राजाराम मामा: एक विस्मरणीय व्यक्तिमत्व

नारळाच्या वाढत्या किमतींतून सुरू झालेला हा प्रवास आपल्याला गोव्याच्या समृद्ध कुळागरांमध्ये आणि तिथल्या 'पाडेली' संस्कृतीत घेऊन जातो. एका जुन्या घरच्या माणसासारख्या वाटणाऱ्या राजाराम मामाची ही रंजक आणि भावूक आठवण.

Story: व्यक्ती एके व्यक्ती |
19th December, 10:29 pm
राजाराम मामा: एक विस्मरणीय व्यक्तिमत्व

परवा बाजारात नारळ आणायला म्हणून गेले, साधारण टेनिसच्या बॉलएवढा नारळ आणि किंमत पन्नास रुपये! मला तर धक्काच बसला. त्याचे काय आहे, बाजारहाट हा प्रकार पहिल्यापासून 'ह्यांच्याकडे', आपला संबंध फक्त किचनशी. त्यामुळे भाज्या, मासे वगैरेंचे भाव आपल्याला काय माहित? आणि त्यात एका दिवसात नारळाची किंमत चक्क पन्नास रुपये? अहो, माडासमोर उभी राहून पाण्याचे, कातलीचे पाहिजे तसले आडसरे काढायला लावून तिथेच त्याचे मधुर पाणी पिणारी आणि गोड कातली खाणारी मी; हे असे ऐकल्यावर धक्का बसणारच ना! असो!

आमच्या दाभाळीत चारी बाजूंनी कुळागरे होती; सुपारी, नारळ अगदी भरपूर. रस्त्याच्या बाजूला जसे गुलमोहर किंवा आंबा लावतात, तसे आमच्या दाभाळ गावी माड सोबतीला असत. प्रत्येक घरात मागील दारी नारळाच्या राशी हे नित्याचेच दृश्य होते. गावात अनेक व्यवहारही नारळाच्या देवाण-घेवाणीतून होत असत. खरे सांगते, आमच्या लहानपणी नारळाची किंमत दोन-तीन रुपये असायची. पण एकंदरीत गोवेकरांच्या आयुष्यात नारळाला महत्त्व फारच, हे मात्र खरे!

वर्षभरात नारळाचे तीन ते चार वेळा ‘पाडप’ होत असे. पाडप म्हणजे तयार नारळ उतरवणे. यासाठी खास माणसे असत, त्यांना ‘पाडेली’ म्हणतात. गावागावात असे पाडेली असतात आणि त्यांचा मानही मोठा असतो. अतिशय जिकिरीचे आणि मेहनतीचे काम असते ते, पण न थकता काम करणे हा त्यांचा हातखंड.

आमच्या गावात राजाराम मामा हा सगळ्यांचा पाडेली होता. गावात जास्तीत जास्त कुळागरांतील नारळ तोच काढायचा. मध्यम उंचीचा, काळासावळा, पण अंगाने अतिशय काटक. साधारणतः आमच्या बाबांच्या वयाचा तो. दोघेही तसे घट्ट मित्र होते. अख्खा गाव आमच्या बाबांना ‘नाना’ किंवा ‘शशी भाटकार’ म्हणायचा, पण काही ठराविक लोक त्यांना ‘शशी’ म्हणत आणि त्या मांदियाळीत राजाराम मामा एक होता. नारळ, सुपारी, फणस कोणतेही झाड असू द्या, राजाराम मामाने ते सर केले नाही, असे व्हायचे नाही.

 तर असा हा आमचा कुशल राजाराम मामा बोलण्यात एकदम लाघवी व बोलघेवडा होता. शालेय शिक्षण शून्य, पण नवल म्हणजे रोज सकाळी सदूच्या हॉटेलात किंवा आमच्या घरी पेपर वाचणे हा त्याचा नियम होता. राजकारण, अर्थकारण, नाटक, सिनेमा अशा कोणत्याच विषयात तो कमी नव्हता. एकदा तो बोलायला सुरू झाला की माड राहिले बाजूला; पार नेहरूंपासून ते बांदोडकरांपर्यंत सगळ्यांच्या कुंडल्या त्याला तोंडपाठ होत्या. त्यात असा काही आवेश असे की त्याच्या बोलण्याला खुद्द नेहरूंनी सुद्धा हो म्हटले असते, मग इतरांचे काय?

बाकी काही असो, पण नारळाच्या बाबतीत तो एकदम तज्ञ माणूस. वाचकांना खोटे वाटेल, पण माडाखाली उभा राहून तयार नारळाच्या किती पेंडी आहेत आणि आडसरे किती आहेत, हे तो अचूक सांगायचा. आम्हाला सगळे सारखेच दिसायचे, पण त्याची नजरच वेगळी होती. आंब्याच्या दिवसात कोणत्या फांदीचे आंबे पिकायला आले आहेत, हे तो आजीला सहज सांगायचा. ही त्याची ‘समाजसेवा’ विनामूल्य असायची! एकंदरीत त्याकाळी गावकऱ्यांचे संबंध खूप जिव्हाळ्याचे होते. ‘एकमेकां साह्य करू’ या वृत्तीने गावगाडा चालायचा.

आमच्या आजीचा त्याच्यावर खूप लोभ होता, कदाचित तो बाबांच्या वयाचा होता म्हणूनही असावे. आमच्या सोवळ्या घरात राजाराम मामाला मुक्तद्वार होते. तो अगदी घरच्यासारखा वागायचा. घरी आल्यावर आमच्या आईला “भाभी च्या कर मगे इल्ली” म्हणून आजीसमोर ऑर्डर देणारा पहिला गावकरी म्हणजे राजाराम मामा. गावातील गावकर वाड्यावर त्याचे छोटेसे घर होते. छोट्याशा अंगणात त्याच्या पत्नीने अबोलीची झाडे लावली होती, त्यावरून त्याचे घर सहज ओळखता यायचे. लक्ष्मी म्हणजे त्याची पत्नी; ती अबोलीचे गजरे करून विकायची, तसेच कधी सुपारी सोलायलाही आमच्याकडे यायची. राजाराम मामाला दोन मुले आणि दोघेही चांगली शिकली. एक तर सरकारी कर्मचारी झाला.

माझी आत्या दर मे महिन्यात मुंबईहून यायची, त्यावेळी राजाराम मामा स्वतःहून लाल माडाची आडसरे घेऊन घरी हजर व्हायचा. “ताई आयले मगो, भाच्याक आडसर हाडला,” असे म्हणून स्वतः आडसर फोडून द्यायचा. हे त्याला कुणी सांगायची गरज नसायची, पण हा आपलेपणाच आमच्या गोवेकरांची शान आहे!

अख्ख्या गावात झाडांविषयी माहिती असलेला राजाराम मामाशिवाय दुसरा कोणी नव्हता. माडाला किंवा सुपारीला खत कधी घालायचे, झाडाला उंदीर लागू नये म्हणून औषध कधी मारायचे, हे सर्व मामाच ठरवायचा. अहो, औषध मारायचा पंप सुद्धा तो स्वतः दुरुस्त करायचा. नारळ पाडायच्या दिवशी तो सकाळीच हजर असायचा. एकदा कामाला लागला की दुपारपर्यंत अख्खे कुळागर साफ व्हायचे. फक्त त्याच्यासमोर राजकारणाचा विषय काढायचा नाही. नारळाच्या भरघोस राशी बघून तो खूप खुश व्हायचा. आजीला म्हणायचा, “होनिबाय हो राजाराम आसा म्हणसर तूजे कुळागर, तुझे नाल्ल, बेडे, फुडले खबर ना.” आजी आणि बाबाही त्याचे ऋण जाणून होते. बिदागी व्यतिरिक्त वेगळे नारळ मिळणे हा त्याचा हक्कच होता आणि बाबाही त्याला कधी नाही म्हणत नसत.

मध्यंतरी दाभाळला गेले होते, तेव्हा भाऊ सांगत होता की, “आजकाल नारळ काढायला कोणी मिळत नाही. कुळागर सांभाळणे म्हणजे पांढरा हत्ती पोसण्यासारखे झाले आहे.” राजाराम मामा रस्त्यात भेटला. आता तो थकला आहे, काठी घेऊन चालतो. डोळे बारीक करून पाहतो, पण तीच नजर आणि तोच बोलका स्वभाव अजूनही टिकून आहे. मुलाने त्याच्या डोळ्याचे ऑपरेशन केले आहे, त्यामुळे आता चष्म्याशिवाय तो पेपर वाचतो. बाकी काहीही असले तरी त्याचे एक वाक्य खरे ठरले, ते म्हणजे, “फुडले खबर ना.” खरेच! आता ठराविक एक-दोन जण सोडले तर नारळ पाडायला कोणीही उरले नाही. खत परवडत नाही आणि आता कुणी कुळागरावर अवलंबूनही नाही. पाणी कमी झाले, मग आता सांगा नारळ पन्नास रुपये होणार नाही तर काय?


- रेशम जयंत झारापकर

मडगाव, गोवा.