आईपासून दुरावलेला ओंकार: हरवलेल्या पाडसाचे दुःख की विकासाच्या नावाखाली केलेली क्रूरता?

विकासाच्या हव्यासापोटी निसर्गाचा समतोल ढासळत चालला आहे. कळपापासून ंदुरावलेला 'ओंकार' हत्ती आज मानवी क्रूरतेचा बळी ठरत आहेआईपासून दुरावलेला ओंकार: हरवलेल्या पाडसाचे दुःख की विकासाच्या नावाखाली केलेली क्रूरता. त्याची व्यथा मांडणारा आणि आपल्या माणुसकीला साद घालणारा हा संवेदनशील लेख.

Story: ललित |
19th December, 10:34 pm
आईपासून दुरावलेला ओंकार: हरवलेल्या पाडसाचे दुःख की विकासाच्या नावाखाली केलेली क्रूरता?

आज आपण विकासाच्या नावाखाली जंगले तोडून जमिनीचे भूखंड पाडतो आणि त्यावर भव्य घरे उभी करतो. बँक खात्यात जमा होणारी जमिनीच्या विक्रीची रक्कम आपल्याला दिसते, पण त्या बदल्यात उजाड झालेले जंगल आणि बेघर झालेले हजारो प्राणी मात्र आपल्या गावीही नसतात. आपण स्वतःच्या घरासाठी मजबूत भिंती उभारतो, पण दुसऱ्याचे घर उद्ध्वस्त करताना क्षणभरही विचार करत नाही. आपण ज्या एका निराधार हत्तीबद्दल बोलत आहोत, त्याचे नाव आहे 'ओंकार'. तो आपल्या कळपापासून आणि जन्मदात्री आईपासून दुरावलेला, एक हरवलेला बाळ आहे. महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांच्या सीमांवर तो एकटा भटकत आहे; खरं तर तो चुकून मानवी वस्तीत आला आहे.

याच ओंकारला काही महिन्यांपूर्वी लोकप्रियतेसाठी, त्याचे फोटो आणि व्हिडिओ काढून प्रसिद्ध केले गेले; तेव्हा तो सर्वांना ‘चांगला’ वाटला. मात्र, आता जेव्हा तो घाबरून झाडे तोडतो किंवा आत्मसंरक्षणार्थ वागतो, तेव्हा त्याला लगेच ‘वाईट’ ठरवले जात आहे. आम्ही माणसे जसे त्याच्याशी वागू, तसाच तो आपल्याशी वागणार, हे आपण विसरतो.

ओंकारला आधार देण्याऐवजी किंवा त्याला शांतपणे परत जाण्यासाठी वाट मोकळी करून देण्याऐवजी, आम्ही त्याचा सतत पाठलाग सुरू केला आहे, जणू काही हा एक खेळ आहे. त्याला मनातल्या मनात कदाचित वाटत असेल: “तुम्ही माझ्यावर लक्ष ठेवून आहात हे मला माहित आहे, पण माझ्या एकटेपणाची आणि हरवल्याची तुम्हाला किंचितही काळजी नाही का?" वन अधिकाऱ्यांचे प्रयत्न सुरू असतानाही, लोकांनी त्याच्यावर केलेले अमानुष हल्ले माणुसकीला कलंक लावणारे आहेत. क्रूर लोकांनी त्याच्यावर फटाक्यांचा वापर केला, ज्यामुळे तो मोठा आवाज ऐकून जीव वाचवण्यासाठी धडपडत आहे. केवळ मजा-मस्ती म्हणून त्याच्या तोंडावर पाणी फेकले जाते. लोकांचा मोठा समूह त्याच्या मागे धावत असतो, जणू काही तो वन्यजीव नसून करमणुकीचे साधन आहे. जेव्हा तो घाबरून आत्मसंरक्षणार्थ धुमाकूळ घालतो, तेव्हा तो केवळ आपली भीती व्यक्त करत असतो.

आपण कधी आपल्या कृतींकडे पाहिले आहे का? जमिनी विकून आपल्याला पैसा मिळतो, पण त्या निर्दोष प्राण्यांची घरे नष्ट होतात; कारण आपण त्यांची नैसर्गिक निवासस्थाने हिरावून घेतली आहेत. आपण त्यांच्या हक्काच्या जागेत घुसलो आहोत, म्हणूनच ते आज आपल्या वस्तीत येत आहेत. त्यांच्यासाठी 'धुमाकूळ' म्हणजे भीतीपोटी केलेला जीवघेणा प्रयत्न असतो, तर आपल्यासाठी 'विकास' म्हणजे स्वार्थापोटी केलेली क्रूरता! शांतपणे विचार करा, आपण त्याच्या घरात घुसलो आहोत, तो आपल्या घरात आलेला नाही. ही क्रूरता आहे, हा ‘उत्सव’ नाही!

ओंकारची व्यथा समजून घ्या. तो एक आईचा मुलगा आहे, जंगलाचा रहिवासी आहे. तो आमच्यासारखाच एक ‘सजीव’ आहे. आपल्याला तात्काळ काही महत्त्वाच्या गोष्टी करण्याची गरज आहे: शांतता पाळा आणि वन अधिकाऱ्यांना त्यांचे काम करू द्या. त्याच्या वाटेत अडथळे आणू नका. त्याला सुरक्षितपणे त्याच्या नैसर्गिक अधिवासात जाण्यासाठी वाट मोकळी करून द्या, जेणेकरून तो त्याच्या कळपाशी पुन्हा भेटू शकेल. लक्षात ठेवा, निसर्गात आपण सर्वजण समान आहोत. तुमच्या एका दिवसाच्या ‘करमणुकी’पेक्षा त्या ओंकारचे ‘जीवन’ अधिक महत्त्वाचे आहे! माणुसकी केवळ माणसांपुरती मर्यादित ठेवू नका. चला, ओंकारला सुरक्षितपणे त्याच्या घरी, त्याच्या आईकडे परत पाठवूया. हीच खरी ‘माणुसकी’ आणि ‘सहिष्णुता’ आहे.


- श्रेया (भिवशेट) मोरजकर