आईची माया: मृत्यूच्या पलीकडचे नाते

कोविडच्या भीषण अंधारात एका कुटुंबाची झालेली वाताहत आणि मातृत्वाच्या ओढीने मृत्यूच्या पलीकडे जाऊन आपल्या सुनेला व नातीला धीर देणाऱ्या एका सासूच्या असीम मायेची ही एक हृदयस्पर्शी सत्यकथा.

Story: साद अदृश्याची |
19th December, 09:31 pm
आईची माया: मृत्यूच्या पलीकडचे नाते

करोना नावाच्या विषाणूने जगात मोठा हाहाकार माजवला. या काळात अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली. अशीच एक हृदयद्रावक घटना स्मिता आंबीये आणि तिच्या कुटुंबाबाबत घडली. स्मिताच्या संपूर्ण कुटुंबाला कोविडची लागण झाली होती. त्यावेळी स्मिता गरोदर होती, म्हणून तिला तातडीने 'झूबी' या खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले. स्मिताच्या सासू-सासऱ्यांची प्रकृतीही कोविडमुळे गंभीर झाली होती, त्यामुळे ते दोघेही सरकारी रुग्णालयात दाखल झाले होते. नेहमी खेळकर आणि दिलखुलास जगणारी स्मिता या सगळ्या संकटांमुळे हादरून गेली होती.

स्मिताचा पती यश याची या सगळ्यात खूप ओढाताण होत होती. त्यांच्या घरात सर्वप्रथम यशलाच कोविडची लागण झाली होती. तरीही तो कधी स्मिताकडे, तर कधी आई-बाबांच्या काळजीत असे. लॉकडाऊनच्या बंधनांमुळे तो स्वतःच्या गाडीत बसूनच 'वर्क फ्रॉम होम' करत होता. त्याने या काळात मिनिटा-मिनिटाला माशाप्रमाणे तडफडणारे जीव पाहिले होते. दरम्यान, यशच्या आईची प्रकृती थोडी स्थिरावली होती, पण बाबांची ऑक्सिजन पातळी अजूनही कमीच होती. रुग्णालयात खाटांचीही कमतरता होती.

अशाच कठीण प्रसंगात स्मिताने एका गोंडस मुलीला जन्म दिला. यशने केवळ एकदाच आपल्या छकुलीला कवेत घेतले, पण त्यानंतर बाबांची प्रकृती ढासळल्यामुळे तो त्यांच्यापाशीच थांबला. बाबांना संध्याकाळी उत्तर गोव्याच्या रुग्णालयातून दक्षिण गोव्याला हलवण्यात येणार होते. स्मिताला बाळाच्या आनंदासोबतच सासू-सासऱ्यांच्या प्रकृतीची काळजी सतावत होती. नियमांमुळे स्मिताच्या आईव्यतिरिक्त कुणालाही तिच्या खोलीत प्रवेश नव्हता. यशने दुपारी फोनवर बाबांना दुसऱ्या रुग्णालयात नेणार असल्याचे सांगितले होते, पण त्यानंतर कुणाचाच फोन आला नव्हता.

रात्रीचे अकरा वाजले असावेत. स्मिताला खूप बेचैन वाटू लागले. ती एकटीच खोलीबाहेर प्रसाधनगृहाकडे गेली. परत येताना तिला कुणीतरी आपल्या मागे येत असल्याचा भास झाला, पण ती शांत राहिली. अचानक तिला कुणीतरी हाक मारल्यासारखे वाटले, पण तिथे कुणीच नव्हते. ती तशीच येऊन पलंगावर पडली. बाळ आणि आई दोघीही गाढ झोपल्या होत्या. स्मिताने यशला फोन लावला, पण तो फोन उचलत नव्हता. दुपारपासून त्याने एकाही मेसेजला प्रत्युत्तर दिले नव्हते. तिच्या मनात एक वेगळीच हुरहूर लागली होती. काळजीपोटी ती सतत कूस बदलत होती, पण डोळ्यांतून झोप पूर्णपणे उडाली होती. तेवढ्यात बाळ रडल्याचा आवाज आला. स्मिताने तिला उराशी धरून दूध पाजले आणि पुन्हा झोपवले. स्मिताचे शरीर थकले होते, पण मन मात्र चिंताग्रस्त होते. रात्रीचे बारा वाजले असतील, पुन्हा एकदा तिला बाहेर जावेसे वाटले म्हणून ती खोलीबाहेर आली.

बाहेरचे वातावरण एकदम शांत होते. जवळच्याच एका स्वच्छतागृहातून नळाचे पाणी पडण्याचा आवाज येत होता. स्मिता पुन्हा खोलीकडे जाऊ लागली, पण पुन्हा एकदा तिला कुणीतरी मागे चालत असल्याचा भास झाला. तिला अस्पष्ट हुंदक्यांचा आवाज ऐकू येत होता. आजूबाजूला कुणीही दिसत नव्हते, पण जमिनीवर कुणीतरी चालल्याच्या पाऊलखुणा उमटत असल्याचे तिला जाणवले. ती आपल्या खोलीच्या दाराजवळ पोहोचली, तेव्हा तिची नजर समोर उभ्या असलेल्या एका पाठमोऱ्या स्त्रीकडे गेली. चापचूप नेसलेली पांढरी साडी आणि नीटनेटका बांधलेला पांढऱ्या केसांचा गोल अंबाडा... ती आकृती एकदम स्पष्ट आणि ओळखीची वाटत होती. स्मिताला वाटले हा भास असावा, कारण तिच्या समोर प्रत्यक्ष तिची सासू उभी होती!

स्मिताच्या तोंडातून शब्द फुटले, "आई, तुम्ही इथे?"

त्या वळल्या आणि म्हणाल्या, "हो ग. तुला आणि बाळाला पाहिल्याशिवाय राहवेना, म्हणून आले."

स्मितासाठी तिची सासू स्वतःच्या आईसारखीच होती. या काळात त्यांनी तिची खूप काळजी घेतली होती. "पण आई, यश कुठे आहे? तुम्ही एवढ्या रात्री या काळोखात एकट्या कशा आलात?" स्मिताने प्रश्नांची सरबत्तीच केली.

"सगळे सांगते," म्हणत त्यांनी स्मिताचा हात धरला आणि दोघीही बाजूच्या स्टीलच्या खुर्चीवर बसल्या. स्मिता म्हणाली, "चला, आता आत जाऊया."

त्यावर सासूबाई म्हणाल्या, "नको, मी बाळाला पाहून आले. खूप गोड आहे आपली छकुली, अगदी तुझ्या आणि माझ्या यशसारखी. मी आता आत येत नाही, हालचालीने बाळ पुन्हा जागे होईल."

सासूबाईंचा स्वर आता गंभीर झाला होता. त्या सांगू लागल्या, "घाबरू नकोस, स्वतःला सावर. आता बाळाची आणि तुझी काळजी तुलाच घ्यायची आहे. माझ्या यशलाही नीट सांभाळ; त्याला कधीकधी खूप राग येतो, त्यालाही एखाद्या लहान मुलासारखे प्रेम दे. बाबांना वेळेवर औषधे दे आणि रात्री खिडक्या-दारांच्या कड्या लावायला विसरू नकोस. वेळेवर जेवत जा आणि खंबीर राहा." त्यांनी स्मिताला अनेक गोष्टी समजावून सांगितल्या. "खूप रात्र झाली आहे, आता तू झोप," असे म्हणत त्यांनी तिचा निरोप घेतला. स्मिताने पुन्हा आग्रह केला, तरी त्या "मी इथेच थांबते," असे म्हणाल्या.

दुसरा दिवस उजाडला. सूर्याची किरणे स्मिताच्या डोळ्यांवर पडली तेव्हा सकाळचे आठ वाजले होते. आईने बाळाला घेतले होते. स्मिताने चटकन यशला फोन लावला, कारण त्याचे दोन मिसकॉल आले होते. यशचा फोनवरचा आवाज खूप रडवेला होता. स्मिताने घाबरून विचारले, "काय झाले? बाबा कसे आहेत?"

यश रडतच म्हणाला, "बाबा बरे आहेत ग, पण आई... आई काल रात्री ११.३० वाजता आपल्याला सोडून गेली!"

"काय?" स्मिताच्या हातातून फोन पडला आणि तिला चक्कर आली. थोड्या वेळाने सावरल्यावर ती रडू लागली. तिची आई देखील सुन्न झाली. "सासूबाई गेल्या?" स्मिताच्या मनात विचारांचे चक्र सुरू झाले. मग रात्री तिला भेटली ती कोण होती? स्मिता तो सगळा प्रसंग आठवू लागली. ती पुन्हा त्याच खुर्चीकडे गेली. सासूबाईंच्या त्या शब्दांनी तिला धीर दिला होता. मनात एकच समाधान होते की, जाण्यापूर्वी का होईना, 'आई' आपल्या लेकीला आणि नातीला मायेने भेटून गेली होती.


- श्रुती करण परब