अहवालातून स्पष्ट १७ ध्वनी प्रदूषण तक्रारींवर पोलिसांचे मौन


पणजी : प्रशासकीय आदेशाचे कारण देऊन हणजूण पोलिसांनी बर्च क्लबचे मालक लुथरा बंधूंची जिल्हाधिकारी अंकित यादव यांच्या अध्यक्षतेखालील दंडाधिकारी समितीला चौकशी करण्यास नकार दिला आहे. दोन वर्षांत बर्च क्लबविरोधात ध्वनिप्रदूषणाबाबत आलेल्या सुमारे १७ तक्रारींवर पोलिसांनी काहीच केले नसल्याचा उल्लेख दंडाधिकारी समितीने अहवालात केला आहे.
हडफडे येथील बर्च बाय रोमिओ लेन क्लबला शनिवार, ६ डिसेंबर रोजी रात्री भीषण आग लागली होती. त्या दुर्घटनेत २५ जणांचा मृत्यू झाला होता. हणजूण पोलिसांनी दुर्घटनेची दखल घेऊन गुन्हा दाखल करून कारवाईही सुरू केली. पोलिसांनी क्लबच्या चार व्यवस्थापकांसह मालक सौरभ लुथरा, गौरव लुथरा आणि अजय गुप्ता यांना अटक केली. दरम्यानच्या काळात सरकारने दुर्घटनेच्या चौकशीसाठी उत्तर गोव्याचे जिल्हाधिकारी अंकित यादव यांच्या अध्यक्षतेखाली दंडाधिकारी चौकशी समिती नेमली. समितीने हडफडेचे तत्कालीन सरपंच रोशन रेडकर, पंचायत सचिव रघुवीर बागकर यांच्यासह मूळ जमीन मालक सुनील दिवकर आणि प्रदीप घाडी आमोणकर यांचा जबाब नोंदवला. क्लबचे मालक सौरभ लुथरा, गौरव लुथरा आणि अजय गुप्ता पोलीस कोठडीत होते. समितीने त्यांचे जबाब नोंदविण्यासाठी पोलिसांशी पत्रव्यवहार केला. त्यावेळी पोलीस निरीक्षकांनी ‘मालकांना न्यायालयाच्या आदेशानुसार पोलीस कोठडी दिली आहे. त्यामुळे त्यांची चौकशी प्रशासकीय आदेशावर देता येणार नाही’, असा उल्लेख करून नकार दिला. असा उल्लेख समितीने अहवालात केला आहे.
समितीने स्थानिक पंच आणि सरपंच यांचे जबाब नोंदविले. त्यावरून क्लबने अनेक वेळा ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे स्पष्ट झाले. समितीने पोलीस नियंत्रण कक्षाकडे क्लबसंदर्भात मागील दोन वर्षांतील कारवाईची माहिती मागविली. त्यानुसार, १ जानेवारी २०२४ ते डिसेंबर २०२५ दरम्यान क्लबच्या विरोधात सुमारे १७ वेळा ध्वनीप्रदूषण नियमाचे उल्लंघन आणि पार्किंगमुळे त्रास झाल्याच्या तक्रारी नागरिकांनी कक्षाकडे नोंदविल्याची माहिती दिली. ध्वनिप्रदूषणाच्या संदर्भातील सर्व तक्रारी हणजूण पोलिसांनी ‘काहीच समोर आले नाही’, असे नोंद करून निकालात काढल्या. आॅगस्ट २०२४ मध्ये एका तक्रारीवर पोलिसांनी डीजे मोहित राणा याच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यातही पोलिसांनी मालकांविरोधात गुन्हा दाखल केला नाही किंवा त्यांच्यासंदर्भात चौकशी न करता आरोपपत्र दाखल केल्याचा उल्लेख समितीने अहवालात केला आहे.
दरम्यान, समितीने क्लबच्या सीसीटीव्ही चित्रफीतीची तपासणी केली. त्यावरून दुर्घटनेपूर्वी मोठ्या आवाजात गाणे आणि नाच सुरू असल्याचे दिसून आले. त्यावेळीही ध्वनिप्रदूषण नियमाचे उल्लंघन झाल्याची शक्यता समितीने वर्तविली. तसा उल्लेख समितीने अहवालात केला आहे.
रोशन रेडकर, रघुवीर बागकर बेपत्ता
बर्च क्लब अग्नितांडव प्रकरणी हडफडेचे तत्कालीन सरपंच रोशन रेडकर आणि तत्कालीन पंचायत सचिव रघुवीर बागकर यांचा शोध पोलीस घेत आहेत. न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यापासून दोघेही भूमिगत झाले आहेत. पोलिसांनी रेडकर यांच्या हडफडेतील दोन्ही घरांवर, तसेच बागकर यांच्या पर्रा व मयडे येथील घरांवर टेळहाणीसाठी पोलीस कर्मचारी तैनात केले आहेत. दोघांचे मोबाईल फोन बंद असल्याने त्यांचा माग काढण्यात अचडणी येत आहेत.
समितीकडून २०००हून अधिक दस्तावेजांची छाननी
बर्च दुर्घटनेच्या चौकशीसाठी उत्तर गोवा जिल्हाधिकारी अंकित यादव यांच्या अध्यक्षतेखाली दक्षिण गोवा पोलीस अधीक्षक टिकम सिंग वर्मा, फॉरेन्सिक सायन्सचे संचालक आशुतोष आपटे, अग्निशमन व आपत्कालीन सेवाचे उपसंचालक राजेंद्र हळदणकर यांची समिती स्थापन केली होती. समितीने पंचायत, महसूल, अग्निशामक दल, पोलीस, वीज, एफडीए, अबकारी, पर्यटन यासह १६ खात्यांच्या नियमांची दखल घेतली. सुमारे २० ते २५ जणांचे जबाब नोंदवून १०६ पानी अहवाल सरकारला सादर केला. त्यात प्रत्येक खात्यासंदर्भात शिफारसी सादर केल्या आहेत. त्यासाठी समितीने सुमारे २००० हून अधिक दस्तावेजांची छाननी केली.