आजची लग्ने प्रेमाच्या कमतरतेमुळे नाही, तर जबाबदाऱ्यांच्या ओझ्यामुळे थकत चालली आहेत. ‘मॅरेज बर्नआउट’च्या या काळात नात्यांमधील संवाद, डिजिटल अंतर आणि मानसिक थकवा यावर प्रकाश टाकणारा हा विशेष लेख.

आज नाती तुटत नाहीत, ती हळूहळू थकत जात आहेत. पण असं का होत असावं?
पूर्वी लग्न म्हणजे दोन माणसांचा एक गोड-तिखट संसार असे. परंतु आज ते एक 'मल्टीटास्किंग प्रोजेक्ट' बनलं आहे. काम, घर, पालकत्व, नाती, जबाबदाऱ्या आणि त्यावर २४x७ उपलब्ध राहण्याची अपेक्षा. कुठेही भावनिक दृष्ट्या 'ऑफ ड्युटी' व्हायला परवानगी नाही. सतत हसत राहायचं, समजून घ्यायचं, अॅडजस्ट करायचं; पण आज 'मन थकलंय' असं म्हणायला मात्र अजिबात जागा मिळत नाही. यामुळे होतं काय, हळूहळू या नात्याचा ताण साचत जातो आणि त्यालाच आपण आज 'मॅरेज बर्नआउट' असं म्हणतो.
आजच्या नात्यांमधली एक विचित्र विडंबना म्हणजे जवळ असूनही दूर असणं. एकाच खोलीत दोन माणसं, पण दोघांचं लक्ष वेगवेगळ्या स्क्रीनवर. संवाद कमी आणि 'स्क्रोलिंग' जास्त. मानसशास्त्रात याला 'मायक्रो डिस्कनेक्शन' म्हणतात. अर्थात, छोट्या छोट्या गोष्टींतून निर्माण होणारा दुरावा जो पटकन दिसत नाही, पण कालांतराने परस्परांतील जवळीक मात्र हळूहळू झिजवू लागतो. सांगण्यासारखं फार मोठं काही नसतं, पण त्या नात्याचं मूळ अस्तित्व कुठेतरी हरवत जातं.
मनोविश्लेषणानुसार कुठल्याही नात्यातील सर्वात मोठं ओझं म्हणजे 'इमोशनल लेबर'. अर्थात घरातील विविध गोष्टींचं व्यवस्थापन, मनं सांभाळणं आणि कुटुंबातील सगळ्यांच्या मानसिक गरजा जोपासणं इत्यादी. मुळात आजही या सगळ्याचा भार बहुतेक वेळा एका जोडीदारावरच येतो, ज्यामुळे त्या नात्याला 'टीमवर्क' ऐवजी 'सिंगल-प्लेअर मोड'चे स्वरूप प्राप्त होते आणि ती व्यक्ती पूर्णपणे थकून जाते.
सोशल मीडियाची 'तुलना-संस्कृती' या थकव्याला अजून खतपाणी घालते. इतर जोडप्यांचे हसरे फोटो, परिपूर्ण क्षण आणि फिल्टर्ड आयुष्य; यांच्याशी वास्तवाची तुलना करताना आपलं नातं आपल्यालाच अपुरं आणि फिकं वाटू लागतं. अशा वेळी कृतज्ञतेची जागा असमाधान घेतं. आपल्याकडे जे आहे ते दिसेनासं होतं. आम्ही याला 'रिलेटिव्ह डेप्रिव्हेशन' म्हणतो; म्हणजेच आपल्याकडे जे आहे त्याची किंमत कमी वाटू लागणे आणि इतरांचे आयुष्य अधिक सुखाचे वाटणे.
आज वरकरणी सगळं सौम्य ठेवण्याचा दबावही वाढतोय. जरासा राग किंवा चिडचिड व्यक्त केली तरी लगेच “तू मॅच्युअर नाहीस” असा शिक्का बसतो! त्यामुळे सगळं दाबून ठेवून शांतपणे हाताळायचं अशी वृत्ती वाढते. अशा प्रकारे भावना दाबल्या गेल्या की त्या नाहीशा होत नाहीत, तर त्या आत कुठेतरी खोलवर साठत जातात आणि एके दिवशी त्यांचा स्फोट होतो, जो नात्यात दुरावा निर्माण करण्यास कारणीभूत ठरतो.
त्यात 'वर्क-फ्रॉम-होम'ने तर जणू उरल्या-सुरल्या सीमाच पुसून टाकल्या आहेत. घरचं ऑफिस, ऑफिसचं घर आणि विश्रांती मात्र कुठेच नाही. 'कपल टाईम' आणि 'पर्सनल स्पेस' याची या गोंधळात गफलत झाली की, त्या बिचाऱ्या नात्याला श्वास घ्यायलाही जागा उरत नाही.
आर्थिक अस्थिरता, कर्जाचे हफ्ते आणि नोकरीची अनिश्चितता या चिंता बहुतेक वेळा एकमेकांशी न बोलता मनात साचून ठेवल्या जातात. त्यांचा सुद्धा एक विचित्र ताण नात्यावर पडतो. "कदाचित फार उशीर तर झाला नाही ना? वय वाढलं, सवयी घट्ट झाल्या, जबाबदाऱ्या वाढल्या... आपलं नातं सुधारायला उशीर झालाय का? आता काहीच होऊ शकत नाही का?" ही भीती मन विषण्ण करते आणि हीच भीती या बर्नआउटचा गाभा असते.
याला काही उपाय आहे का?
आज थेरपी अर्थात समुपदेशनाबद्दल जागरूकता वाढतेय, परंतु संकोच अजूनही कायम आहे. आजच्या काळात उपचारांची पद्धतही बदलली आहे. एक जोडपे म्हणून आपापल्या डिजिटल सीमा ठरवणं, फोन-फ्री वेळ पाळणं गरजेचं आहे. दोषारोप टाळून “मी आज थकलेय/थकलोय” असं मान्य करणारा परस्परांतील सुसंवाद, एकमेकांच्या दैनंदिन जबाबदाऱ्यांचा प्रामाणिक वाटा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लग्नात जवळीक कमी होणं म्हणजे वैवाहिक अपयश नाही. तो आपल्या जीवनाचा एक टप्पा असू शकतो, जो दोघं एकत्र मिळून पार करू शकतात.
त्यामुळे, आजचा हा ‘मॅरेज बर्नआउट’ प्रेमाच्या कमतरतेमुळे नाही, तर सतत तग धरून राहण्याच्या ओझ्यामुळे होत आहे. म्हणून नातं वाचवण्यासाठी कधीकधी अधिक प्रयत्न नव्हे, तर अधिक सामंजस्य आवश्यक असतं.

- मानसी कोपरे
मानसोपचारतज्ज्ञ व समुपदेशक,डिचोली - गोवा
७८२१९३४८९४