बहुतेक वेळा पायात गोळे येणे ही सामान्य समस्या असते. पण वेदना जास्त असल्यास किंवा पाय फार सुजलेले असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.

गर्भधारणा हा स्त्रीच्या आयुष्यातील अतिशय आनंददायी पण तितकाच शारीरिक व मानसिक बदलांचा काळ असतो. या काळात शरीरात अनेक हार्मोनल, शारीरिक आणि रक्ताभिसरणाशी संबंधित बदल घडतात. याच बदलांमुळे अनेक गर्भवती महिलांना पायात गोळे येणे (मसल क्रॅम्प्स) ही समस्या जाणवते. विशेष करून रात्री झोपेत किंवा सकाळी उठताना पायात अचानक तीव्र वेदना होऊन स्नायू आकुंचन पावतात, याला पायात गोळे येणे असे म्हणतात. बहुतेक वेळा हे गोळे पिंडरीच्या स्नायूंमध्ये (काफ मस्सल) येतात, तर कधी कधी पायाच्या तळव्यातही येऊ शकतात. गोळे काही सेकंद ते काही मिनिटे टिकतात, पण त्यानंतर स्नायूचे दुखणे अगदी काही दिवसांपर्यत राहू शकते. हा त्रास सहसा गंभीर नसला, तरी अस्वस्थ करणारा नक्कीच असतो.
प्रेग्नंसीत पायात गोळे येण्याची समस्या ही खूप सामान्य आहे. साधारणपणे दुसऱ्या आणि तिसऱ्या तिमाहीत ही समस्या जास्त प्रमाणात दिसून येते. पायात गोळे येण्यादरम्यान पायातील स्नायू अचानक घट्ट होऊन जोराची वेदना होते. रात्री झोपेत अचानक पायात तीव्र वेदना होऊन जाग येणे हा अनुभव अनेक महिलांना येतो. वाढते वजन, गर्भाशयाचा वाढता आकार आणि हार्मोन्समधील बदल याचा थेट परिणाम स्नायूंवर आणि रक्ताभिसरणावर होतो.
पायात गोळे येण्यामागची प्रमुख कारणे म्हणजे कॅल्शियम, मॅग्नेशियम किंवा पोटॅशियमसारख्या खनिजांची कमतरता. गर्भातील बाळाच्या वाढीसाठी आईच्या शरीरातील पोषक तत्त्वे जास्त प्रमाणात वापरली जातात, त्यामुळे आईमध्ये ही कमतरता निर्माण होऊ शकते. याशिवाय शरीरात पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने (डिहायड्रेशन) तसेच प्रोजेस्टेरॉनसारख्या हार्मोन्समुळे स्नायू सैल झाल्याने, ते पटकन आकुंचन पावून पायात गोळे येऊ शकतात.
रक्ताभिसरणावर होणारा दबाव हेही एक महत्त्वाचे कारण आहे. गर्भ वाढत गेल्यावर गर्भाशयाचा दबाव पायांकडील रक्तवाहिन्यांवर पडतो. त्यामुळे पायांमधील रक्तप्रवाह काहीसा मंद होतो. यामुळे स्नायूंना पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही आणि गोळे येऊ शकतात. याशिवाय गर्भधारणेत वजन वाढल्यामुळे पायांवर जास्त ताण येतो. जास्त वेळ उभे राहणे, जास्त चालणे किंवा दिवसभर खूप काम केल्यास हा त्रास वाढू शकतो. काही महिलांमध्ये रक्ताची कमतरता असल्यासही पायात गोळे येतात.
जर अचानक पायात गोळा आला तर पाय सरळ करून बोटे हळूच स्वतःकडे ओढावीत किंवा त्या भागावर हलकी मालिश करावी. गरम पाण्याने शेक घेणे देखील आरामदायी ठरते. मात्र, गोळे खूप जास्त प्रमाणात, वारंवार येत असतील किंवा त्यासोबत सूज, लालसरपणा किंवा तीव्र वेदना असतील तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
हा त्रास टाळण्यासाठी रोजची काळजी घेणे आवश्यक आहे. यासाठी काही सोपे उपाय करता येतात. आहारात दूध, दही, ताक, हिरव्या पालेभाज्या, डाळी आणि फळांचा समावेश करावा. भरपूर पाणी प्यावे. डॉक्टरांनी दिलेली कॅल्शियम आणि आयर्नची औषधे नियमित घ्यावीत. नियमित हलका व्यायाम, जसे की चालणे किंवा डॉक्टरांनी सुचवलेले स्ट्रेचिंग व्यायाम फायदेशीर ठरतात. झोपण्यापूर्वी पायांचे सौम्य स्ट्रेचिंग केल्यास रात्री येणारे गोळे कमी होतात. झोपताना डाव्या कुशीवर झोपणेही फायदेशीर ठरते.
गर्भखवती महिलांनी स्वतःच्या शरीराकडे लक्ष देणे खूप गरजेचे असते. दररोज पुरेशी विश्रांती घेणे, वेळेवर जेवण करणे आणि जड काम टाळणे फायदेशीर ठरते. घरकाम करताना मध्ये मध्ये बसून आराम करावा. पाय लटकवून जास्त वेळ बसू नये. शक्य असल्यास पायाखाली उशी ठेवून बसावे किंवा झोपावे. घट्ट कपडे किंवा घट्ट चप्पल वापरू नयेत. हलक्या व्यायामामुळे शरीर सुदृढ राहते आणि रक्ताभिसरण सुधारते.
बहुतेक वेळा पायात गोळे येणे ही सामान्य समस्या असते. पण वेदना जास्त असल्यास किंवा पाय फार सुजलेले असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. डॉक्टरांनी सांगितलेले व्यायामच करावेत. कोणताही त्रास लपवू नये. तपासणीदरम्यान पायात गोळे येण्याची माहिती डॉक्टरांना सांगावी. त्यामुळे आवश्यक त्या गोळ्या किंवा सल्ला मिळतो.
एकंदर प्रेग्नंसीत पायात गोळे येणे ही सामान्य पण दुर्लक्षित न करता काळजी घेण्यासारखी समस्या आहे. योग्य आहार, पुरेशी विश्रांती आणि डॉक्टरांच्या मार्गदर्शनाने ही समस्या सहज नियंत्रणात ठेवता येते.

- डॉ. श्वेता राऊत मुळगावकर