नियमन (Regulation) करणे शक्य होते आणि अनुभवांना एक नवीन अर्थ (Meaning-making) मिळतो. थोडक्यात सांगायचे तर, मानसोपचारामुळे शब्दांची स्पष्टता मिळते, तर अध्यात्मामुळे मानसिक स्थैर्य! आणि हे दोन्ही मिळून एक उत्तम समतोल तयार होतो.
शेवटी एवढंच...
अध्यात्म म्हणजे जगापासून पळून जाणे नाही, तर स्वतःमध्ये खोलवर जाणे आहे. मानसशास्त्र दिशा देते, तर अध्यात्म त्या दिशेने विचार करण्यास प्रवृत्त करते. जेव्हा हे दोन्ही एकत्र असतात, तेव्हाच माणूस खऱ्या अर्थाने पूर्ण होतो.
“स्वतःला शोधणे ही अध्यात्मिक यात्रा आहे आणि स्वतःला समजून घेणे ही मानसशास्त्रीय प्रक्रिया!”

- मानसी कोपरे
मानसोपचारतज्ज्ञ व समुपदेशक, डिचोली - गोवा
७८२१९३४८९४