राकेश...

पैशाने सुबत्ता येते, पण समाधान आणि नाती विकत घेता येत नाहीत. महत्त्वाकांक्षेच्या अतिरेकी ध्यासापायी हक्काची माणसं दुरावल्यावर उरतो तो केवळ एकटा 'पोरका' श्रीमंत. अंतर्मुख करायला लावणारा एक वास्तववादी लेख.

Story: व्यक्ती एके व्यक्ती |
26th December, 09:56 pm
राकेश...

आजच व्हॉट्सअ‍ॅपवर सकाळी सकाळी एक सुविचार वाचला - "इज्जतीला भाव तेव्हाच असतो, जेव्हा खिशात नोटांचा आवाज असतो." भाषा थोडी राकट होती, पण चहा पिता पिता मी विचार करू लागले की, माणसाची किंमत खरोखरच त्याच्या कमाईवर किंवा पैशावर ठरते का? नाती, आपुलकी, काळ आणि वेळ यांचा काहीच संबंध नाही? अगदी काही बाबतीत आणि काही पातळीपर्यंत पैशांचा आवाज ठीक आहे; पण कशापेक्षाही पैशानेच इज्जत वाढते आणि टिकते, यावर माझा तरी पूर्ण विश्वास नाही.

​आयुष्यात पैसा महत्त्वाचा आहे हे पूर्ण सत्य आहे, पण म्हणून तोच श्रेष्ठ नाही! माणसाचे मन, आपसातील नाती आणि संबंध हेसुद्धा महत्त्वाचे असतातच. पैशापेक्षा तेच शेवटी मुख्य ठरतात आणि ती जपणे खूपच महत्त्वाचे असते. नाहीतर मग अंतिम प्रवासाला म्युनिसिपल रुग्णवाहिका बोलवावी लागते.

​आता आमच्या राकेशचेच बघा ना! राकेश म्हणजे आमच्या मडगावच्या मामाचा शेजारी. तसे आमचे घरचेच संबंध, त्यात तो आमच्याच वयाचा. मामाकडे गेलो की त्याची नेहमी भेट व्हायची. अलका त्याची धाकटी बहीण. मामाच्या शेजारी गंगाताई राहत, त्यांची ही मुले. वडील नसतानाही राकेश एक हुशार मुलगा म्हणून घडत होता. गरिबीत का होईना, पण तो शाळेत कायम पहिल्या दोन नंबरमध्ये असायचा. त्याला घरच्या परिस्थितीची पूर्ण जाणीव होती. गंगाताई सरकारी रुग्णालयात 'आया' होत्या. पगार कितीसा असणार? पण मुलांच्या गरजा पूर्ण करताना त्यांनी कधीच हात आखडता घेतला नाही.

​राकेश हुशार होताच, पण तितकाच महत्त्वाकांक्षीही होता. गरिबीची जाणीव असल्याने तो नेहमी सांगायचा, "खूप पैसा कमावणार, बोटीवर जाणार, परदेशात जाणार." त्याची स्वप्ने मोठी होती आणि ती पूर्ण करण्यासाठी काहीही करण्याची त्याची तयारी होती. शालेय शिक्षण संपल्यावर त्याने कॉलेजच्या चाकोरीबद्ध मार्गापेक्षा वेगळी वाट निवडली. त्याने कॅटरिंग कॉलेजला प्रवेश घेतला आणि एक चांगला 'पेस्ट्री शेफ' बनला. शिक्षण संपल्यावर सुरुवातीला एका बेकरीत काम मिळाले. पगार तसा बरा होता, पण त्याची झेप मोठी होती. गंगाताई मुलावर खूश होत्या आणि अलकालाही भावाचा अभिमान होता. आम्ही कधी घरी गेलो की तो स्वतः केक बनवून आम्हाला खाऊ घालायचा. त्याच्या हातात कला होती.

​पुढे त्याला पणजीतील एका मोठ्या हॉटेलमध्ये काम मिळाले. त्याला तिथेच राहावे लागणार म्हणून गंगाताई थोड्या नाराज झाल्या, पण राकेशने ऐकले नाही. तो आठवड्याच्या सुट्टीला घरी यायचा. आता पगार आणि हुद्दा वाढल्यामुळे तो आमच्याशी जरा फटकून वागू लागला. आम्हाला वाटले, 'असू दे, त्याचे चांगले झाले ना!'

​नंतर माझे मामाकडे जाणे कमी झाले. कधीतरी राकेशविषयी बोलणे व्हायचे. त्याचे लग्न झाले, त्याला दोन मुले झाली. अलकाचेही लग्न झाले. अचानक बातमी आली की राकेश परदेशात चालला आहे. सगळे व्यवस्थित चालले असताना, कुटुंबाला सोडून परदेशात जायची काय गरज होती? पण महत्त्वाकांक्षी राकेशला कोण सांगणार? पैसा आणि इज्जत कमावण्याचे खूळ त्याच्या डोक्यात शिरले होते.

​सुरुवातीची काही वर्षे नेमाने येणारा राकेश पुढे पैसे कमावण्याच्या नादात दोन-तीन वर्षांतून एकदा येऊ लागला. पत्नीने येण्यासाठी कितीही आर्जवे केली, तरी तो फोनही कट करू लागला. सुट्टीवर आला तरी फक्त मोठेपणा मिरवणे एवढेच त्याचे काम असायचे. घराकडे, मुलांकडे त्याचे लक्ष नसायचे. मुले काय शिकतात, काय करतात, याचे त्याला देणेघेणे नव्हते. घरात तो काहीच कमी पडू देत नव्हता, पण घरच्यांना केवळ पैसा नको, तर प्रेम आणि बापाचा धाक हवा होता. अलकाला केवळ भाऊबीजेचे पैसे देणारा भाऊ नको, तर तिच्या पाठीशी ठाम उभा राहणारा भाऊ हवा होता. पण राकेशला कशाचेच सोयरसुतक नव्हते.

​हळूहळू राकेशचे भारतात येणे दुरावले. त्या धक्क्याने आणि वयोमानानुसार गंगाताईंनी एक दिवस जगाचा निरोप घेतला. घराचा आधार गेला, पण कामाच्या व्यापात असलेला राकेश आईच्या अंत्यविधीला पोहचू शकला नाही. तिथेच ठिणगी पेटली. जी सासू सुनेला मुलीप्रमाणे सांभाळत होती, तिच्या अंत्यसंस्काराला पोटचा मुलगा नाही? राकेशची पत्नी आता पेटून उठली. मुलांचे आणि अलकाचे मनही राकेशविषयी बदलले. घरच्यांनी त्याच्याशी संबंध जवळजवळ तोडलेच. आधी राकेश फोन करत नव्हता, आता घरचेच त्याला दूर लोटू लागले.

​दुरावा वाढत होता, पण राकेश अजूनही निश्चिंत होता. पैसा फेकला की नाती परत जवळ येतील, असा त्याचा भ्रम होता. पण एक दिवस त्यालाही तडा गेला. मुलाकडे कधीही लक्ष न देणाऱ्या राकेशचा मुलगा स्वतःच्या हिमतीवर शिकला आणि बँकेत नोकरीला लागला. आता कुटुंबाला राकेशच्या पैशाचा आधार नको होता.

​असाच एकदा अनेक वर्षांनी राकेश घरी आला, तेव्हा त्याला घरातील बदलाची चाहूल लागली. मुलांनी त्याला स्पष्ट शब्दांत सांगितले, "आम्हाला तुमचा पैसा नको. ज्या वेळी एक 'बाप' म्हणून तुमची गरज होती, तेव्हा तुम्ही नव्हतात. आजीच्या वेळीही तुम्ही आला नाहीत. मग काय करायचा तो तुमचा पैसा आणि मोठेपणा? तो तुम्हालाच लखलाभ!"

​मुलांचे हे बोलणे ऐकून राकेश हादरला. पण आता खूप उशीर झाला होता. मनातून दुरावलेली नाती परत जोडणे अशक्य होते. राकेशला जाणीव झाली की, आपण पैसा आणि मानमरातब याच्या ज्या खोट्या विश्वात वावरलो, ते सगळे व्यर्थ आहे. महिन्याभरासाठी आलेला राकेश अवघ्या आठ दिवसांत परत गेला.

​आजही राकेश परदेशात आहे... अगदी एकटा! पैसा आहे, नोकरचाकर आहेत, गाडी-घोडे आहेत, पण आपले म्हणायला कोणीही नाही. घरात आल्यावर प्रेमाने चहा देणारे, हक्काने भांडणारे किंवा थकल्यावर 'आजोबा' म्हणत काठी आणून देणारे कोणीही नाही. सगळे असूनही तो आज आपल्याच लोकांसाठी एक परका, उपरा झाला आहे.


- रेशम जयंत झारापकर

मडगाव, गोवा.