लखपती दीदी कांचन पाटील यांचा सुगंधी संघर्ष!

​संकटात नोकरी गेली, जवळचे आप्त सोडून गेले, तरी डगमगून न जाता शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कांचन पाटील यांनी 'आराधना' अगरबत्तीच्या माध्यमातून ग्रामीण महिलांच्या आयुष्यात रोजगाराचा सुगंध दरवळला आहे.

Story: इतिहास घडवणाऱ्या स्त्रिया |
26th December, 09:36 pm
लखपती दीदी कांचन पाटील यांचा सुगंधी संघर्ष!

सिंधुदुर्गातील कुडाळ तालुक्यातील आंदुर्ले गावची कांचन दीपेश पाटील ही एक जिद्दी स्त्री. आज 'आराधना' ब्रँडच्या अगरबत्तीचा सुगंध केवळ सिंधुदुर्गातच नाही, तर गोव्याच्या बाजारपेठेतही दरवळत आहे. पण या यशाच्या सुगंधी प्रवासामागे एक हृदयस्पर्शी संघर्ष, प्रचंड जिद्द आणि दुःखाच्या डोंगराचा पदर दडलेला आहे. कांचनताईंचा हा प्रवास सुरू झाला तो २०२० च्या लॉकडाऊनमधील एका भीषण संकटातून. डीएड पूर्ण करून शिक्षक म्हणून ज्ञानदानाचे काम करणाऱ्या कांचनताई आणि पुण्यात खासगी नोकरीला असलेले त्यांचे पती दीपेश, या दोघांवरही कोरोनामुळे बेरोजगारीची वेळ आली. पुण्यात असताना आर्थिक संकट उभे ठाकले, पण डगमगून न जाता कांचनताईंनी एका अगरबत्ती कंपनीत कार्यालयीन काम स्वीकारले. मात्र, त्यांना केवळ नोकरी करायची नव्हती, तर व्यवसायाचा 'अ' ते 'ज्ञ' शिकायचा होता. कार्यालयीन कामाच्या वेळेतच त्यांनी अगरबत्ती निर्मिती, कच्च्या मालाची प्रक्रिया, पॅकिंग आणि मार्केटिंगचा सूक्ष्म अभ्यास अवघ्या काही महिन्यांत पूर्ण केला.

​स्वतःचा उद्योग सुरू करण्याच्या जिद्दीने पाटील दांपत्य पुणे सोडून आपल्या मूळ गावी आंदुर्ले येथे परतले. अगोदरच आर्थिक ओढग्रस्तात असल्याने मोठी जोखीम न घेता त्यांनी सुरुवातीला कंपनीतून कच्चा माल आणून त्यावर केवळ सुगंधी प्रक्रिया करून विक्रीचे नियोजन केले. आपल्या घराच्या एका छोट्या भागात त्यांनी 'आराधना' ब्रँडची मुहूर्तमेढ रोवली. हळूहळू व्यवसायात जम बसू लागला आणि मग स्वतःच कोळसा पावडर, लाकडाचा भुसा आणि गम वापरून अगरबत्ती निर्मिती करण्याचे ठरले. आज त्यांच्या युनिटमधून दर महिन्याला ३ टन अगरबत्तीची निर्मिती होते आणि दीड लाखांची उलाढाल या व्यवसायातून होत आहे. परंतु व्यवसायाला उभारी मिळत असतानाच कांचनताईंवर नशिबाने मोठा घाला घातला. ज्यांच्या हातांनी या व्यवसायाला आशीर्वाद दिला आणि जे या प्रवासात मोलाचे मार्गदर्शन करत होते, असे त्यांचे सासू-सासरे, वडील आणि आजी या चारही आधारस्तंभांचे सव्वा वर्षाच्या कालावधीत एकामागून एक निधन झाले.

​ज्यांच्या सोबतीने संकटांवर मात करायची स्वप्ने पाहिली, तेच पाठीराखे सोडून गेल्याने पाटील दांपत्य पूर्णपणे कोलमडून गेले. पण या हृदयद्रावक प्रसंगातही कांचनताईंनी हार मानली नाही. त्यांनी आलेल्या संकटाचा स्वीकार केला आणि दुःखालाच आपली ताकद बनवले. त्यांनी गावातील बचत गटातील महिलांना सोबत घेतले आणि आपला अगरबत्ती व्यवसाय अधिक खंबीरपणे वाढविला. कांचनताई केवळ स्वतः 'लखपती' झाल्या नाहीत, तर त्यांनी गावातील इतर महिलांच्या हातालाही सन्मानाने काम दिले. 'उमेद' अभियानांतर्गत बचत गटांच्या माध्यमातून त्यांनी महिलांना संघटित केले आणि आज त्यांच्या व्यवसायातून स्थानिक महिलांना बारमाही रोजगार मिळत आहे. या कार्याची दखल घेऊन शासनाकडून त्यांना 'लखपती दीदी' पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. कांचन पाटील यांचा प्रवास हा निव्वळ व्यवसाय वाढवण्याचा प्रवास नाही, तर सर्व काही हरवलेले असतानाही धैर्याने उभे राहून पुन्हा स्वतःचे विश्व निर्माण करण्याचा एक प्रेरणादायी लढा आहे.


- स्नेहा सुतार